प्रश्न : भाजपसोबत गेल्याने मगोची वाताहत झाली नाही का?
उत्तर : 1994 मध्ये भाजपसोबत युती करण्याविषयी आमच्या पक्षातून प्रचंड दबाव आला होता. कारण त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही कार्यकर्ते मगोसाठी काम करत होते. भाजपसोबत युती करण्याच्या विरोधात मी होतो. पण मगोमध्ये दोन प्रवाह निर्माण झाले. सलग दहा वर्षांच्या सत्तेमुळे राज्यात काँग्रेसविरोधात वातावरण होते.
यामुळे मगोला चांगली संधी आहे, असे माझे म्हणणे होते. पण मगोला मुख्यमंत्रिपद देण्याचे आश्वासन घेऊन भाजपसोबत जावे लागले. राममंदिर, बाबरी मशीद अशा अनेक कारणांमुळे देशात हिंदूवादी वातावरण तयार झाले होते. तसेच आरएसएसचे कार्यकर्ते तळागाळापर्यंत जात होते. मंदिर, मठ, देवस्थाने आदी ठिकाणी जाऊन प्रचार सुरू होता. यामुळे भाजपला पोषक वातावरण होते. पण भाजपने माझा, पर्यायाने मगोचा घात केला.
मांद्रे मतदासंघात लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी माझ्याविरेाधात भूमिका घेतली. यामुळे भाजप केडरने मगोला काहीच मदत केली नाही. परिणामी मांद्रेतून माझा पराभव झाला. मगोची सेना संपवण्यापूर्वी आधी सेनापतीलाच संपवायचे, हा भाजपचा छुपा अजेंडा होता. त्यात त्यांना यश आले. यानंतर स्व. मनोहर पर्रीकरांनी आश्चर्यकारक भूमिका घेतली.
निवडणुकीत युती आमच्याशी केली आणि निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपद प्रतापसिंह राणे यांना देऊ, अशी वेगळीच भूमिका घेतली. एकूणच मगोला नेस्तनाबूत करण्यासाठीच भाजपने पद्धतशीरपणे पावले टाकली. भाजपकडे आरएसएसची ताकद होती. केडर सोबत होता. याबाबतीत मगो मागे होता. यामुळेच माझा पराभव झाल. आणि मगो पक्ष कमकुवत झाला.
(Adv. Ramakant Khalap Interview on gomantak TV)
प्रश्न : तुमची राजकीय कारकीर्द आणि दै. ‘गोमन्तक’ याबाबत काय सांगाल?
उत्तर : गोव्याच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक आदी क्षेत्रात दैनिक ‘गोमन्तक’चा मोठा वाटा आहे. वर्तमानपत्र म्हणजेच ‘गोमन्तक’ अशी त्यावेळी धारणा होती. गोवामुक्ती चळवळ असो, भाषा चळवळ असो किंवा विलिनीकरणाची चळवळ असो, या प्रत्येकवेळी ‘गोमन्तक’ने आपला सक्रिय सहभाग नोंदवला आहे. या दैनिकाने केवळ पत्रकार घडवले नाहीत तर कवी, साहित्यिकही घडवले.
माझ्या राजकीय कारकिर्दीत वर्तमानपंत्रांचा मोठा वाटा असून यात ‘गोमन्तक’चे योगदान अधिक आहे, अशी प्रतिक्रिया ॲड. रमाकांत खलप यांनी व्यक्त केली. मगोचे सर्वेसर्वा तथा गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर हे द्रष्टे नेते होते. गोमंतकीय आणि गोमंतक हाच त्यांच्या राजकारणाचा पाया होता. खिलाडूवृत्ती, दानशूरपणा आणि वेळ-प्रसंग पाहून निर्णय घेण्याची क्षमता हे त्यांचे गुण होते.
प्रश्न : तुमच्यावर कोणाचा अधिक प्रभाव होता?
उत्तर : याची यादी मोठी होईल. तरीही महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस यांचे नाव प्राधान्याने घ्यावे लागेल. गोवामुक्तीसाठी लढणाऱ्या अनेक नेत्यांच्या भाषणांचा प्रभाव माझ्यावर पडला होता. त्यात भाऊसाहेबांचा प्रभाव अधिक जाणवला. भाऊसाहेब म्हणजे समाजाशी नाळ जुळलेला नेता होय. त्यांनी गोव्यात सामाजिक क्रांती घडवली.
