Mercury Moon Conjunction in Virgo: ज्योतिष शास्त्रानुसार 11 सप्टेंबरच्या संध्याकाळी चंद्राने सिंह राशीतून निघून कन्या राशीत प्रवेश केला, जिथे बुद्धिमत्ता आणि तर्काचा कारक मानला जाणारा बुध ग्रह आधीपासूनच विराजमान आहे. कन्या राशीत चंद्र आणि बुध एकत्र आल्याने दोन्ही ग्रहांची युती निर्माण झाली. ज्योतिष सिद्धांतानुसार चंद्र बुधाला आपला शत्रू मानत नाही, परंतु बुध मात्र चंद्राला आपला परम शत्रू मानतो. विशेष म्हणजे चंद्र हा बुधाचा पिता मानला जातो, तरीही बुधाची ही एकतर्फी शत्रूता राशींवर अत्यंत नकारात्मक प्रभाव टाकते.
या खगोलीय घडामोडीमुळे ग्रहांची ही युती 'मतिभ्रम योग' म्हणून ओळखली जाते. चंद्र हा मनाचा तर बुध हा बुद्धीचा कारक असल्याने या दोघांचा थेट संबंध मानवी मनाशी आणि निर्णयक्षमतेशी असतो. या युतीचा प्रभाव सर्वच राशींच्या मानसिक स्थितीवर होणार असला, तरी तीन विशिष्ट राशींच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक आणि कौटुंबिक बाबतीत अत्यंत आव्हानात्मक ठरु शकतो.
पहिली राशी म्हणजे मेष राशी. मेष राशीच्या व्यक्तींसाठी ही युती सहाव्या स्थानात होत आहे, जे स्थान आजार, कर्ज आणि शत्रूचे मानले जाते. या काळात मन आणि बुद्धीतील संघर्षामुळे मानसिक तणाव मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबत विनाकारण वाद किंवा क्लेश होण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो, ज्यामुळे गैरसमज वाढतील. याशिवाय अचानक उद्भवणारा एखादा मोठा खर्च तुम्हाला कर्ज घेण्यास भाग पाडू शकतो, त्यामुळे आर्थिक व्यवहारात संयम बाळगणे गरजेचे आहे.
दुसरी राशी म्हणजे सिंह राशी. सिंह राशीसाठी हा गोचर दुसऱ्या स्थानात होत आहे, जे स्थान धन, वाणी आणि कुटुंबाशी संबंधित आहे. येथे बुध मजबूत स्थितीत असला तरी चंद्राच्या आगमनाने मतिभ्रम निर्माण होऊन तुमच्या विचारांवर आणि बोलण्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. व्यावसायिक करारात किंवा महत्त्वाच्या बोलणीदरम्यान संयम सुटल्यास मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. या काळात कोणतीही मोठी गुंतवणूक (Investment) करणे टाळावे, तसेच येणाऱ्या पैशांचा प्रवाह अचानक रोखला जाण्याची शक्यता असल्याने आर्थिक शिस्त बाळगणे हितकारक ठरेल.
तिसरी राशी म्हणजे कुंभ राशी. कुंभ राशीच्या जातकांसाठी ही युती आठव्या स्थानात होत आहे, जे स्थान संकट, अनिश्चितता आणि गूढ गोष्टींचे प्रतिनिधित्व करते. हा मतिभ्रम योग तुमच्या निर्णयक्षमतेवर परिणाम करुन योग्य आणि अयोग्य यातील फरक ओळखण्यात चूक घडवून आणू शकतो. मनात अकारण घबराट किंवा भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते. नवीन व्यवसाय करार किंवा भागीदारी करण्यासाठी हा काळ अजिबात योग्य नाही, कारण यात फसवणूक होण्याची शक्यता अधिक आहे. नोकरी करणाऱ्या लोकांचे मन कामावरुन उडू शकते, त्यामुळे अत्यंत शांततेने हा काळ काढणे गरजेचे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.