Priya Yadav Cash For Job
डिचोली: नोकरीच्या आमिषाला बळी पडलेल्या काही महिलांनी सुवर्णालंकार बँकेत तारण ठेवून संशयित प्रिया यादवला पैसे दिले आहेत. संबंधित काही महिला कर्जबाजारीही झाल्या आहेत, अशी धक्कादायक माहिती मिळाली आहे.
नोकरीचे आमिष दाखवून अनेकांना ठकविणाऱ्या आणि सध्या पोलिस कोठडीची हवा खात असलेल्या प्रिया यादव हिने आपल्या सौंदर्याची मोहिनी टाकून अनेकांना गंडा घातल्याची माहिती समोर येत आहे. ‘प्रिया’चे आणखीनही काही ‘कारनामे’ समोर येण्याची शक्यता वाढली आहे.
दरम्यान, प्रिया यादव हिचा सध्या गोव्यात गाजत असलेल्या ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणाशी संबंध असून, तिने महाराष्ट्रात रेल्वेत नोकरी देण्याचे आमिष आणि अन्य वैयक्तिक कारणांसाठी लोकांना गंडा घातला आहे. प्रिया यादव हिच्याविरोधात आणखीनही गुन्हे नोंद होणार असल्याची विश्वसनीय माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे.
प्रिया यादव ही मूळची पेडणे तालुक्यातील एका गावातील असून, तिचे माहेरचे नाव ‘प्रार्थना’ आहे. लग्नानंतर तिचे नाव प्रिया यादव असे झाले होते.
गेल्या सात-आठ वर्षांपासून प्रिया ही डिचोलीत राहत होती. नवऱ्याने तिला सोडचिठ्ठी दिली आहे. सुरवातीस ती डिचोलीत काही ठिकाणी घरकाम करत होती.
अधूनमधून ती ओळखीच्या महिलांकडे राहत होती. अलीकडच्या काळात शहरातील बोर्डे परिसरात एका फ्लॅटमध्ये ती आपल्या छोट्या मुलीसह राहत होती.
तिची मुलगी शहराबाहेरील एका खासगी शाळेत शिकत होती. घरकाम करणाऱ्या प्रियाची जीवनशैली अचानक बदलून ती ‘हाय-फाय’ जीवन जगत होती.
रेल्वेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून तिने अनेकांना गंडा घातला असून, काही स्वयंसाहाय्य गट तसेच ‘कोप्री’मधून तिने पैसे घेतले आहेत.
प्रियाने अनेकांना मोहपाशात अडकवले आहे. अनेकांना तिने कोल्हापूर येथे नेऊन श्री महालक्ष्मीचे दर्शनही घडवून आणले, अशी चर्चा सध्या डिचोलीत सुरू आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.