त्यांचा पक्ष मगो गोवा महाराष्ट्रात विलिनीकरणाच्य बाजूचा होता. पण भाऊसाहेबांनी अशी भूमिका का घेतली ते समजावून घ्यावे लागेल. भौगोलिकदृष्ट्या छोट्याशा असलेल्या गोव्याचा सर्वांगीण विकास व्हावा, येथील बहुजनांना संरक्षण मिळावे तसेच देशाच्या मुख्य प्रवाहात सामावून जावे, अशी त्यांची भूमिका होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतून अनेक विद्वान नेते निर्माण झाले. केवळ महाराष्ट्राला नव्हे तर देशाला विचारवंत, अभ्यासू नेते लाभले.
ना. ग. गोरे, प्र. के. अत्रे, जार्ज फर्नांडिस यांची अनेक भाषणे प्रत्यक्ष ऐकली. भविष्यात यापैकी मला काहींसोबत काम करण्याचीही संधी मिळाली. देशात एकीकडे भांडवलशाही आणि दुसरीकडे डावे अशा परिस्थितीत पर्याय म्हणून समाजवाद पुढे आला. भाऊसाहेबांच्या मृत्यूनंतर मी सक्रीय राजकारणात आलो. त्यांच्या कन्या शशिकलाताई काकोडकर यांच्या नेतृत्वाखाली मगो पक्षासाठी काम सुरू केले. पण कालांतराने शशिकलाताईंशी राजकीय मतभेद झाले.
प्रश्न : गोव्याला घटकराज्य मिळाले, याचा फायदा झाला?
उत्तर : गोव्याचे विलिनीकरण महाराष्ट्रात व्हावे अशी भाऊसाहेबांची इच्छा असली तरी पुढे त्यांनी जनमत कौलही मोठ्या मनाने स्वीकारला. गोव्याला घटक राज्याचा दर्जा प्राप्त झाल्याने अनेक लाभ झाले. छोटे असले तरी एक राज्य म्हणून गोव्याला मानाचे स्थान मिळाले, निर्णयाचे स्वातंत्र्य मिळाले. केंद्रशासित राज्य म्हणून मिळणारी दुय्यम वागणूक बंद झाली.
गोवा मुक्तीनंतर नेहरूंनी गोव्याचा विकास गोमंतकीयच करतील, असे विधान केले होते. पण गोव्याने केलेले बदल इतके वेगवान होते की, गोमंतकीय अस्मिता हरवून गेली. राजकारणाने तर सर्व सीमा पार केल्या आहेत. बालिश राजकारणामुळे राज्यापुढे संकट निर्माण झाले आहे.
प्रश्न : गेली पन्नास वर्षे तुम्ही राजकारणात आहात. मागे वळून पाहताना तुम्हाला काय वाटते?
उत्तर : अनेक राजकीय नेत्यांच्या वरदहस्तामुळे राज्यात बिगरगोमंतकीयांची संख्या बेसुमार वाढली आहे. साहाजिकच यामुळे लोकसंख्याही प्रचंड वाढली असून मूळ गोमंतकीय हरवून गेला आहे. गोमंतकीयांच्या अस्मितेसाठी लढणाऱ्या मगोला भाऊंच्या मृत्यूनंतर उतरती कळा लागली. शशिकलाताईंनी त्यांचा वारसा पुढे नेला. पण दोघांच्याही नेतृत्व पद्धतीत अंतर असल्याने तसेच भाषावाद, विलिनीकरण आदी मुद्यांवरूनही राज्यात मगोविरुद्ध वातावरण तयार झाले.
यामुळे तरुणांनी पक्षाकडे पाठ केली. खरे पाहता मगोने आपल्या कारकिर्दीत अनेक कामे केली. कूळ-मुंडकारसारखे कायदे केले. राज्यातील वाड्यांवाड्यांवर आणि वस्त्यांवर सरकारी शाळा उभारल्या. भाऊंनंतर शशिकलाताईंनीही स्वच्छ कारभार केला. तरीही तत्कालीन विरोधकांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. राज्यात मगोची 14 वर्षे सत्ता होती. या काळात लोकहिताचे अनेक निर्णय झाले. पण भ्रष्टाचाराच्या खोट्या आरोपांमुळे तसेच भाऊसाहेबांच्या भूमिकेला तिलांजली दिल्याने तळागाळातील कार्यकर्ते पक्षाविरोधात गेले.
प्रश्न : शशिकलाताईंशी तुमचे राजकीय संबंध कोणत्या कारणामुळे बिघडले?
