म्हापसा: गोमेकॉतून उपचारानंतर आज घरी पाठवण्यात आलेले रामा काणकोणकर यांनी केलेले आरोप, हे सरकारची बदनामी करण्यासाठी तसेच मुद्दाम राजकीय रंग देण्यासाठी केलेले प्रयत्न आहेत, असा पलटवार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आहे.
काणकोणकर यांनी दोन ज्येष्ठ मंत्र्यांची नावे घेतल्यावर म्हापसा येथे एका कार्यक्रमाला उपस्थित राहून परतताना मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, की “सरकार या प्रकरणाकडे अत्यंत गांभीर्याने पाहात आहे.
रामांकडून मिळालेल्या माहितीवरून अनेकजणांना अटकही करण्यात आली आहे. त्यांचे आधीचे निवेदन पोलिसांनी नोंदवले आहे. इतक्या दिवसांनी त्यांनी पुन्हा नवीन विधान करून प्रकरण संवेदनशील करण्याचा प्रयत्न केला आहे.”
मुख्यमंत्री म्हणाले, “लोक मला चांगले ओळखतात. गेली २५ वर्षे मी राजकारणात आहे. अशा किरकोळ आणि नीच गोष्टी करण्यासाठी मी येथे नाही.” त्यांनी स्पष्ट केले, की या हल्ल्याची सखोल चौकशी करण्यात येईल आणि दोषींना शिक्षा मिळेल.
१८ सप्टेंबर रोजी करंझाळे येथील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेले सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर एका टोळीने जीवघेणा हल्ला चढवत त्यांना केबलने मारहाण केली होती. यात गंभीर जखमी झालेल्या काणकोणकर यांना उपचारांसाठी तत्काळ गोमेकॉत दाखल केले होते. भर दुपारी झालेल्या या हल्ल्यामुळे राज्यात खळबळ उडाली होती.
यावरून सर्वच विरोधी पक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत राज्य सरकारवर हल्लाबोल चढवला तसेच पणजीतील आझाद मैदानावर आंदोलनही छेडले होते. पोलिसांनी पहिल्या दिवशी पाच आणि दुसऱ्या दिवशी दोन अशा सातजणांना अटक केली.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी या प्रकरणात अट्टल गुन्हेगार जेनिटो कार्दोज यालाही अटक केली असून हे सर्वच संशयित सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
दरम्यान, पोलिसांनी रामा काणकोणकर यांचा जबाब नोंदवण्याचे प्रयत्न सुरू केले होते. परंतु, मानसिकता ठीक नसल्यामुळे त्यांनी जबाब नोंदवण्यास नकार दिला व २ ऑक्टोबरला जबाब दिला होता. त्यांचा सहा पानी जबाब सोशल मीडियाद्वारे व्हायरल झाल्यानंतर उत्तर गोवा अधीक्षक राहुल गुप्ता यांनी काणकोणकर यांनी जबाबात काय म्हटले आहे आणि कुणाची नावे घेतली आहेत, याची माहिती जनतेला दिली होती.
२४ दिवस उपचार घेतल्यानंतर काणकोणकर यांना शनिवारी गोमेकॉत डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी, आपल्याला झालेल्या मारहाण प्रकरणात दोन ज्येष्ठ मंत्र्यांची नावे घेतली होती. परंतु, मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी त्यांचे हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
1 गोव्यासाठी, एसटी समाजासाठी आवाज उठवतो म्हणूनच माझ्यावर हल्ला झाला. पण, मी जबाब नोंदवण्याआधीच वैयक्तिक वैरातून माझ्यावर हल्ला झाल्याच्या चुकीच्या चर्चा सुरू झाल्या. माझ्यावर झालेला हल्ला पूर्वनियोजित होता.
2 खाप्रेश्वर मंदिराच्या स्थलांतरावेळी मी घेतलेल्या भूमिकेनंतर मला अटक झाली. त्यानंतर जामिनावर असताना माझ्यावर दोनवेळा हल्ला झाला. त्यात मिंगेल आरावजो याचा सहभाग होता. १८ सप्टेंबर रोजी झालेल्या हल्ल्यातही त्याचा सहभाग होता.
३ २ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी माझा तीन तासांचा जबाब रेकॉर्डिंग केला. त्यात हल्ल्यावेळी जे घडले त्याची माहिती आणि मला संशय असलेल्या दोन मंत्र्यांची नावे मी घेतलेली होती.
1 जीवघेण्या हल्ल्याबाबत रामा यांनी दोन मंत्र्यांची नावे घेतल्यानंतर या प्रकरणावरून विरोधक पुन्हा एकदा आक्रमक झाले. या प्रकरणाचा तपास तत्काळ ‘सीबीआय’कडे सोपवण्यात यावा, काणकोणकर यांनी दोन मंत्र्यांची नावे घेतली असल्यामुळे सरकारी व्यवस्थेवरील विश्वास पुनर्प्रस्थापित करण्यासाठी त्या दोन मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशा मागण्या विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केल्या.
2 काणकोणकर यांनी केलेल्या आरोपांमुळे या प्रकरणाची खोलवर चौकशी होणे आवश्यक आहे. ‘गोवा अगेन्स्ट गुंडाराज’चा नारा देत सामाजिक कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व विरोधी पक्ष एकत्र आले होते, आता या सर्वांनी एकत्रित येऊन याबाबत ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे. काणकोणकर यांनी राजकारण्यांची नावे जबाबात घेतली असतील तर इतक्या उशिरा ती का पुढे आली? असा सवाल आमदार तथा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी उपस्थित केला.
३ काँग्रेस नेते अमित पाटकर आणि गिरीश चोडणकर यांनीही, रामा काणकोणकर यांनी आपल्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी दोन मंत्र्यांची नावे घेतली असल्याने त्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
रामा यांचे आरोप तथ्यहीन आहेत. राज्य सरकार आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची प्रतिमा मलिन करण्यासाठीच ते अशा पद्धतीचे आरोप करीत आहेत. गेली २४ दिवस इस्पितळात असताना जी नावे घेतली नव्हती, ती नावे त्यांनी डिस्चार्ज मिळाल्यानंतर कशी काय घेतली? त्यातही ते संशय असल्याचे म्हणत आहेत. यातूनच त्यांनी केलेले आरोप राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचेच स्पष्ट होते. ते ज्यांच्यावर आरोप करीत आहेत, त्यांच्याबाबतचे पुरावे त्यांनी पोलिसांसमोर सादर करावे, असे आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिले. आमचा पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. पोलिस अधिक तपास करून निश्चित या प्रकरणाच्या मुळाशी जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
रामा माझ्यावर झालेल्या पहिल्या हल्ल्यापासून शेवटपर्यंत पोलिसांनी मला सहकार्य केले नाही. त्यामुळे पोलिस तपासावर माझा विश्वास नाही. या प्रकरणाची स्वतंत्र एजन्सीमार्फत चौकशी होणे गरजेचे आहे. त्यावेळी मी अजूनही काही गोष्टी सांगू शकतो, असे रामा काणकोणकर म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.