रस्तानाट्यातून जनजागृती करणारे 'कलाकार'

‘कलाकार’ ही संस्था केंद्रीय सरकारच्या ‘रिजनल आऊटरीच ब्युरो’शी नोंदणीकृत आहे.
रस्तानाट्यातून जनजागृती करणारे कलाकार
रस्तानाट्यातून जनजागृती करणारे कलाकार Dainik Gomantak
Published on
Updated on

रस्तानाट्य हे महत्त्वाचं माध्यम आहे. पाहता-पाहता घोळका करून जमा होणाऱ्या प्रेक्षकांसमोर आपला मुद्दा स्पष्ट करून मांडण्यात कलाकारांचे कौशल्य पणाला लागते, पण संवाद थेट होतो आणि पंधरा ते वीस मिनिटांच्या कालावधीत जो संदेश त्यांच्याकडे पोचवायाचा आहे तो परिणामकरित्या पोचवता येतो. रस्तानाट्याला विषयाचे बंधनही नसते. आरोग्यविषयक विषयापासून ते राजकीय विषयांपर्यंत, पर्यावरणसंबंधित विषयापासून ते शैक्षणिक विषयापर्यंत सारे विषय त्यात हाताळता येतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे थेट जनसामान्यांपर्यंत रस्तानाट्यातून सांगणाऱ्याचा आवाज पोहोचतो. मात्र' नाटक’ हे जिथे पहिले प्रेम मानले जाते त्या गोव्यात मात्र रस्ता- नाट्य हा प्रकार फारसा रुजलेला नाही. कदाचित त्याचं कारण हे असेल की ‘रंगमंचीय’ नाटकामधून जे ग्लॅमर त्यातल्या कलाकारांना मिळते ते ग्लॅमर ‘रस्ता नाट्या’तून मिळणे शक्य नसते किंवा विषयाशी बांधील राहून त्याप्रमाणे नाटकाची बांधणी करणे हे देखील कठीण (आणि कंटाळवाणेही) असते. रस्ता- नाट्याचे स्वरूप काहीसे उग्र प्रचारवादी असल्याने ते सादर करण्यातही कलात्मक मर्यादा नक्कीच येते.

‘कलाकार’ ही संस्था केंद्रीय सरकारच्या ‘रिजनल आऊटरीच ब्युरो’शी नोंदणीकृत आहे. या ब्युरोकडून ठरवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या विषयांवर लोकांना जागृत करण्यासाठी या संस्थेला रस्तानाट्ये सादर करण्याचे काम मिळते. गोव्यात या ब्युरोशी संलग्न असलेल्या एकंदर चार वेगवेगळ्या संस्था आहेत, ज्या रस्तानाट्यातून दर्शकांकडे वेगवेगळे शासकीय संदेश पोचवतात. उदाहरणार्थ, ‘कलाकार’ या संस्थेने ‘पल्स-पोलीओ’, ‘स्वाईन फ्लु’, ‘डीआरडी योजना’,’ कोरोना वायरस’, ‘कोरोना प्रतिबंधक टिकाकरण’ इत्यादी विषयांवर रस्त्यानाट्यातून जनजागृती केली आहे.मेरशीची ‘कलाकार’ ही संस्था गेली १९९७ पासून स्वाती साळगांवकर यांच्या नेतृत्वाखाली, सातत्याने वेगवेगळ्या विषयावर आधारित रस्तानाट्य सादर करते. अलीकडेच त्यांनी एचआयव्ही जागृतीसंबंधात पहिल्या टप्प्यात रस्तानाट्याचे पंचवीस प्रयोग गोव्याच्या वेगवेगळ्या भागांत सादर केले.

रस्तानाट्यासाठी निवड झाल्यावर त्या संस्थेच्या कलाकारांना त्या विषयाशी संबंधित कार्यशाळेत काही दिवस प्रशिक्षण दिले जाते. उदाहरणार्थ, एचआयव्हीसंबंधित रस्त्यानाट्य सादर करण्यापूर्वी ‘गोवा एड्स सोसायटी’ने ३ दिवसांची कार्यशाळा मिरामार रेसिडेंसीत आयोजित केली. या कार्यशाळेत संस्थेच्या कलाकारांना या विषयाची योग्य माहिती वेगवेगळ्या डॉक्टरकडून आणि तज्ज्ञांकडून दिली गेली. अशा कार्यशाळेतून रस्तानाट्य सादर करणाऱ्या कलाकारांना विषयाचे ज्ञान मिळते आणि प्रेक्षकांसमोर जाण्यात त्यांना अधिक सहजता येते. ‘प्रेक्षकांना भीती दाखवायची नसते’ हे साधे वाटणारे परंतु अत्यंत महत्त्वाचे तत्त्व कलाकारांना अशा कार्यशाळेदरम्यानच समजून येते.

रस्तानाट्यातून जनजागृती करणारे कलाकार
व्हायोलीनवादक मुकुंद मणेरीकर

कार्यशाळा आटोपल्यानंतर कलाकार एकत्र येतात आणि मिळून रस्तानाट्याची संहिता तयार करतात जी नंतर त्या विषयाशी संबंधित तज्ज्ञांकडून तपासून घेतली जाते. एकदा संहितेला मान्यता मिळाली की नंतर ठरलेल्या काळात रस्तानाट्यांचे सादरीकरण व्हायला सुरुवात होते. ‘कलाकार’ या संस्थेचा प्रदीप नाईक सांगतो, गोव्यात ज्यावेळी त्यांची संस्था रस्ता -नाट्य सादर करते त्यावेळी लोकांचा प्रतिसाद फारच चांगला असतो. फक्त ज्यावेळी सरकारी योजनांबद्दल रस्तानाट्यातून ज्यावेळी प्रचार होतो तेव्हा या योजनांबद्दल संशय बाळगणाऱ्या लोकांकडून तावातावाच्या प्रतिक्रिया उमटतात. प्रदीप सांगतो, मात्र अशातऱ्हेच्या घटना अपवादानाचेच घडतात. लोक माहितीत रस दाखवतात व त्यासंबंधाने प्रश्‍न विचारतात तेव्हा त्यांना योग्य उत्तरे देणे हे देखील कलाकारांचे काम आणि कर्तव्य असते. रस्त्यानाट्यातून एचआयव्ही जनजागृतीचा एक टप्पा पार पडला आहे. दुसरा टप्पा पुढे सुरू होणार आहे. ‘कलाकार ’ संस्थेचे कलाकार त्याची वाट पाहात आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com