मडगाव- पणजी रस्त्याला ‘आगशी’ नावाचं छोटंसं देखणं गाव आहे. दोन हायवेनीं गावाचे दोन तुकडे केले असले तरी गावाच्या एका बाजूला झुआरी नदीचं विस्तीर्ण पात्र आहे ज्यामुळे आगशी गाव अधिकच सुंदर दिसते. या नदीच्या किनाऱ्यावर इथले शेतकरी भाजीपाल्याची लागवड करतात. त्यामुळे मडगावला जाताना ताजी ताजी भाजी मिळते. याच रस्त्याला गोवन पद्धतीची छोटी छोटी रेस्टोरंट आहेत. जिथे भाजीपाव, मिरची भजी, बन्ससारखे स्थानिक पदार्थ मिळतात. पण तुमचं लक्ष वेधून घेतो. तो इथला 'चोरीस पाव' हा पदार्थ मिळतो. (Gorge on street food of Goa)
मी तशी पक्की शाकाहारी पण गोव्यात येऊन मासळी खायला शिकले. यापुढे अजून काही मांसाहारी खाण्याचे माझे धेर्य झालं नाहीये. पण वेगवेगळ्या प्रांतातल्या खाद्यसंस्कृतीचा अभ्यास करताना तिथल्या सर्व पदार्थाना समजून घेतलं पाहिजे. याच उद्देशाने चोरीस सारख्या साठवणुकीच्या पदार्थाबद्दल जाणून घ्यावंसं वाटलं. आगशीच्या रस्त्याने जाताना कॅथलिक घरांच्या बाहेर टेबल मांडून फूड स्टॉल लावलेले दिसतात. जवळ गेल्यावर लक्षात येतं की हे चोरीस पावाचे स्टॉल आहेत. चोरीस पाव हा खास पोर्तुगीज पदार्थ. पोर्तुगीज्यांच्या काही रेसिपी आजही इथल्या कॅथलिक ख्रिश्चन घरांमध्ये केल्या जातात चोरीस हि त्यातलीच एक. cheris-pork sausageभारतात सर्वप्रथम पावाची निर्मिती गोव्यात पोर्तुगीजांकडून झाली. त्यामुळे गोव्यातल्या खाद्यसंस्कृतीमध्ये पावाला विशेष महत्व आहे. ब्रेकफास्टपासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीचे पाव इथे खाल्ले जातात. चोरीस हा मांसाहारी स्नॅक्स प्रकारात मोडणारा पदार्थ. यातला चोरीस हा ‘सॉसेज’ चे एक प्रकार आहे. बीफ, पोर्क, चिकन, प्रॉन्स यापासून तयार केलेले वेगवेगळे सॉसेज म्हणजेच चोरीस. या सॉसेजचे बारीक पातळ काप करून कधी ते छान खरपूस फ्राय करून तर कधी तसेच खाल्ले जातात. पावात कांदा, गाजर यांच्या बरोबर सलाड बरोबर सॉसेजचे पातळ काप घालून सोबत वेगवेगळ्या चटण्या घालून खायला दिले जाते.
चोरीस हा मूळचा स्पॅनिश-पोर्तुगीज शब्द. विशेषतः पोर्क सॉसेजला हा शब्द वापरला जातो. पोर्क मटणात लसूण, आलं, व्हिनेगर आणि लाल मिरची घालून हे सगळं (पोर्क मटणासहित) बारीक एकजीव वाटून घेतलं जातं. मग ते तीन महिने उन्हात वळवलं जातं. पोर्तुगीज पद्धतीनं बनवताना यात या साऱ्या मसाल्यांच्या बरोबरीने वाईन आणि मिरी घातले जातात. लोकांनी आता चवीप्रमाणे मसाल्यांमध्ये बदल केले आहेत. आता तर खास गोवन पद्धतीचे मसाले घालून म्हणजेच दालचिनी, लवंगा, हळद, लाल मिरच्या, आलं- लसूण या सगळ्या मसाल्यांपासून झणझणीत चेरीस बनवले जातात. हे बारीक वाटलेलं मिश्रण वाळवून त्याच्या वेगवेगळ्या आकाराच्या माळा करून विकायला ठेवतात. त्यातलं तुम्हाला हवं तितकं विकत घेऊन ते तुम्ही घरी साठवून ठेवू शकता. विकायला ठेवलेल्या या सॉसेजच्या माळा वेगवेगळ्या आकाराच्या सुंदर दिसतात. काही माळा तर रुद्राक्षाच्या मालांसारख्याच दिसतात. पावसाळी हवेत चेरीस पाव चवीने खाल्ला जातो.