उत्तर : आणीबाणीनंतर इंदिरा गांधींना देशात पुन्हा बळकट व्हायचे होते. यासाठी प्रादेशिक राजकीय पक्षांना जवळ करण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. त्याचवेळी जनता दल, समाजवादी पक्षही स्थानिक पक्षांना चुचकारत होते. आणीबाणीमुळे इंदिरा गांधींची सत्ता गेली असली तरी कालांतराने त्या पुन्हा उभारी घेतील, याची मला खात्री होती. यासाठीच मगोने काँग्रेससोबत जावे, असा विचार मी मांडला होता.
पण ताईंनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. नंतर राज्यातील अर्स काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेससोबत गेली. त्यानंतर पुन्हा काँग्रेसमध्ये जाण्याविषयी चर्चा सुरू झाली असता मी त्याला विरोध केला. कारण अर्स काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेससोबत गेल्याने मगोचे महत्त्वच शिल्लक राहणार नव्हते, हे स्पष्ट होते. ताईंचेही सुरूवातीला तेच मत होते. परंतु कोणत्यातरी दबावामुळे ताईंनी अचानक काँग्रेस विलिनीकरणाचा निर्णय घेतला.याच कारणावरून माझे ताईंशी राजकीय वितुष्ट निर्माण झाले.
शरद पवार यांची भविष्यवाणी खरी ठरली!
1990 मध्ये राज्यात काँग्रेसला 19 आणि मगोला 19 जागा मिळाल्या होत्या. राम मंदिर आणि बाबरी मशीद प्रकरणांमुळे भाजपचे देशात प्राबल्य वाढत होते. देशातील अनेक राज्यांत भाजप हातपाय पसरू पाहत होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने मगोशी युती करावी आणि दोन्ही पक्षांनी अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद वाटून घ्यावे, असा प्रस्ताव राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मांडला होता. असे केले नाही तर भाजप तुमच्या पुढे जाईल, अशी भीतीही व्यक्त केली होती.
शरद पवार यांनी याबाबत तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशी चर्चा केली. त्यांनी या प्रस्तावास मान्यता दिली होती. पण काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी त्यास विरोध केला. मगोला अधिक महत्त्व द्यायला नको असे म्हणत त्यांनी युती नाकारली. शरद पवार यांनी १९९० मध्ये केलेली भविष्यवाणी आज शब्दशः खरी ठरल्याचे दिसतेय, असे ॲड. खलप म्हणाले.
काँग्रेसने माझी कदर केली नाही
गेली 25 वर्षे मी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये कार्यरत आहे. पण पक्षाने माझी म्हणावी तशी कदर केली नाही. कोणतीही महत्त्वाची जबाबदारी किंवा खासदारकीची उमेदवारी दिली नाही. पण याचा सर्व दोष मी स्वतःला देतो. कारण काँग्रेसमध्ये जाण्याचा सर्वस्वी निर्णय माझा होता. मी चुकीचा निर्णय घेतल्याने ही परिस्थिती आल्याचे मी मानतो. यामुळे मी काँग्रेस पक्षाला दोष देत नाही, असे ॲड. खलप म्हणाले.
राज्याची वाटचाल बेबंदशाहीकडे
विद्यमान सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपची वाटचाल पाहता राज्याची वाटचाल बेबंदशाहीकडे चालली आहे, असेच म्हणावे लागेल. आर्थिक नितीत सरकार अपयशी ठरले आहे. चुकीचे उद्योग, कॅसिनो संस्कृती, बेसुमार लोकसंख्या, बेरोजगारी अशा अनेक कारणांमुळे राज्याची पिछेहाट होत आहे. पूर्वी खाण लॉबी निवडणुकांसाठी पैसा पुरवायची, आता कॅसिनो लॉबी राजकीय पक्षांना पैसा पुरवू लागली आहे. तसेच महामार्गाचे कंत्राट घेणाऱ्या कंपन्यांही यासाठी पुढे येत आहेत. भविष्यकाळात ड्रग्स लॉबीही निवडणुकांमध्ये उतरेल, अशी भीती खलप यांनी व्यक्त केली.
आज ‘गोमन्तक टीव्ही’वर
ज्येष्ठ नेते ॲड. रमाकांत खलप यांची ‘गोमन्तक टीव्ही’वर विशेष मुलाखत आज शुक्रवारी सकाळी 9, दुपारी 12 आणि 2 वाजता प्रक्षेपित करण्यात येईल. यू-ट्युबवरही ती पाहता येईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.