सतराव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत केवळ शारीरिक आरोग्य महत्त्वाचे मानले जायचे. शरीर निरोगी, सुदृढ, शक्ती संपन्न आणि धडधाकट असावे असा आग्रह मानला जायचा. परंतु त्यानंतरच्या काळात शारीरिक आरोग्याइतकेच मानसिक आरोग्य सुद्धा चांगले हवे असे मानले जाऊ लागले. इतकेच नव्हे तर शारीरिक आरोग्य पेक्षाही मानसिक आरोग्य अधिक चांगले हवे असे विचारवंत म्हणू लागले.
'विल्यम जेम्स' या मानसशास्त्रज्ञाने 'मानसिक आरोग्य' ही संकल्पना प्रथम मांडली. एकंदरीत परिस्थितीचा सारासार विचार करून समस्येवर योग्य तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणे, त्याचप्रमाणे आपले भावनिक मानसिक संतुलन सांभाळून आपले व्यक्तिमत्व अभेद्य ठेवणे, ही गोष्ट मानसिक आरोग्यात महत्त्वाची मानली जाते. मन हे सुदृढ, निरोगी, खंबीर असणे ही कल्पना मानसिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरते. शरीराप्रमाणे मनालाही आजार व विकृती होऊ शकते, शरीराप्रमाणेच मनाच्या आजारांची व विकृतींची परीक्षा केली जाऊ शकते, निदान योग्य केले जाऊ शकते त्याचप्रमाणे शरीराच्या आजारांप्रमाणे मनाच्या आजारांवरही उपचार केले जातात.
• मानसिक आरोग्याची लक्षणे-
एखादी व्यक्ती मानसिक दृष्ट्या संपन्न आहे असे म्हणताना त्यामध्ये कोणती लक्षणे असू शकतील हे पाहणे आवश्यक ठरते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने मानसिक आरोग्य कसे प्राप्त करून घ्यावे व ते कसे टिकवून ठेवावे ही गोष्ट शिकणे सुलभ जाईल.
1) स्वतःला जाणून घेणे- व्यक्तीला आपल्या सामाजिक, आर्थिक परिस्थितीची योग्य जाणीव असणे, आपल्या मर्यादा ओळखूनच इच्छा- आकांक्षांचा स्वीकार करणे, स्वतःच्या कमतरतेवर मात करून पुढे जाणे, आत्मनिरीक्षण करणे, आपल्या आचार-विचारांचा मागवा घेणे, स्वतःतील दोष- त्रुटी शोधून त्यांचे निराकरण करण्याचे उपाय शोधणे या गोष्टींमुळे व्यक्ती स्वतःला समजून घेऊ शकते.
2) समायोजन क्षमता- समायोजन म्हणजे अडचणी करण्याची प्रवृत्ती बदलत्या काळाप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला थोड्याफार प्रमाणात बदलावे लागते. पुष्कळदा आपली महत्त्वकांक्षा प्रेरणा योग्य आणि व्यवहार्य नाही हे दिसून येते. त्यातून चिंता -विकृती निर्माण होते. म्हणूनच आपल्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याअगोदर काळानुरुप बदलणे आवश्यक ठरते. कोणत्या गोष्टी टाळाव्यात, प्रसंगी कुठे तडजोड करावी, कुठे माघार घ्यावी या गोष्टी ज्याला पूर्णपणे कळतात अशी व्यक्ती आपल्या तात्पुरत्या अपयशाने दुःखी, कष्टी होत नाही.
3) चिंता- भीती टाळण्यापेक्षा त्यांचा स्वीकार करणे-
आपल्या जीवनात चिंता- भीती निर्माण करणारे प्रसंग वारंवार येतात. त्यावेळी चिंता व भीतीला घाबरून जाण्यापेक्षा किंवा टाळण्यापेक्षा त्यांना धीटपणे सामोरे जाण्याने व्यक्तीची चिंता व भीती सहन करण्याची व त्यावर मात करण्याची मानसिक शक्ती वाढते.
4) स्वतःला चांगल्या व उपयुक्त कामात गुंतवून घेणे-
बऱ्याच वेळेला मनाला काही काम नसले म्हणजे मनात भलते सलते विचार थैमान घालू लागतात. म्हटलेच आहे की,'रिकामे मन म्हणजे सैतानाचे घर'. चिंता व भयाचे प्रमाण कमी करायचे असेल तर स्वतःला एखाद्या उपयुक्त कामात मग्न ठेवणे आवश्यक आहे. उपयुक्त व आवडीच्या कामामुळे भीती-चिंता कमी होतेच शिवाय आपण एखादे विधायक कार्य केल्याचे मानसिक सुखही मिळते.
5) मनावर संयम ठेवणे- आपल्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करताना अधूनमधून समोरच्याशी संघर्ष होण्याची शक्यता असते. त्यातूनच राग- द्वेष -दुःख -मत्सर -शत्रुत्व इत्यादी भावना तयार होतात. त्यामुळे याबाबतीत आपल्या मनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. भावनाविवश न होता शांत वृत्तीने सारासार विचार करणे आवश्यक ठरते. मनावर संयम राहिला नाही तर त्यातून पुढे चिंता व भीती तयार होतात. शिवाय भावनांच्या अतिरेकामुळे आपण पुढील काम करण्यासाठी एकाग्र होऊ शकत नाही. कामाचे स्वरूप विस्कळीत होऊ शकते. त्यामुळे भावनांचा अतिरेक न होऊ देणे हेच योग्य.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.