पणजी: आठ संघटना एकत्रित येऊन युनायटेड ट्रायबल्स असोसिएशन अलायन्स (उटा) ही संघटना तयार झाली आहे. ती कोणी लोक एकत्रित येऊन झालेली नाही. या संघटनेची स्थापना ही समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी झाली, पण तिचा वापर प्रकाश वेळीप आणि गोविंद गावडे यांच्यासह इतरांनी स्वार्थासाठी व राजकारणासाठी केल्याचा आरोप गाकुवेध फेडरेशनचे अध्यक्ष गोविंद शिरोडकर यांनी केला आहे.
आझाद मैदानावर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी कांता गावडे, पांडुरंग कुंकळकर, प्रेमानंद गावडे, नीलेश गावडे, पोपट गावस, रामकृष्ण जल्मी यांची उपस्थिती होती.
शिरोडकर म्हणाले, उटाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांच्यासह गोविंद गावडे, विश्वास गावडे, दुर्गादास गावडे, उदय गावकर हे उटाच्या कार्यकारी मंडळावर होते. २००४ मध्ये एसटी समाजाच्या समस्या सरकार दरबारी सुटत नव्हत्या, त्यामुळे आठ संघटना एकत्रित येऊन ‘उटा’ची स्थापना झाली, परंतु कालांतराने आठपैकी सहा संघटनांना विश्वासात न घेता आजपर्यंत अध्यक्ष वेळीप हुकुमशाही पद्धतीने संघटनेचा कारभार चालवीत राहिले. एसटी समाजाच्या मागण्यांसाठी बाळ्ळीत आंदोलन झाले, त्यात दोन युवकांना आपला जीव गमावावा लागला, तरीही या समाजाला न्याय मिळाला नाही.
गोविंद गावडे हे मंत्रिमंडळात असेपर्यंत समाजाचे सर्व प्रश्न सरकारने सोडविल्याचे सांगितले जात होते. ‘उटा’च्या नियमानुसार कार्यकारिणी समितीवर तीन वर्षांचा एक कार्यकाळ पकडता दोनवेळा (सहा वर्षे) कार्यकाळ पूर्ण करू शकतो, त्यापेक्षा जास्तकाळ त्याला त्या पदावर राहता येत नाही. परंतु वेळीप हे २००४ पासून सातवेळा कार्यकारिणीवर राहिले आहेत, असे ते म्हणाले. याप्रसंगी कांता गावडे, प्रेमानंद गावडे यांनीही प्रकाश वेळीप व त्यांच्या कार्यकारिणीच्या कारभारावर टीका केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.