Khari Kujbuj Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: एकटे तानावडेच जबाबदार?

Khari Kujbuj Political Satire: भाजपच्या राज्यातील नेत्यांना सध्या कोकणवारी करण्याची संधी मिळत आहे. भाजपच्या पश्रश्रेष्ठींनी कोकणातील भाजप उमेदवार विधानसभा निवडणुकीत विजयी करण्याची जबाबदारी भाजपच्या राज्यातील नेत्यांवर दिली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

एकटे तानावडेच जबाबदार?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीतील दक्षिण गोवा पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे. अलीकडच्या एका मुलाखतीत त्यांनी ही जबाबदारी स्वीकारल्याने तो राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यातून भाजपने नवा चेहरा दिला होता. ही निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळेच या पराभवाची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतली आहे. तानावडे यांनी याआधीची पराभवाची जबाबदारी स्वीकारली होती. दक्षिण गोव्यात भाजपच्या विजयासाठी अनेकांनी मोठे प्रयत्न चालवले होते. तेथे विजय झाला असता, तर त्याचे श्रेय एकट्या तानावडे यांना नक्कीच दिले गेले नसते. मग पराभवाला एकटे तानावडेच कसे जबाबदार असा प्रश्न खुद्द भाजप कार्यकर्त्यांना तेव्हा पडला नसेल तर नवल. आताही तानावडे यांनी तोच सूर आळवल्याने यामागे नेमके कारण काय याचे गूढ मात्र वाढले आहे ∙∙∙

महाराष्ट्रदेशी भ्रमण

भाजपच्या राज्यातील नेत्यांना सध्या कोकणवारी करण्याची संधी मिळत आहे. भाजपच्या पश्रश्रेष्ठींनी कोकणातील भाजप उमेदवार विधानसभा निवडणुकीत विजयी करण्याची जबाबदारी भाजपच्या राज्यातील नेत्यांवर दिली आहे. यासाठी पश्चिम बंगालचे भाजपचे संघटनसचिव सतीश धोंड यांनाही खास कोकणात नियुक्त केले आहे. यामुळे भाजपची कोकणातील कोणतीही सभा असो वा मेळावे त्यात गोव्यातील नेते दिसू लागले आहेत. त्यांचे संघटन कौशल्य तेथे पणाला लागत आहे. येणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय किंमत कमावण्यासाठी या नेत्यांना मिळालेली ही संधी आहे. महाराष्ट्रातील राजकारण गुंतागुंतीचे होत गेले आहे. त्या वातावरणात संघटनात्मक कामासोबत राजकीय कामेही या नेत्यांना करावी लागत आहेत. ∙∙∙

बोटचेपी भूमिका कायम

ग्‍लोबल कोकणी फोरम ही संघटना रोमी लिपीला मान्‍यता मिळावी यासाठी आक्रमक असे आंदोलन करताना कोकणीची शिखर संस्‍था असलेली अखिल भारतीय कोकणी परिषद आणि इतर संस्‍था मूग गिळून गप्‍प बसल्‍या आहेत. याबद्दल ज्‍येष्‍ठ कोकणी नेते उदय भेंब्रे यांनी कोकणी परिषद व कोकणी भाषा मंडळ या दोघांनाही फैलावर घेतले होते. त्‍यामुळे परिषदेच्‍या कालच्‍या उद्‍घाटनावेळी तरी परिषदेचे पदाधिकारी आपली भूमिका प्रखरपणे मांडतील अशी अपेक्षा होती. मात्र, या वादाचा ओझरता उल्‍लेख करण्‍याव्‍यतिरिक्‍त अन्‍य काहीच घडले नाही. का कुणास ठाऊक ज्‍येष्‍ठांकडून कानपिचक्‍या मिळूनही परिषदेने आपली ही बोटचेपी भूमिका का सोडली नाही हेच मुळी कळू शकले नाही. ∙∙∙

पत्रकार परिषद रद्द का केली?

सरकारी नोकरीचे आमिष दाखवून काणकोण येथील एका महिलेकडून १५ लाख रुपये उकळलेल्या तिघांपैकी पराग रायकर या संशयिताने आपली बाजू मांडण्यासाठी मडगावात पत्रकार परिषद बोलावली होती. त्याप्रमाणे पत्रकार वेळेपूर्वीच हॉटेलमध्ये पोहोचले. पत्रकार परिषदेची वेळ टळून गेली तरी पराग आले नाहीत. नंतर कोणीतरी पत्रकार परिषद रद्द केल्याचा निरोप पाठवला. मात्र, ती का रद्द केली याचे कारण समजले नाही. कदाचित त्यांना अटक झाली असावी, असा संशय एका पत्रकाराने व्यक्त केला. जर खरोखरच या प्रकरणी सहभाग नसेल, तर त्यांनी आपली बाजू मांडा‌यला हवी होती. कदाचित अटकेच्या भीतीने ते आले नसावेत असा निष्कर्ष कुणीतरी काढला. वरिष्ठ नेत्यांकडून पत्रकार परिषद न घेण्याचा दबाव तर आला नसावा ना? असा तर्कसुद्धा लोकांनी काढायला सुरवात केली आहे. या प्रकरणी आता आणखी कोण कोण आहेत किंवा त्यांनी आणखी कुणाकुणाकडून पैसे उकळले हे आता हळूहळू उघड होणार असा लोकांचा अंदाज आहे.∙∙∙

आरजीवाले गेले कुठे?