सोरपोतेल आगशी भागातच पावाबरोबर ‘सोरपोतेल’ नावाचा एक वेगळा पदार्थ खायला मिळतो. हा देखील पोर्तुगीज पदार्थ आहे. पोर्कच्या मटणाची चमचमीत बनवलेली भाजी म्हणजे सोरपोतेल. आगशी गावातील कॅथलिक महिला चेरीसपाव बरोबर सोरपोतेल ही विकायला ठेवतात. कांदा, टोमॅटो, आलं लसूण, व्हिनेगर, लाल मिरच्या आणि गरम मसाला यात शिजवलेलं पोर्क मटण म्हणजे सोरपोतेल. खवय्ये मंडळी या रस्त्याने जाताना गाडी रस्त्याला थांबवून हे पदार्थ खाऊनच मग पुढे जातात.
इतर शहरांच्या तुलनेनं पणजीत तुम्हाला तशा ‘ स्ट्रीटफूड’ च्या गाड्या दिसत नाहीत. शहराची रचनाच अशी आहे की अगदी सहजपणे झटपट खाता येईल अशी छोटी छोटी अनेक कॅफे, रेस्टोरंट इथे आहेत. शहरातल्या काही ठराविक भागात शेवपुरी, रस्सा ऑम्लेटच्या गाड्या आहेत. पण यापेक्षा वेगळं काही प्रमुख रस्त्यावरचे छोटेसे कॅफे काही वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांसाठी प्रसिद्ध आहेत. इथे तुम्हाला अस्सल गोवन पदार्थ खायला मिळतात.
18 जून रोडवरील ‘ चायपानी’ पणजीत 18 जून रस्ता हा महत्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावर अनेक महत्वाची दुकानं आणि रेस्टोरंट आहे. कायम गजबजलेल्या या रस्त्याच्या एका चौकात ‘चायपानी ‘ नावाच्या छोटाशा स्टॉलवर ‘बोडाभजी’ म्हणजेच म्हैसुरी गोड भजी मिळते. नारळाच्या चटणीबरोबर थोडीशी गोडसर भजी भारी लागते. सकाळी ब्रेकफास्टच्या वेळी गरम गरम पोहे - उपमा देखील मिळतो. अगदी घाई गडबडीत असताना बसून खायला वेळ नसताना चायपानी हा अतिशय उत्तम पर्याय आहे.
डिसील्वाची कटलेट्स पणजीत मिरामार बीचवर गेल्यावर चाट, शेवपुरी आणि स्नॅक्सच्या अनेक गाड्या दिसतात. चौपाटीसारखे चटपटीत पदार्थ इथे या गाड्यांवर मिळतात. शाकाहारीसाठी हि चौपाटी चांगली आहे. पण तुम्ही नॉनव्हेज पदार्थ असाल तर तुमच्यासाठी इथे अजून एक चांगला पर्याय आहे. याच रस्त्याला म्हणजेच मिरामार सर्कलवरून थोडंसं पुढे गेल्यावर डाव्या हाताला विशेषतः संध्याकाळच्या वेळेस अनेक टू व्हीलर, फोर व्हीलरगाड्या थांबलेल्या दिसतात. तिथेच डिसिल्वाचा छोटासा स्टॉल आहे. या स्टॉलवर कटलेट तब्ब्ल १२० प्रकार खायला मिळतात. बीफ कटलेटसाठी प्रसिद्ध अशा स्टॉलवर खवय्ये गर्दी करतात. बीफच्या मोठ्या तुकड्याला आधी आलं -लसूण पेस्ट आणि व्हिनेगर लावून मॅरीनेट करून मग रव्यामधून घोळून तेलात डीप फ्राय केला जातो. लोकल कडक पावत कांदा,गाजर, मियॉनीज आणि बीफचा तळलेला कुरकुरीत तुकडा घालून दिलं जातं. बीफ चिली फ्राय, पोर्क क्रीम चॉप सारखे वेगळे पदार्थ इथे मिळतात. ‘फिशिटेरिन’ खवय्यांसाठी खास चविष्ट फिश कटलेट देखील इथे मिळतात. समुद्र किनाऱ्यावर भटकंती झाल्यावर भूक लागली की अनेकांचे पाय आपोआप डिसील्वाची कटलेट खायला वळतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.