मोरजी : बैलपार कासारवर्णे नदीचे पाणी पंपहाऊस उभारुन इतरत्र वळवले जात असल्याने भविष्यात पूर्ण पेडणे तालुक्यावर जल संकट उभे राहण्याची शक्यता आहे. तालुक्यात येऊ घातलेल्या प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासणार हे माहित असताना आधीच तशी व्यवस्था न केल्यामुळे तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रकार सरकारने चालवला आहे,असा आरोप येथील शेतकऱ्यांनी केला आहे.
बैलपार नदीच्या दोन्ही काठांवर शेतकऱ्यांच्या (Farmer) शेती आणि बागायती आहेत. ही शेती याच पाण्यावर अवलंबून आहे. शेतीला प्राधान्य देण्यासाठी सरकारने शेतीच्या प्रभाव क्षेत्रात जलस्त्रोत खात्यातर्फे कालवे बांधून पाणी पुरवले आहे. पण, तिळारीच्या कालव्यांना काही ठिकाणी भगदाड पडून गळती लागल्याने पाणी वाया जाते. ते कालवे दुरुस्त करण्याचे सौजन्य आजवर जलस्त्रोत खात्याने दाखवलेले नाही. मे महिन्यात या नदीची पातळी आटलेली असते, परंतु यंदाच फेब्रुवारी महिन्यात नदीच्या पाण्याचे पात्र कमी होत असल्याने आमच्या बागायतीला नीट पाणी मिळत नाही. कृषी खात्याच्या योजनेअंतर्गत शेती वाढवण्यासाठी प्रयत्न केले, पण केळी, सुपारी, ऊस तर शेतीला पाणी नसल्याने आमच्यावर महासंकट ओढवले आहे, असा दावा स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे.
बैलपार नदी कळणे या भागातून वाहते, सध्या महाराष्ट्र (Maharashtra) सरकारने तेथील औद्योगिक वसाहतीसाठी कळणे नदीवर मोठमोठे बंधारे घालून हे पाणी वळवण्याचा प्रयत्न चालवला आहे. परिणामी गोव्याच्या हद्दीत बैलपार नदीपात्रात पाणी प्रमाणात आल्यास त्याचा परिणाम चांदेल प्रकल्पाबरोबरच पूर्ण तालुक्यावर होणार आहे. कळणे नदीचे आणि तिळारीचेही पाणी पूर्णतः बंद केले, तर बैलपार नदीला पाणी कुठून येणार, हा गंभीर प्रश्न आहे. बैलपार नदीवर पंपहाऊस प्रकल्प उभारल्यानंतर चांदेल येथील 15 एमएलडी प्रकल्पासाठी, 5 एमएलडी मोपा विमानतळासाठी , शिवाय तुये येथे होऊ घातलेल्या नवीन पाणी प्रकल्पासाठी 30 एमएलडी पाणीपुरवठा या नदीतून होणार आहे,असेही सांगण्यात येत आहे.
गोवा सरकारने (Goa Government) स्थानिक पंचायतींना विश्वासात न घेता सध्या 25 कोटी 32 लाख रुपये खर्च करून बैलपार नदीशेजारी साऊथ इस्ट कन्स्ट्रक्शन कंपनीकडून दोन पंप हाऊस बसवण्याचे काम जोरात सुरु केले आहे. 23 मार्च अगोदर हे काम पूर्ण करायचे आहे. त्यामुळे या ठिकाणी अहोरात्र काम सुरू आहे. बैलपार नदीकिनारी उभारण्यात येत असलेल्या प्रकल्पाच्या ठिकाणी जलस्त्रोत खात्याचे मुख्य अभियंते प्रमोद बदामी,व अधिकारी देशपांडे आदींनी भेट दिली. यावेळी त्यांनी स्थानिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. प्रकल्पाचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, अधिकाऱ्यांच्या समजावणीने शेतकऱ्यांचे समाधान झाले नसल्याचं चित्र आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.