सांकवाळ ग्रामस्थ भूतानीच्या मेगा प्रकल्पाविरोधात एकवटले आहेत. गेले नऊ महिने त्यांचा लढा सुरू आहे. गोव्याचे भूमिपुत्र आम्हीच म्हणून ‘आरजी’चे नेते सांगत होते आणि आंदोलनही करत होते, परंतु सांकवाळमधील आंदोलनापासून आरजीवाले लांब राहिल्याने तेथील जनतेमध्ये ‘आरजी’विरोधात कमालीचा असंतोष आहे. किमान आरजीच्या नेत्यांनी तरी या आंदोलनात सहभागी व्हायला हवे असे वाटत होते, पण तसे झाले नाही. सांकवाळमधील नेत्यांनी आरजीचे नेते कुठे गेले असा सवाल म्हणे पक्षाच्या एकमेव आमदारालाच विचारला. यातून कशीबशी सुटका करण्याचा आमदारांचा केविलवाना प्रकारही काहीजणांनी पाहिला. परंतु आमदारांनी जे काही सांकवाळच्या जनतेला सांगितले त्यावरून म्हणे ‘आरजी’मध्ये सर्व काही आलबेल असल्याचा वरवरचा हा प्रयत्न असावा असे दिसते. ∙∙∙

म्‍हणे कन्नड शाळांचे अनुदान बंद करा

कर्नाटकात कोकणी भाषेला मान्‍यता मिळाली असली तरी कोकणी माध्‍यमातून शिकविणाऱ्या शिक्षकांना कर्नाटक सरकार पगार देत नाही. त्‍यामुळे काही खासगी संस्‍था हा भार उचलतात. काल आपल्‍या स्‍वागतपर भाषणात अधिवेशनाचे स्‍वागताध्‍यक्ष प्रशांत नाईक यांनी या मुद्याला हात घालताना जर कर्नाटकातील कोकणी शाळांना कर्नाटक सरकार अनुदान देत नसेल, तर गोवा सरकारने गोव्‍यातील कन्नड माध्‍यमांतील शाळांना अनुदान देणे बंद करावे अशी मागणी केली अशातऱ्हेच्‍या मागण्‍या बेंबीच्‍या देठांपासून ओरडून करणे आणि उपस्‍थित प्रेक्षकांकडून टाळ्‍या घेणे हे प्रशांतसाठी तसे काही नवीन नाही, पण प्रशांतची ही भूमिका फक्‍त अधिवेशनापुरती की नंतरही? ते या गोष्‍टीचा पाठपुरावा करणार का? हा प्रश्न कित्‍येकांना पडला असावा. कारण रोमीबाबत ठोस भूमिका घेण्‍यास अळमटळम करणाऱ्या एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असलेल्‍या प्रशांतसाठी अशी कानडी विरोधी भूमिका घेणे खरेच परवडेल का? ∙∙∙

सभापतींच्या नव्या गाडीला ‘तो’च नंबर!

सभापती डॉ. रमेश तवडकर यांच्या दिमतीला नवी गाडी मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी सभापती काणकोणहून पणजीला जाताना कुठ्ठाळी पुलावर त्यांची गाडी लॉक होऊन रस्त्याच्या विभाजकाला धडकली होती. त्यात गाडीचे बरेच नुकसान झाले होते. सुदैवाने सभापती व त्यांच्या सहकाऱ्यांना कोणतीच इजा झाली नव्हती. ती गाडी दुरुस्तीसाठी देण्यात आली आहे. मात्र, सध्या सभापतींना नवी गाडी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे सभापतींच्या खासगी गाडीचा क्रमांक ५९०९ असा आहे, तोच क्रमांक या गाडीला मिळाला आहे. आज नवी कोरी गाडी घेऊन सभापती श्रीस्थळ येथील श्री मल्लिकार्जुन देवाच्या दर्शनासाठी गेले. त्या ठिकाणी सभापतींनी गाडीची पुजा केली. यावेळी आधीच्याच गाडीचा क्रमांक नव्या कोऱ्या गाडीला मिळाल्याची चर्चा तेथे रंगली होती.∙∙∙

पूजाचा मास्टरमाईंड कोण?

सरकारी नोकरीचे आमिष दाखवून अनेकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या जुने गोवे येथील पूजाचे नवनवे कारनामे आता पुढे येऊ लागले असून हे प्रकरण म्हणजे मारुतीची शेपटी तर ठरणार नाही ना? अशी शंका तपास अधिकाऱ्यांना येऊ लागली आहे. पण मुद्दा तो नाही, तर तिच्या सांगण्यावर विश्वास ठेवून तिला अनेकांनी अशी लाखोंची रक्कम सुपूर्द तरी कशी केली? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. त्यामुळे तिच्यामागे कोणी बडी असामी तर नाही ना? अशीही शंका घेतली जाऊ लागली आहे. तिने यापूर्वी कोणाला सरकारी नोकरी मिळवून दिलेले काही उघडकीस आलेले नाही की तिच्या सांगण्यावर डोळे झाकून विश्वास करावा. मुद्दा तेवढ्यावर संपत नाही. संपन्न घरातील नाही की कसलाही व्यवसाय - उद्योग नाही असे असताना ती लक्झरी निवासात कशी रहाते. तिच्याकडे नवनव्या चार ते पाच लक्झरी गाड्या कशा? असा प्रश्नही कोणालाच कसा पडला नाही हेही तपास अधिकाऱ्यांना कोडे पडलेले आहे. म्हणूनच पूजा हे एक प्यादे असावे करताकरविता अन्य कोणी तर नाही ना? असा संशय बळावला आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

Saint Francis Xavier Exposition In Pictures: ओल्ड गोव्यात एक्सपोझिशनला सुरुवात; पाहा पहिल्याच सोहळ्याचे खास फोटो

SCROLL FOR NEXT