Monsoon Skin Care Tips: शरीराच्या कोणत्याही भागात संसर्ग आणि पुरळ येऊ शकतात. यामुळे खाज सुटणे, वेदना होणे, जळजळ होणे आणि तो भाग लाल होणे अशा समस्या उद्भवू शकतात. पुरळ येणे हे अनेक समस्यांचे कारण असू शकते.
गोवा हे दमट हवेचे ठिकाण असल्याने पावसाळ्यात अनेकांना त्वचेच्या समस्यांना सामोरे जावे लागते. यात फंगल इन्फेक्शन सध्या खूपच सामान्य झाले आहे. या संसर्गाबाबत सांगताना त्वचारोग तज्ज्ञ डॉ. वृंदा कुलकर्णी म्हणतात की, फंगल इन्फेक्शन सध्या अनेकांना होत आहे. फंगल इन्फेक्शन म्हणजे एक प्रकारची बुरशी आहे. यामागील कारणे जाणून घेऊया.
वातावरणातील बदल, दमट वातावरण, हवेतील प्रदूषण, चुकीचा आहार, पालेभाज्या, फळे, यांची आहारातील कमतरता यामुळे त्वचेच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. खाज येण्याबरोबरच काही वेळा अॅलर्जीचाही सामना करावा लागतो. हवामानातील थोडासा बदल किंवा धूळ आणि मातीचा परिणाम लगेच त्वचेवर दिसून येतो.
पावसाळा सोबत त्वचेच्या अनेक समस्या घेऊन येतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत या समस्या उद्भवू शकतात. याचा कोणालाही त्रास होऊ शकतो, म्हणून यावर त्वरित उपचार करणे देखील आवश्यक आहे. पावसात त्वचेच्या सामान्य समस्या आणि त्यावरील उपचारांबद्दल काही खास टिप्स जाणून घेऊया.
एक्जिमा
पावसाळ्यात त्वचेशी संबंधित हा आजार होण्याची शक्यता वाढते. यामुळे त्वचेवर पुरळ, खाज आणि लालसरपणा येतो. बऱ्याच प्रकरणांमध्ये, यामुळे जळजळ देखील होते. ज्या लोकांची त्वचा संवेदनशील असते त्यांना हा संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यावर औषधे देऊन उपचार केले जातात.
खरुज
खरुज हा संसर्गजन्य रोग आहे. हा संसर्ग त्वचेत माइट्सच्या प्रवेशामुळे होतो. हा माइट त्वचेमध्ये राहू लागतो आणि तिथेच अंडी घालतो, ज्यामुळे संसर्ग होतो. खरुजामुळे त्वचेवर खाज सुटणे, छिद्र तयार होणे, गुठळ्या तयार होणे अशा समस्या उद्भवतात. पावसाळ्यात आढळणारे दमट हवामान त्याच्या वाढीसाठी कारणीभूत असते. बाधित भागावर औषध लावून या संसर्गावर उपचार केले जातात.
हवामान कोणतेही असो, त्वचेचा संसर्ग कधीही होऊ शकतो. अशा परिस्थितीत, काही घरगुती उपायांमुळे संसर्ग लवकर बरा होऊ शकतो. काही घरगुती उपाय करून आराम मिळण्यासाठी खास टिप्स त्वचारोग तज्ज्ञ डॉ. वृंदा कुलकर्णी यांनी दिल्याआहेत. खाज सुटणे आणि त्वचेवर पुरळ येण्यावर कोणते घरगुती उपाय आहेत ते जाणून घेऊया.
दही
दही किंवा इतर प्रोबायोटिक उत्पादनांमध्ये चांगले बॅक्टेरिया असतात, ते खराब बॅक्टेरिया काढून संसर्गाशी लढण्यास मदत करतात.
ऍपल सायडर व्हिनेगर
या व्हिनेगरमध्ये अँटीफंगल गुणधर्म असतात. एका भांड्यात कोमट पाणी घ्या आणि त्यात एक चमचा व्हिनेगर घाला. कापसाच्या साहाय्याने ते प्रभावित भागावर लावा. काही दिवसातच संसर्ग निघून जाईल.
हळद
कोमट पाण्यात हळद पावडर मिसळून पेस्ट तयार करा. ते संक्रमित भागावर लावा आणि त्यावर कापूस ठेवून पट्टीने बांधा. हे दिवसातून दोनदा करा. यामुळे इन्फेक्शन तर दूर होईलच पण त्वचेवर डागही येणार नाहीत.
लसूण
लसणामध्ये केवळ बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ नाही तर प्रतिजैविक गुणधर्म देखील आहेत. लसणाच्या दोन पाकळ्या ठेचून त्यात ऑलिव्ह ऑईल मिसळा आणि संसर्ग झालेल्या भागावर लावा. तसे, जर लसूण आहाराचा भाग बनवला तर संसर्ग होण्याची शक्यता देखील कमी होते.
कोरफड जेल
कोरफडीचा वापर त्वचेतील खाज, पुरळ, जळजळ आणि वेदना यासारख्या समस्या दूर करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्मांनी समृद्ध कोरफड त्वचेच्या अनेक समस्या दूर करू शकते.
कापूर आणि नारळ तेल
त्वचेवर संसर्ग झाल्यामुळे खूप खाज येते. अशा परिस्थितीत कापूर आणि खोबरेल तेल तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. कापूर बारीक करून त्यात खोबरेल तेल मिसळून पेस्ट तयार करा आणि संसर्ग झालेल्या भागावर लावा. ही पेस्ट दिवसातून किमान दोनदा लावा.
कडुलिंबाची पाने
अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-व्हायरल घटक असलेली कडुलिंबाची पाने त्वचेच्या संसर्गाचा धोका कमी करतात. कडुलिंबाच्या पानांमध्ये असलेले गुणधर्म त्वचा खोलवर जाऊन साफ करण्यास मदत करतात.
अशाप्रकारे टाळा त्वचेच्या समस्या
आपले कपडे आणि शूज स्वच्छ ठेवा.
तुमचे शरीर नेहमी कोरडे ठेवा.
पावसात भिजत असाल तर घरी आल्यावर अंघोळ करा.
इतर लोकांचे कपडे आणि शूज वापरणे टाळा.
पावसात शक्यतो अँटीबॅक्टेरियल साबण वापरा.
शरीरावर नेहमी पावडर वापरा जेणेकरून ओलावा शोषून घेता येईल.
न धुतलेले कपडे किंवा मोजे वापरणे टाळा
तुम्ही स्पोर्ट्स शूज घातल्यास ते स्वच्छ आहेत याची खात्री करा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.