Sanjivani
Sanjivani 
गोवा

संजीवनीबाबत सरकारला उशिरा आले शहाणपण!

Dainik Gomantak

फोंडा

मगो पक्षाचे नेते तथा गोव्याचे भाग्यविधाते व पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतानाच धारबांदोड्यात संजीवनी साखर कारखान्याची निर्मिती केली. राज्यातील एकमेव असा हा साखर कारखाना त्यानंतर दुर्लक्षितच राहिला. मात्र, आता हा कारखानाच बंद करण्याचा विचार सरकार दरबारी चालला असतानाच भारतीय जनता पक्षाचे नेते ॲड. नरेंद्र सावईकर आणि भाजपच्या कोअर कमिटीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन संजीवनी बंद करू नये अशी जोरदार मागणी केली आहे. या मागणीतून काय निष्पन्न होणार हे येणारा काळच सांगू शकेल, पण राज्याच्या मंत्रिमंडळात दीर्घकाळ प्रतिनिधीत्व केलेले आणि सहकारमंत्री म्हणून संजीवनीचा ताबा सांभाळलेले मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी संजीवनी, ऊस उत्पादक आणि सरकारचे धोरण व आताची मागणी याविषयी भाष्य करताना सरकारला उशिरा आलेले शहाणपण अशी टिप्पणी केली आहे.
संजीवनी, ऊस उत्पादक आणि सरकार या त्रिसूत्रीवरच या साखर कारखान्याचे भवितव्य अवलंबून आहे. यासंबंधी बोलताना सुदिन ढवळीकर म्हणाले की, संजीवनी साखर कारखाना हा गोव्याच्या अस्मितेचे प्रतीक आहे. आतापर्यंत आपण हेच सरकारला सांगण्याचा प्रयत्न केला. यात कोणतेच राजकारण नाही. हा विषय आपण विधानसभेतही वेळोवेळी मांडला आहे. कारण या संजीवनीवर सद्यस्थितीत दीड हजार कुटुंबे अवलंबून आहेत. असे असताना वर्षाला पाच कोटी रुपये या एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या शेतकऱ्यांसाठी खर्च करणे ही मोठी बाब असूच शकत नाही. शेतकऱ्यांचे हीत लक्षात घेऊन तोडगा काढण्याची मानसिकता आजच्या घडीला सरकारकडे नाही, याचेच आपल्याला वाईट वाटते, असे सुदिन ढवळीकर यांनी नमूद केले आहे.
मगो पक्षाचे नेते भाऊसाहेब बांदोडकर यांनी हा कारखाना पूर्ण विचारांतीच सुरू केला होता. त्यानंतर आलेल्या प्रत्येक मुख्यमंत्र्याने देखील हा कारखाना चालवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर त्या त्या वेळच्या कृषीमंत्री व सहकारमंत्र्यानी या प्रकाराला समर्थनच केले. फक्त आताचे मुख्यमंत्री व मंत्री सोडून. शशिकलाताई काकोडकर, प्रतापसिंह राणे, रवी नाईक, डॉ. विली डिसोझा, दिगंबर कामत, मनोहर पर्रीकर या सर्वच मुख्यमंत्र्यांनी व त्याचबरोबर सर्व सहकारमंत्र्यांनी हा कारखाना चालवण्यासाठी वेळोवेळी योगदान दिले. त्यामुळेच 2017 पर्यंत हा कारखाना अनेक अडचणींवर मात करून शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि गोव्याच्या समृद्धीसाठी झटला. आज ही सजगता आणि दूरदृष्टी आजच्या मुख्यमंत्र्यांसह सहकारमंत्र्यामध्ये तसेच इतर मंत्र्यांमध्ये दिसून येत नाही, याचेच आपल्याला वाईट वाटते, असे सुदिन ढवळीकर यांनी नमूद केले आहे.
ज्यावेळेला आपण सहकारमंत्री होतो त्यावेळी देखील असाच प्रकार उद्‌भवला होता. पण तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांचे मार्गदर्शन व सहकार्य यामुळे आपण सर्व अडचणींवर मात करून कारखाना सुरू ठेवला व शेतकऱ्यांना थोडी फार मदत करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळीसुद्धा भाजपमधील दोन दिग्गज आणि अनुभवी शेतकरी केशव सावईकर व विठ्ठल खांडेपारकर आणि इतर अनुभवी शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन ऊस उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न केला. हा ऊस किती वाढला आणि अन्य कोणते पर्याय योजले हा वेगळा विषय असून या ज्येष्ठ शेतकऱ्यांचे मार्गदर्शन आपण विसरू शकत नसल्याचे सुदिन ढवळीकर म्हणाले. विशेष म्हणजे शेतकरी कुटुंबासाठीच मगो पक्षाने हा साखर कारखाना सुरू केला, हे कुणीही नाकारू शकत नाही.
२०१२ साली तत्कालीन सहकारमंत्र्याने मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या सहकार्याने साखर कारखाना उर्जितावस्थेत आणण्यासाठी पाच कोटी रुपये देण्याचे कबूल केले होते व त्यासंबंधीचे बजेटही मंजूर करून घेतले होते. कारखाना नूतनीकरणाचा संपूर्ण प्रकल्प अहवाल वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून बनवून घेण्यात आला होता, पण त्याचे पुढे काय झाले? त्यापूर्वीही आपण सहकारमंत्री असताना शालिनीताई पाटील साखर कारखाना आणि उगार साखर कारखाना यांच्याकडून संजीवनी व्यवस्थित चालवण्यासाठी प्रस्ताव मांडले होते. पण नंतरच्या काळात या सर्व बाबी बासनात गुंडाळून ठेवण्यात आल्या. आज काही आमदार शेतकरीपुत्र असल्याचे सांगतात, मात्र या लोकांनाही शेतकऱ्यांच्या समस्या समजू नयेत, हे दुर्दैव आहे.
आज आनंदाची बाब म्हणजे भाजपच्या कोअर कमिटीचे डोळे उघडले व नरेंद्र सावईकर आणि शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले. साखर कारखान्यासंबंधी चर्चाही झाली. या चर्चेतून काय निष्पन्न होईल, याची आपल्याला कल्पना नाही मात्र शेतकऱ्यांचा या लोकांवर विश्‍वास आहे, कारण भाजप मंडळ हा साखर कारखाना कधीही बंद होऊ देणार नाही आणि जे कुणी आडकाठी आणील त्याला त्याची योग्य जागा दाखवून देण्याची तयारीही आहे. कारण याच शेतकऱ्यांनी नरेंद्र सावईकर व भाजपच्या प्रतिनिधींना भरभरून मते देऊन निवडून दिले आहे, हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही, असे सुदिन ढवळीकर म्हणाले.

‘कारखाना चालू करून शेतकऱ्यांची समस्या सोडवा’
उशिरा का होईना भाजपला शहाणपण सुचले, त्याला आता तडा जाऊ देऊ नका, अशी विनंती करून यंदाच्या हंगामात पाच कोटी रुपये खर्च करून हा साखर कारखाना चालू करावा आणि शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या सोडवाव्यात अशी जोरदार मागणी आमदार सुदिन ढवळीकर यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

‘’दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी सेलिब्रिटी अन् सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तितकेच जबाबदार’’, पतंजली प्रकरणात SC ची कठोर टिप्पणी

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

अमेरिकेनं बनवलं AI द्वारा कंट्रोल होणारं पहिलं फायटर जेट F16; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

SCROLL FOR NEXT