Khari Kujbuj Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: मडगाव पोलिस स्‍थानकातही घोटाळा?

Khari Kujbuj Political Satire: सभापती रमेश तवडकर सध्या चांगलेच गाजत आहेत. गरिबांची घरे समाज सहभागातून उभारण्याच्या श्रमधाम योजनेच्या रूपाने त्यांची दिल्लीत दखल घेतली गेली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

तवडकर फॉर्मात

सभापती रमेश तवडकर सध्या चांगलेच गाजत आहेत. गरिबांची घरे समाज सहभागातून उभारण्याच्या श्रमधाम योजनेच्या रूपाने त्यांची दिल्लीत दखल घेतली गेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्धा तास त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली होती. आता भगवान बिरसा मुंडा यात्रेच्या निमित्ताने त्यांनी आदिवासीच नव्हे, तर इतर समाजतूनही तवडकर यांच्या नेतृत्वाला असलेली मान्यता अधोरेखित झाली आहे. हा सरकारी कार्यक्रम असला तरी तवडकर यांनी आत्मीयतेने तो पुढे नेला आहे. त्यासाठी राज्यभरातील तपशीलवार नियोजन त्यांनी व्यक्तिशः केले होते. त्यामुळे त्यांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे. राज्यात राजकारण सध्या नोकऱ्यांच्या चोरबाजारामुळे ढवळून निघालेले असताना तवडकर हे फॉर्मात येणे हा योगायोग मानला जात आहे. त्यातून त्यांची राजकीय वाटचाल अधिक दमदार आणि उच्च पदापर्यंत होईल अशी राजकीय चर्चा जोर धरू लागली आहे. ∙∙∙

मडगाव पोलिस स्‍थानकातही घोटाळा?

सध्‍या गोव्‍यात वेगवेगळीकडे ‘कॅश फॉर जॉब’ घोटाळे झालेले असताना त्‍याचा पोलिस तपास करीत आहेत. मात्र, वेगळ्या प्रकारचा एक घोटाळा मडगाव पोलिस स्‍थानकात घडलेला असून त्‍याची चौकशी आता कोण करणार असा प्रश्न पोलिसच करू लागले आहेत. असे म्‍हणतात, मडगाव पोलिसांनी लोकांकडून जो दंड वसूल केला होता, त्‍या दंडाची रक्‍कम सरकारी तिजोरीत जमा झालेली नाही. हा घोटाळा ६० ते ७० हजार रुपयांचा असण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त केली जाते. हा घोटाळा करणाऱ्या पोलिसाची दुसरीकडे बदली करण्‍याचा आदेश यापूर्वीच जारी झाला आहे. मात्र, या घोटाळ्‍यात आपण अडकू या भीतीने त्‍याच्‍या जागेवर येण्‍यास दुसरा कुणीही तयार नसल्‍याची पोलिस स्थानकातच चर्चा आहे. ∙∙∙

डबल दिवाळी

सरकारकडून भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त राज्यात विविध ठिकाणी मोटरसायकल रॅली काढण्यात आल्या. मोठ्या संख्येत यात युवक सहभागी झाली. युवक स्वेच्छने आले की नाही हा दुसरा विषय आहे, परंतु करमळीतील यात्रेत सहभागी झालेल्यांना ‘व्हिटामीन एम’ दिल्यानंतरच ते सहभागी झाल्याची जोरदार चर्चा सध्या परिसरात ऐकू येत आहे. त्यामुळे युवक वर्ग सध्या भलताच खूश झाल्याचे दिसते. कारण दिवाळी होऊन गेली असली तरी त्यांची डबल दिवाळी साजरी झाली. यालाच म्हणतात ‘उपरवाला देता देता छप्पर फाडके’. ∙∙∙

झिरो एफआयआरची ॲलर्जी?

सध्‍या मडगाव पोलिस स्‍थानक वेगवेगळ्‍या कारणांमुळे दररोज चर्चेत असते आणि यातील बहुतेकवेळा हे पोलिस स्‍थानक वाईट कामांसाठीच चर्चेत आलेले दिसते. सध्‍या अशाच एका घटनेमुळे हे पोलिस स्‍थानक चर्चेत आले आहे ते म्‍हणजे, झिरो एफआयआर पद्धतीला झिडकारल्‍यामुळे. मडगावातील एका इस्‍पितळात ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणात आपण लुबाडलो गेलो अशी तक्रार घेऊन आलेल्‍या काही महिलांना काल या घटना आमच्‍या पोलिस स्‍थानकाच्‍या हद्दीत घडलेल्‍या नाहीत असे सांगून त्‍यांना माघारी पाठविण्‍यात आले. खरे तर ही तक्रार मडगाव पोलिस स्‍थानकात नोंद करून नंतर ज्‍या ठिकाणी हा गुन्‍हा झाला, त्‍या पोलिस स्‍थानकात पाठविता आली असती, पण तसे करायला गेल्‍यास काम वाढणार म्‍हणून मडगाव पोलिसांनी असा निर्णय घेतला आहे का? ∙∙∙

