नागपूर: समाजात समस्या असतात. त्यामुळे व्यवस्थेतील त्रुटींविरोधात आंदोलने होणे स्वाभाविक आहे. परंतु, आंदोलनांतून समाजात कटुता व फूट निर्माण होण्याऐवजी समस्यांवर उपाय निघणे आवश्यक आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर महानगरतर्फे श्री विजयादशमी उत्सव नागपुरातील रेशीमबाग मैदानावर पार पडला. संघाच्या शताब्दी वर्षाच्या समारोपानिमित्त झालेल्या या सोहळ्यात ज्येष्ठ संपादक संजय गुप्ता प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, तर माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि इस्राईलचे पश्चिम-मध्य भारतातील महावाणिज्यदूत यानिव रेवाच यांची निमंत्रित अतिथी म्हणून उपस्थिती होती.
या वेळी भागवत यांनी देशातील आंदोलने, जागतिक राजकारण, तरुणांमधील व्यसनाधीनता, समाजमाध्यमांवरील आशय आणि विकासाच्या दिशेबाबत विचार मांडले. भागवत म्हणाले, की आंदोलन करताना संविधानाने निश्चित केलेल्या मर्यादा, सार्वजनिक चर्चेतील सभ्यता आणि शिष्टाचार यांचे पालन करणे आवश्यक आहे. भावना तीव्र असल्या तरी त्या व्यक्त करताना लोकशाही मूल्यांचा आदर राखला पाहिजे.
आंदोलनाच्या माध्यमातून समाजातील अंतर वाढविण्याऐवजी सामंजस्य आणि समस्यांच्या निराकरणाचा मार्ग शोधला पाहिजे. सत्तांतर घडवून आणल्याने मूलभूत प्रश्न सुटत नाहीत. आंदोलनांचा वापर राजकीय लाभासाठी झाल्यास समाजातील विविध घटकांमधील दरी अधिक वाढू शकते. आंदोलनांमुळे राजकीय किंवा सामाजिक संघर्ष तीव्र होऊन परस्परांविषयी द्वेष वाढत असेल, तर त्याचा मूळ उद्देशच बाजूला पडतो.
ओटीटीवरील आशयावर निर्बंध आवश्यक!
तरुण पिढीमध्ये वाढणाऱ्या व्यसनाधीनतेवर नियंत्रण मिळविण्यासाठी वेळीच प्रयत्न सुरू करणे आवश्यक असल्याचे डॉ. मोहन भागवत म्हणाले. विविध माध्यमांमधून मिळणारा आशय योग्य-अयोग्य यांचा विचार न करता तरुण आत्मसात करतात. त्याचे दुष्परिणाम लक्षात आल्यानंतर अनेक देशांनी काही नियम आणि निर्बंध लागू केले आहेत. भारतात विशेषतः ओटीटी माध्यमांवरील आशयाबाबत अशा प्रकारच्या नियंत्रणाची गरज समाजातून व्यक्त होत आहे. या विषयावर शासन आणि प्रशासनाने विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.