Goa Gramsabha Dainik Gomantak
गोवा

Goa Gramsabha Issues: गोव्यात 'ग्रामसभां'मध्ये खदखद! बेकायदा बांधकामे, भटकी गुरे, कचरा, आदी ज्‍वलंत विषयांवर चर्चा; ‘गुपचूप’ व्‍यवहाराचा आरोपही

Goa Panchayat Gramsabha: सध्‍या गाजत असलेल्‍या बेकायदा बांधकामांच्‍या मुद्यासह भटकी गुरे, कचरा, भाडेकरू नोंदणी, पार्किंग समस्‍या आदी ज्‍वलंत विषयांवर झालेल्‍या ग्रामसभांमध्‍ये चर्चा झाली.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: सध्‍या गाजत असलेल्‍या बेकायदा बांधकामांच्‍या मुद्यासह भटकी गुरे, कचरा, भाडेकरू नोंदणी, पार्किंग समस्‍या आदी ज्‍वलंत विषयांवर आज रविवारी झालेल्‍या ग्रामसभांमध्‍ये चर्चा झाली. सर्वण-कारापूर ग्रामसभेत तर ग्रामस्‍थांनी पंचायत मंडळावर ‘गुपचूप’ व्‍यवहार करत असल्‍याचा आरोप केला.

कारापूर-सर्वण

कारापूर-सर्वण पंचायतीच्या ग्रामसभेत चार पंचसदस्यांनी दांडी मारली. तर, दुसऱ्या बाजूने ग्रामस्थांचा सभेला अल्प प्रतिसाद मिळाला. आजच्या ग्रामसभेत भाडेकरूंसह कचऱ्याचा मुद्दा चर्चेला आला. तसेच बांधकामांना ‘एनओसी’ देताना पंचायतीकडून आर्थिक व्यवहार होत असल्‍याचा आरोप एका ग्रामस्‍थाने केल्‍यामुळे सरपंचांसह सर्वांच्‍या भुवया उंचावल्या.

बेकायदेशीरपणे भूखंड विकसित करणे वा बांधकाम करण्यासाठी पंचायतीकडून ‘एनओसी’ देताना आर्थिक व्यवहार होत आहे, असा आरोप नंदा सावळ या ग्रामस्थाने केला. तसेच या व्यवहारातून मिळणारे पैसे पंचायतीच्या तिजोरीत जमा होतात की परस्पर हडप केले जातात? असा सवाल उपस्थित करून खळबळ उडवून दिली.

त्‍यावर बोलताना सरपंच सावंत यांनी सांगितले की, तसा प्रकार घडला असल्यास पुराव्यांसह पंचायतीच्या निदर्शनास आणून द्या, अवश्य चौकशी केली जाईल. दरम्‍यान, पंचायत क्षेत्रात राहणाऱ्या काही भाडेकरूंची माहिती लपवून ठेवली असण्याची शक्यता विजय मठकर या ग्रामस्थाने व्यक्त केली. त्‍यांची माहिती गोळा करण्याची मागणीही त्यांनी केली. कचऱ्याच्या मुद्यावरही ग्रामसभेत चर्चा झाली. तीर्थराज पुजारी तसेच अन्‍य ग्रामस्थांनी चर्चेत सहभाग घेतला.

आगोंद

आगोंद समुद्रकिनारी भागातील पार्किंगची समस्‍या, धवळखाजन भागात वटवाघळांचा हैदोस तसेच मेगा प्रकल्‍पांबाबत आगोंद ग्रामसभेत गरमागरम चर्चा झाली. आगोंद भागात पुरविण्‍यात येणारे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा अहवाल प्राप्त झाला असून ‘धरती शक्ती’ योजनेअंतर्गत उपाययोजना केली जाईल, असे सरपंच फर्नांडिस यांनी एका प्रश्‍‍नावर उत्तर देताना सांगितले. येथील पाण्याच्या टाकीची सफाई तातडीने करण्याची मागणी ओनारार्द फर्नांडिस यांनी केली. तसेच पथदीप कार्यान्वित करण्याची मागणी त्रिफोन कुतिन्हो यांनी केली. पान्ना ते देसाईवाडापर्यंत रस्त्याचे रुंदीकरण, संरक्षक कठडा आदी काम केल्यावर रस्त्याचे सपाटीकरण लवकर करण्यात यावे, गटार, पायऱ्या, अंतर्गत रस्‍त्‍यांची मागणीही ग्रामस्थांकडून करण्यात आली.

