पणजी: अग्निशामक दलाची स्थापना झाल्यापासून गेल्या 37 वर्षांत प्रशिक्षण व उपकरणांच्या उपलब्धतेत आमूलाग्र बदल झाला आहे. अत्याधुनिक उपकरणांमुळे या दलाच्या कर्मचाऱ्यांना लोकांचे जीव तसेच मालमत्ता वाचविण्यास खूपच मदत होत आहे. खात्याचे अधिकारी व कर्मचारीही कोणत्याही घटनेला सामोरे जाण्यास तयार आहेत, अशी माहिती संचालक अशोक मेनन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अग्निशमन खात्यातील 35 वर्षांच्या सेवेनंतर मेनन येत्या 31 ऑक्टोबरला सेवेतून निवृत्त होत आहेत. या खात्यासाठी दिलेले योगदानाबद्दल बोलताना ते म्हणाले की, 1985 मध्ये साहाय्यक अग्निशमन अधिकारी म्हणून खात्यात रूजू झालो. त्यानंतर बढती मिळत 2006 मध्ये संचालकपदी (प्रशासक) वर्णी लागली. 2010 नंतर खात्याचे संचालक म्हणून ताबा घेतल्यावर या दलाचा पूर्ण कायापालट करण्यासाठी प्रयत्न केला. सध्या राज्यात 15 अग्निशमन स्थानके आहेत. पेडणे व काणकोण येथेही स्थानकांसाठी जमीन भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. एकेकाळी राज्यात फक्त 4 अग्निशमन स्थानके होती. मुळे आगीच्या किंवा दुर्घटनेच्या ठिकाणी वेळेत पोचणे शक्य होत नव्हते. आता माहिती मिळताच काही मिनिटातं पोचून मालमत्ता वाचवणे शक्य होते.
मेनन यांनी आपल्या कारकिर्दीमधील मांडवी पूल पडण्याची घटना तसेच विविध ठिकाणची आग विझविण्यासाठी असलेल्या तुटपुंज्या उपकरणांमुळे होणाऱ्या अडचणी, त्यासाठी जवानांना व अधिकाऱ्यांना आगीशी द्यावी लागणारी झुंज याबाबतचे अनुभव कथन केले. निवृत्त झाल्यानंतरही लोकांना आग प्रतिबंधक प्रशिक्षण मोफत देण्यास उपलब्ध असेन, असे मेनन म्हणाले.
खात्यात अनेक पदे रिक्त
या खात्यात सध्या 1180 कर्मचारी विविध पदांवर काम असले तरी ही संख्या खूपच कमी आहे. दिवसेंदिवस राज्यात निवासी व हॉटेल्सची बांधकामे उभी राहत आहेत. आस्थापनांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे या खात्यावरील कामाचा ताणही वाढला आहे. खात्यात 3 विभागीय अधिकारीपदे आहेत. मात्र दोन पदे रिक्त आहेत. 5 साहाय्यक विभागीय अधिकारी आहेत. रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी प्रयत्न करूनही त्यासाठी अजून सरकारकडून मंजुरी मिळण्यात अडचणी येत आहेत. या खात्याचे विकेंद्रीकरण करण्यात आल्याने अधिकाऱ्यांना बढती मिळण्यास मदत झाली, असे मेनन म्हणाले.
सरकारचे वेळोवेळी सहकार्य
सरकारने वेळोवेळी दिलेल्या सहकार्यामुळेच अग्निशमन दलामध्ये अत्याधुनिक उपकरणे आणणे शक्य झाले आहे. ज्या ठिकाणी रस्ते अरुंद आहेत तेथे दलाचे बंब जाऊ शकत नाहीत. त्यामुळे डिचोली व वाळपई यासारख्या भागातील अरुंद रस्त्याच्या भागात जाण्यास लहान वाहने जिल्हा खनिज निधीतून घेण्यात आली आहेत. या दोन वाहनांचे उद्घाटन आज दुपारी 12 वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सध्या खात्याच्या मुख्यालय इमारतीचे काम झपाट्याने सुरू आहे. नवीन 370 जवानांची भरती प्रक्रिया सुरू आहे. आणखी 565 जवानांच्या भरतीसाठीचा प्रस्ताव सरकारला पाठवण्यात आलेला आहे, असे मेनन म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.