पर्रीकरांची पुन्हा एकदा आठवण

सध्या गाजत असलेल्या सरकारी नोकरी विक्री घोटाळ्याची व्याप्ती वाढू लागल्यावर अनेकांना स्व. मनोहर पर्रीकर यांची आठवण झाली आहे. भाईंचे पुत्र उत्पल यांनी तर भाई असते, तर असे प्रकार घडलेच नसते असेही सांगून टाकले आहे. ती गोष्ट खरीही आहे. कारण भ्रष्टाचार वा घोटाळ्यांची त्यांना मनस्वी चीड होती. पण मुद्दा तो नाही, गोव्यात व विशेष करून सत्ताधारी भाजपात मोठ्या प्रमाणात भाईंचे समर्थक असताना अजून कोणीही या घोटाळ्याबाबत उघड भूमिका घेतलेली नाही. याबद्दल अनेकजण मुद्दा उपस्थित करू लागले आहेत. २०१२ नंतर भाईंच्या सरकारला पाठिंबा देणारे आमदार तथा मंत्रीही तोंडात गुळणी घेऊन का बसले आहेत? उघड बोलायला त्यांचे हात कोणी पकडले आहेत? असे प्रश्न अनेकजण खासगीत करत आहेत, पण कोणीही त्याची जाहीर वाच्यता का करत नाहीत अशी विचारणाही होऊ लागली आहे. एकेकाळी गुन्हेगारांचे कंबरडे मोडणारे फोंड्याचे रवीबाबसुध्दा ‘गॉड फादर’, ‘गॉड मदर’सारखे गुळमुळीत का बोलत आहेत? त्याऐवजी त्यांनी संबंधितांची नावे का घेऊ नयेत हा प्रश्नही उपस्थित होत आहे. ∙∙∙

प्रचाराचा अनुभव

महाष्ट्रातील निवडणुकीसाठी भाजप - काँग्रेसच्या नेत्यांना प्रचारासाठी त्या त्या पक्षांनी निमंत्रित केले आहे. भाजपचे अनेक नेते कोकण पट्ट्यात प्रचाराला जाऊन आले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा मात्र स्टार प्रचारकांमध्ये समावेश आहे. त्यामुळे त्यांच्या महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात विधानसभेसाठी व लोकसभेच्या पोटनिवडणुकांसाठी भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा झाल्या. पहिले काही दिवस व नंतर शेवटच्या टप्प्यात मात्र अमित पाटकरांना काँग्रेसच्या प्रचारासाठी निमंत्रित करण्यात आले होते. या प्रचाराची छायाचित्रे त्यांनी सध्या समाज माध्यमांत व्हायरल केली आहेत. पाटकरांसाठी प्रचाराचा हा अनुभव त्यांच्यासाठी पुढे निश्चितच फायद्याचा ठरू शकतो. ∙∙∙

मोरजीतील कॅसिनो

मोरजीतील कॅसिनो सध्या गाजू लागला आहे. त्याला विरोध करण्यासाठी बरेचजण पुढे सरसावले आहेत. मोरजीत विदेशी भाषांतील फलक लागले. अनेकांनी आपली आस्थापने विदेशींना चालवण्यास दिली. यामुळे कोणी रस्त्यावर उतरला नाही. कॅसिनोसाठीची जमीन कोणीतरी विकली तेव्हाही कोणी विरोध केला नाही. आता त्याला विरोध होऊ लागला आहे. त्याची कारणे काय असावीत याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू झाली आहे. कोरगावमधील मॉल, धारगळमधील सनबर्न यांच्याबरोबरीने मोरजीतील कॅसिनो गाजू लागला आहे. साहजिकपणे सर्व प्रकल्पांना स्थानिक पातळीवर विरोध आहे. तो कसा मावळत जाईल हा मुद्दा खुमासदार चर्चेच्या अग्रभागी आहे हे ठळकपणे जाणवणारे आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

Saint Francis Xavier Exposition In Pictures: ओल्ड गोव्यात एक्सपोझिशनला सुरुवात; पाहा पहिल्याच सोहळ्याचे खास फोटो

SCROLL FOR NEXT