St Inez Illegal Construction Action
पणजी: सांतिनेजमधील वेलनेस चौकात वाहतूक बेट निर्माण करण्यास अडथळा ठरलेले बेकायदेशीर बांधकाम अखेर सोमवारी सायंकाळी जेसीबीच्या साहाय्याने पाडण्यात आले. स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत सांतिनेजमध्ये काम सुरू झाल्यापासून हे बांधकाम चौकातील काँक्रिटीकरणाच्या रुंदीकरणाला अडथळा ठरत होते, त्याविषयी ‘गोमन्तक’ने सतत आवाज उठवला होता. अखेर जिल्हाधिकारी कार्यालयातून आदेश येताच ते बांधकाम हटवण्याची कारवाई झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी कार्यालयातून बांधकाम हटवण्याचे आदेश सायंकाळी पाच वाजता निघाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, पोलिस, इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडचे (आयपीएससीडीएल) अभियंते, जेसीबीसह कर्मचारी वेलनेस औषधालयाच्या समोर येऊन धडकले.
शीतल हॉटेल चालकास सर्व साहित्य काढून घेण्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सूचित केले. परंतु तेथील कर्मचाऱ्यांनी मोबाईलवरून कोणाकोणास संपर्क साधण्यास सुरुवात केली; पण त्यांना काही यश आले नाही. तोपर्यंत तावेर्न हटवून दुकानगाळे काढलेल्या एकमजली बांधकामावर जेसीबीने कारवाई करण्यास सुरुवात केली.
सुरुवातीला जेसीबीने कोपऱ्यावर घाला घातल्यामुळे शीतल हॉटेल मालकाची व कर्मचाऱ्यांची पळापळ सुरू झाली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी शीतल हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना साहित्य काढण्यास सांगितले. तोपर्यंत दुसऱ्या बाजूचे लोखंडी अँगलच्या साह्याने एक मजली केलेले बांधकाम जेसीबीने हटविले.
बेकायदेशीर बांधकामावर कारवाईस सुरुवात झाल्यानंतर मधुबन कॉम्प्लेक्सकडून, अग्निशामक दलाकडून पणजीकडे येणारी वाहने आणि ताळगावकडे जाणारी वाहने या ‘वाय’ आकाराच्या जंक्शनवर एकत्रित आल्याने वाहतूक कोंडी होत होती. त्याशिवाय दुचाकीवरून जाणारे, रस्त्याच्या बाजूला कारवाई बघण्यास उभे राहिलेले अनेकजण मोबाईलवर चित्रीकरण करीत होते.
कारवाईच्यावेळी पोलिस बंदोबस्त होता; पण सात ते आठ पोलिसच होते. खरेतर याठिकाणी वाहतूक पोलिस गरजेचा होता; पण एक तासाने याठिकाणी वाहतूक पोलिसाला पाठविण्यात आले. जेसीबीचे बांधकाम हटवण्याचे काम सुरू असतानाही वाहनधारक जीव धोक्यात घालून बाजूने जात होते.
‘दै. गोमन्तक’ने स्मार्ट सिटी मिशनच्या सांतिनेजमध्ये ‘वाय’ आकाराच्या या जंक्शनवर सुरू झालेल्या रस्ताकामाला हे बांधकाम अडथळा ठरत असल्याचे वारंवार निदर्शनास आणून दिले. दोन वर्षांपासून सतत हे बांधकाम हटविण्यासाठी पाठपुरावा केला.
हमारा स्कूलजवळ सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागेत असलेली व उपजीविकेसाठी दिलेली जागा संबंधित मालकांकडून भाड्याने दिली गेल्याचे सरकारी यंत्रणेच्या लक्षात आल्यामुळे त्यावर कारवाई होणार, हे स्पष्ट होते. बांधकाम करणाऱ्यांनी बांधकाम वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले; पण ती बांधकामे अखेर हटलीच.
दुकानगाळ्यांवर व भाड्याने हॉटेलास दिलेल्या बांधकामावर कारवाई झाल्यावर आता रस्त्याच्या पलीकडे पदपथाला अडथळा ठरत असलेल्या बांधकामावर कारवाई होणार काय? अशी चर्चा सुरू झाली. त्यावर
कारवाई झाल्यास चौक अधिक रुंद होऊ शकतो. काहीही झाले तरी आता रस्त्याच्या बाजूच्या ‘त्या’ बांधकामांविषयी प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहणार नाही.
बांधकामधारक कायतानो यांच्या वकिलांनी सांगितले की, दुपारी साडेतीन वाजता बांधकाम हटवण्याचे आदेश निघाले. सायंकाळी साडेचार वाजता आदेश घेऊन आले. न्यायालयाने साहित्य काढण्यासाठी वेळ द्यायला हवा होता. हे बांधकाम बेकायदेशीर असल्याने हटविले असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे बांधकाम हटविण्याचे आदेश निघाले. स्मार्ट सिटीच्या कामाला आम्ही विरोध केला नाही; परंतु अशा पद्धतीने कारवाई होणे अपेक्षित नाही, आम्ही त्याविरोधात न्यायालयीन लढा देऊ. आम्ही उपजिल्हाधिकाऱ्यांकडे या दोन्ही बांधकाम मालकांचे पुनर्वसन करण्याची विनंती केली होती; कारण ते पोर्तुगीज काळापासून तेथे व्यवसाय करीत होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.