
8th Pay Commission Latest Update: केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. आठवा वेतन आयोग (8th Pay Commission) लागू करण्याच्या दिशेने केंद्र सरकारने पावले उचलली असून यामुळे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे वेतन, भत्ते आणि पेन्शनमध्ये मोठे बदल अपेक्षित आहेत. आठव्या वेतन आयोगाच्या (CPC) स्थापनेसाठी अर्थ मंत्रालयाने (Finance Ministry) प्राथमिक चर्चा सुरु केली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत एका लेखी उत्तरात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी ही माहिती दिली.
पीटीआय (PTI) च्या अहवालानुसार, अर्थ मंत्रालयाने प्रमुख विभाग, मंत्रालये आणि राज्य सरकारांसोबत आठव्या वेतन आयोगासंदर्भात सल्लामसलत सुरु केली आहे. यामध्ये संरक्षण मंत्रालय, गृह मंत्रालय, कार्मिक आणि प्रशिक्षण मंत्रालय तसेच विविध राज्य सरकारांचा समावेश आहे. लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरात अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केले की, सर्व विभागांकडून माहिती मागवण्यात आली असून आयोगाची औपचारिक अधिसूचना जारी झाल्यानंतर त्याचे अध्यक्ष आणि इतर सदस्यांची नियुक्ती केली जाईल. मात्र, अद्याप कोणत्याही नावांची घोषणा करण्यात आलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या आठव्या वेतन आयोगाच्या अधिकृत शिफारसी तयार झालेल्या नाहीत, परंतु त्यांची अंमलबजावणी पूर्वीच्या आयोगांनी ठरवून दिलेल्या पद्धतीनुसारच केली जाईल अशी अपेक्षा आहे. महत्त्वाचे म्हणजे, सातव्या वेतन आयोगाची (7th Pay Commission) स्थापना फेब्रुवारी 2014 मध्ये झाली होती, परंतु त्याच्या शिफारसी 1 जानेवारी 2016 पासून लागू करण्यात आल्या होत्या. याच वेळेनुसार, आठव्या वेतन आयोगाच्या शिफारसी 1 जानेवारी 2026 पासून लागू केल्या जाऊ शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे.
पंकज चौधरी यांनी नवीन वेतन आयोग लागू होण्याबाबतच्या प्रश्नावर सांगितले की, आठव्या केंद्रीय वेतन आयोगाकडून शिफारसी प्राप्त झाल्यानंतर आणि सरकारने (Government) त्या स्वीकारल्यानंतरच त्यांची अंमलबजावणी केली जाईल.
आठवा वेतन आयोग लागू झाल्यास देशभरातील सुमारे 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 65 लाखांहून अधिक पेन्शनधारकांना (Pensioners) याचा लाभ मिळेल. तथापि, जोपर्यंत नवीन वेतन आयोग आपल्या शिफारसी सादर करत नाही आणि सरकारकडून त्यांना मंजुरी मिळत नाही, तोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या पगारात किंवा पेन्शन रचनेत कोणताही बदल होणार नाही. मात्र, दर सहा महिन्यांनी होणाऱ्या महागाई भत्त्यातील वाढीचा (DA Hike) लाभ त्यांना मिळत राहील.
कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या वेतनात महागाई भत्त्याद्वारे (DA) सुधारणा केली जाते आणि दर 6 महिन्यांनी आढावा घेतल्यानंतर त्याची घोषणा केली जाते. डीए वाढ थेट AICPI-IW (औद्योगिक कामगारांसाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक) शी संबंधित असते. महागाई भत्त्यामध्ये साधारणपणे दरवर्षी जानेवारी आणि जुलैमध्ये सुधारणा केली जाते.
असा अंदाज आहे की, आठवा वेतन आयोग लागू झाल्यावर कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शनधारकांना मिळणारा डीए 60 टक्के पर्यंत पोहोचू शकतो. अलीकडील अहवालानुसार, मार्च 2025 मध्ये AICPI-IW निर्देशांक 143 होता, जो मे पर्यंत 144 वर पोहोचला आहे. अशा परिस्थितीत, डीए-डीआर 3 ते 4 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो, जो 1 जुलैपासून प्रभावी मानला जाईल. याबाबत सरकार सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये घोषणा करु शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.