Goa News : कुळे, कॉंग्रेसचे फ्रांन्सिस सार्दिन दक्षिण गोव्याचे खासदार आहेत, परंतु गेल्या पाच वर्षांत ते या भागात कितीवेळा आले याचा विचार करा.
येत्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराला भरघोस मताधिक्याने निवडून द्या. विकसित भारताचे स्वप्न नजरेसमोर ठेवून पंतप्रधान मोदी काम करीत आहेत. त्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार पुन्हा केंद्रात सत्तेत पाहिजे. प्रत्येकाने पुन्हा एकदा मोदींचे हात बळकट करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले.
भाजपच्या ''गाव चलो अभियाना''अतंर्गत रविवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांनी मोले पंचायत क्षेत्रातील विविध गावांना भेटी दिल्या. यावेळी स्थानिक आमदार गणेश गांवकर, माजी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, सावर्डे भाजप मंडळाचे अध्यक्ष विलास देसाई तसेच मोलेतील पंच उपस्थित होते.
या अभियानाची सुरवात झरीवाडा, मोले येथून करण्यात आली. यावेळी मोदी सरकारच्या कामाची माहिती त्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या सोडविण्याच्या आश्वासनही दिले.
आमदार गणेश गावकर म्हणाले, मोले पंचायतीने नेहमीच भाजप सरकारला पाठिंबा दिला आहे. हा पाठिंबा भविष्यात कायम राहणार आहे. सावर्डे मतदारसंघाचा विकास झपाट्याने होत आहे. यासाठी पुन्हा केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आले पाहिजे, असे ते म्हणाले.
मोदी सरकारच्या अनेक योजना
पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला, युवा व किसान शक्ती तसेच गरीब कल्याण हे चार स्तंभ डोळ्यांसमोर ठेऊन काम करत आहेत. महिलांसाठी त्यांनी अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबविल्या आहेत. महिलांना ३० टक्के आरक्षण देण्याचे विधेयक त्यांनी संसदेत आणून महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
महिलांवर अत्याचार होऊ नये, यासाठी तीन तलाक विधेयक त्यांनी संसदेत मंजूर केले. युवा शक्तीसाठी खेलो इंडिया, स्कील इंडिया सारख्या योजना अमलात आणल्या, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड व अन्य महत्त्वाच्या योजना राबविण्यात आल्या आहेत.
गरिबांच्या कल्याणासाठी अनेक कुटुंबांना मोफत धान्य देण्याची योजनाही राबवली जात आहे. गरिबी दूर करण्यासाठी त्यांचे विशेष प्रयत्न आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.