Saika Ishaque: वूमन्स प्रीमियर लीग 2023 स्पर्धेची दणक्यात सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने चांगली सुरुवात करताना पहिल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. मुंबईच्या या विजयात 27 वर्षीय सायका इशक हिने दमदार कामगिरी करताना विजयात मोलाचा वाटा उचलला.
तिने गुजरात जायंट्सविरुद्ध पहिल्याच सामन्यात खेळताना 4 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच तिने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध खेळताना 2 विकेट्स घेतल्या. त्यामुळे सध्या तिच्याकडे 6 विकेट्ससह पर्पल कॅप आहे.
सायका ही मुळची कोलकाताची असून बंगालकडून देशांतर्गत क्रिकेट खेळते. तिने कलिंघाट क्रिकेट क्लबसाठीही क्रिकेट खेळले आहे. तिला 13 फेब्रुवारी 2023 रोजी झालेल्या डब्ल्यूपीएल लिलावात मुंबई इंडियन्सने तिच्या मुळ किंमतीत म्हणजे 10 लाख रुपयात खरेदी केले होते. तीच आज संघासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे.
तिचा जन्म 8 ऑक्टोबर 1995 रोजी झाला असून ती सध्या कोलकातामध्येच राहते. दरम्यान ती डावखुरी फिरकी गोलंदाज असली, तरी तिच्याकडे फलंदाजी करण्याचीही क्षमता आहे. सायका ही बंगालकडून जवळपास सर्वच वयोगटातील क्रिकेट खेळली आहे.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मधल्या काळात तिने लय गमावल्याने क्रिकेट सोडण्याचाही विचार केला होता. पण माजी क्रिकेटपटू मैथू मुखर्जी यांनी तिला प्रेरणा दिली आणि तिला बंगालचे माजी फिरकीपटू शिवसागर सिंग यांच्याकडून मार्गदर्शन घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार तिने त्यांच्याकडे जाऊन तिच्या गोलंदाजी शैलीवर काम केले. आता तिला याचा फायदा झाल्याचे दिसून येत आहे.
तिने देशांतर्गत क्रिकेटमध्येही दमदार कामगिरी केली आहे. तसेच ती भारतीय अ संघाकडूनही खेळली आहे. तिने एकदा बंगालकडून पंजाबविरुद्ध टी20 सामना खेळताना हरमनप्रीत कौर आणि यास्तिका भाटीया यांना लागोपाठच्या चेंडूंवर बाद केले होते.
तिच्या गोलंदाजीत असलेली विविधता तिला इतरांपेक्षा वेगळे बनवत असून आता तिला डब्ल्यूपीएलमधून तिच्यातील कौशल्य दाखवण्यासाठी चांगला स्टेज मिळाला आहे. आता ती यापुढेही तिची लय अशीच ठेवणार का हे पाहावे लागेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.