Mona Agarwal Gold Medal & Avani Lekhara Silver Medal: जपानमधील आयची-नागोया येथे सुरु झालेल्या आशियाई पॅरा गेम्स 2026च्या पहिल्याच दिवशी भारतीय पॅरा नेमबाजांनी शानदार कामगिरी करत तिरंगा उंचावला. महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात मोना अग्रवाल आणि अवनी लेखरा यांनी सुवर्ण आणि रौप्य पदकाची कमाई केली. या यशामुळे भारताला चालू स्पर्धेतील पहिली दोन पदके मिळाली.
फायनल सामन्यात धमाकेदार कामगिरी करत मोना अग्रवालने 250 गुणांसह सुवर्णपदक जिंकले. या कामगिरीसह तिने 2023 च्या हँगझोऊ आशियाई पॅरा गेम्समधील अवनी लेखराचा 249.6 गुणांचा विक्रम मोडीत काढून नवा आशियाई पॅरा गेम्स रेकॉर्ड बनवला. दुसरीकडे, अवनी लेखराने 249.6 गुणांसह रौप्यपदकावर आपले नाव कोरले.
फायनल फेरीपूर्वी पार पडलेल्या पात्रता फेरीतही मोनाने 629.1 गुणांसह अव्वल स्थान पटकावून चीनच्या झांग कुइपिंगचा जुना पात्रता विक्रम मोडला. 629.4 गुणांच्या जागतिक विक्रमापासून मोना अवघ्या 0.3 गुणांनी दूर राहिली. या पात्रता फेरीत अवनी लेखराने 626.4 गुणांसह दुसरे स्थान पटकावले.
दुसरीकडे, पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1 अंतिम फेरीत भारताचे पदक थोडक्यात हुकले. भारतीय खेळाडू महावीर स्वरुप उन्हाळकर 205.9 गुणांसह चौथ्या स्थानी राहिला, तर पहिल्यांदाच खेळणारा राकेश निदागुंडी 141.5 गुणांसह सातव्या स्थानी राहिला. यापूर्वी झालेल्या पात्रता फेरीत राकेश सातव्या आणि महावीर आठव्या स्थानी राहून फायनल फेरीत पोहोचले होते, तर भारताचा (India) आनंदा क्रिष्णन 605.2 गुणांसह 13व्या स्थानी राहिल्याने त्याची वाटचाल तिथेच थांबली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.