दुमाणे व अन्य ठिकाणी रस्त्याच्‍या बाजूला कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी कायतान फर्नांडिस यांनी केली. हे पंचायत मंडळ विविध विषयांवर ठराव घेऊन पुढे पाठवून देते, मात्र कारवाई होत नाही. यासंबंधी ग्रामस्थांनी आश्‍चर्य व्‍यक्त केले. ओल्या कचऱ्यापासून खत निर्माण करण्याचा ठेका पंचायतीने परस्पर एका ठेकेदाराला ७५ हजार रुपयांना दिला. तो वाढवून देणे गरजेचे आहे. याबाबत विचार करण्याचे आवाहन किरण नाईक गावकर यांनी केले. रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवा, अशी मागणीही त्‍यांनी केली.

नेवरा

नेवरा येथे परप्रांतीय व्यक्तीने खरेदी केलेल्या जमिनीच्‍या विषयावरून सुरू झालेला वाद अखेर ग्रामसभेत पोहोचला. या जमिनीत शेकडो वर्षांची विहीर असून तेथे किमान दहा ते पंधरा मीटर अंतर ठेवण्याचा विषयावरून ग्रामस्थ संतप्त होते. त्यात पंचायतीने दिलेला परवाना मागे घेऊन त्वरित काम थांबवण्याचा आदेश देण्याची मागणी ग्रामस्थांनी लावून धरताच पंचायत सचिव व ग्रामस्‍थ यांच्‍यात वाद निर्माण झाला.

देवभाट येथील सर्व्हे क्रमांक १४ मध्ये सुमारे सात हजार चौरस मीटर जमीन एका परप्रांतीय व्यक्तीने खरेदी करून तेथे कुंपण बांधण्याचे काम सुरू केले. नगरनियोजन खात्याकडून सर्व आवश्यक परवाने आणले गेल्याने पंचायतीला परवाना देण्याशिवाय काही पर्याय राहिला नसल्याचे कारण सरपंच मनीषा नाईक यांनी दिले.

तत्पूर्वी गेल्या ग्रामसभेत घेतलेल्या ठरावांवर चर्चा करण्यात आली. त्यात धाकटे-नेवरा येथील सर्व्हे क्रमांक २५०/३/क इब्राहिम मुन्ना पटेल यांनी डोंगरकापणी केल्याचा विषय आला. यासंदर्भात पंचायतीने पाहणी करून अहवाल नगरनियोजन खात्याला पाठवला असल्‍याची माहिती देण्यात आली.

वेळगे

साखळी मतदारसंघातील वेळगे ग्रामपंचायत क्षेत्रात बाजारपेठेत, रस्त्यावर रात्रीच्या वेळी भटक्या गुरांची समस्या दिवसेंदिवस जटिल बनत चालली आहे. पंचायतीने या प्रकरणी त्‍वरित तोडगा काढावा, तसेच गुरांच्‍या मालकांनी गुरांच्या गळ्यात ओळखपत्र बांधावे, जेणेकरून गावाबाहेरील गुरांना गोशाळेत पाठवता येईल, असा ठराव वेळगे पंचायतीच्या ग्रामसभेत घेण्यात आला.

वेळगे गावातील बाजारपेठेतून होंडा-फोंडा हा मुख्य रस्ता जातो. या रस्त्यावर रात्रीच्या वेळीही वाहतूक सुरूच असते. परंतु याच रस्त्यावर रात्रीच्या वेळी भटकी गुरे ठाण मांडून बसलेली असतात. त्यामुळे यापूर्वी अनेक अपघात घडलेले आहेत. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत तर कित्‍येकांना जायबंदी होऊन घरी बसावे लागले आहे. या गुरांचा बंदोबस्‍त करून अपघातांवर नियंत्रण आणणे गरजेचे बनले आहे. तसेच या प्रश्‍‍नी ताबडतोब उपाययोजना करणे अवश्‍‍यक आहे असे सांगून सगुण घाडी यांनी वरील सूचना केली. यावर ग्रामसभेत सर्वानुमते ठराव घेण्यात आला.

प्रारंभी सरपंच सपना पार्सेकर यांनी स्वागत केले. सचिव प्रणय गावडे यांनी मागील सभेचा अहवाल सादर केला व ग्रामसभेस मार्गदर्शन केले. निरीक्षक म्हणून सारिका सोननाईक यांनी काम पाहिले. योगिता हळदणकर यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT