Hardik Pandya Injury Update Out for Six Months: टीम इंडिया सध्या न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी मालिकेची जय्यत तयारी करत असतानाच संघासाठी एक अत्यंत वाईट आणि चिंताजनक बातमी समोर आली. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याची दुखापत आणखी गंभीर झाल्यामुळे त्याला पुढील तब्बल सहा महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब राहावे लागणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएल 2026च्या शेवटी दुखापत झाल्यापासून हार्दिक मैदानाबाहेर आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात त्याचे पुनरागमन अपेक्षित होते, परंतु सराव करताना त्याची दुखापत बळावली. 'दैनिक जागरण'च्या रिपोर्टनुसार, पांड्या सध्या स्ट्रेस इंज्युरीचा सामना करत आहे. सध्या तो बंगळुरु येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये आहे.
वैद्यकीय नियमांनुसार, हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) मैदानात परतण्यासाठी आणि साध्या धावण्याच्या सरावासाठी अजून किमान तीन आठवडे प्रतीक्षा करावी लागेल. त्यानंतर पुढील आठ आठवड्यांत त्याचा रनिंग लोड हळूहळू वाढवला जाईल. जानेवारी अखेरपर्यंत तो पूर्णपणे फिट असेल, परंतु याच काळात फेब्रुवारीमध्ये टीम इंडिया कसोटी मालिका खेळणार असला तरी पांड्या कसोटी संघाचा भाग नाही. तसेच यादरम्यान विजय हजारे ट्रॉफी आणि सयद मुश्ताक अली ट्रॉफीसारख्या देशांतर्गत स्पर्धाही संपलेल्या असतील, ज्यामुळे तो थेट आयपीएल 2027 मध्येच पुनरागमन करताना दिसेल.
2027 मधील आयसीसी वनडे वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून बीसीसीआय आणि टीम मॅनेजमेंट त्याच्या फिटनेसबाबत कोणतीही घाई करण्याच्या मनस्थितीत नाही, जेणेकरुन तो पूर्णपणे तंदुरुस्त होऊन पुनरागमन करु शकेल. त्याच्या या दीर्घकालीन अनुपस्थितीमुळे संघ व्यवस्थापन आता नीतीश कुमार रेड्डी आणि शिवम दुबे यांसारख्या पर्यायांना संधी देत असून, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत या युवा खेळाडूंवर मोठी जबाबदारी असणार आहे.