Portuguese Dainik Gomantak
गोवा

Portuguese Order in Goa : गोव्याचा चेहरामोहरा बदलणारा 1736 चा आदेश

गोव्यातील पोर्तुगीज राजवटीच्या सुरुवातीच्या शतकांमध्ये सरकारने आपल्या शासनाशी एकनिष्ठ असणारे नागरिक निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला.

गोमन्तक डिजिटल टीम

Portuguese Order in Goa : पोर्तुगीज राजवट आली तेव्हा, अनेक वंशांच्या, संस्कृतीच्या आणि घराण्यांच्या लोकांचे गोव्यावर राज्य होते. एकाच ठिकाणी वसलेल्या भिन्न संस्कृतींवर एक परदेशी संस्कृती लागली गेली. त्यात परदेशी भाषा, पंथ, संगीत, वास्तुकला, पेहराव, सवयी आणि पाककृती यांचा समावेश होता. स्थानिक लोकांच्या तुलनेत स्वत:ला श्रेष्ठ वंशाचे आणि संस्कृतीचे समजत असलेल्या ‘गोऱ्या’ लोकांचे गोव्यातील लोकांवर राज्य होते. पोर्तुगीज राज्यकर्त्यांनी त्यांची संस्कृती लादण्यासाठी पाशवी कायदे केले; विशेषतः सुरुवातीच्या शतकांमध्ये.

गोव्यातील पोर्तुगीज राजवटीच्या सुरुवातीच्या शतकांमध्ये सरकारने आपल्या शासनाशी एकनिष्ठ असणारे नागरिक निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. गोव्यात कमी-अधिक प्रमाणात पोर्तुगीजांशी साधर्म्य असलेला समाज आणि संस्कृती निर्माण करण्यासाठी ख्रिस्तीकरणाचे धोरण अवलंबले गेले. जेणेकरुन गोवावासीयांकडून विरोध होऊ नये व राज्य करणे सुलभ व्हावे. एकदा का हे सामाजिक, सांस्कृतिक रूपांतरण झाले की, विरोध मावळतो आणि प्रजा आणि शासनकर्ते यांच्यात सुसंवाद सुरू होतो.

पाद्रोआदो प्रणालीत राज्यविस्तार आणि पंथविस्तार यात भिन्नता नव्हती, त्यामुळे क्रॉस व तलवार हातात हात घालून जगभर हिंडले. पोर्तुगालच्या राजांनी सर्वांना ख्रिश्चन करणे हे त्यांचे सर्वांत महत्त्वाचे कर्तव्य मानले. या धोरणामुळे राजे इस्टाडो दा भारताचे आध्यात्मिक आणि ऐहिक प्रमुख बनले. धर्मांतराचे फर्मान राजांनी मंजूर केले. या भारतीय भूमीला ‘पड्रोडो जमीन’, असे संबोधले गेले. राज्याशी एकनिष्ठ राहण्यासाठी भारतीय भूमीवर जिथे जिथे पोर्तुगीज गेले तिथे तिथे प्रत्येकाला ख्रिश्चन करण्याचे धोरण अवलंबले गेले. प्रारंभी स्थानिक स्त्रियांशी विवाह करून त्यांचे धर्मांतरण केले गेले; जेणेकरून त्यांची संतती कॅथलिक म्हणून जन्माला येईल. ‘इंडो-पोर्तुगीज स्त्रिया पाहिजेत’ या शीर्षकाखाली लिहिलेल्या लेखात, तिओटोनियो डी सूझा यांनी वांशिक एकत्रिकरणाचा आढावा घेतला आहे. लोकसंख्येचा आणि लोकसंख्याशास्त्रीय अभ्यासाचा उपयोग सखोल वांशिक एकीकरण ओळखण्यासाठी कसा केला जातो व केवळ ‘लुसो’ वंशजांपपुरतेच नव्हे तर सर्व ’लुसो आणि स्थानिक’ एकत्रित वंशावळीचा अभ्यास केला जातो, हे स्पष्ट केले आहे. पोर्तुगीज काळात अनेकांनी ख्रिश्चन पंथ स्वीकारला. काहींनी स्वैच्छिक, तर काहींनी जबरदस्तीने किंवा प्रलोभने स्वीकारला. पोर्तुगीज सरकारकडे वसाहतींचे पूर्णपणे ख्रिश्चनीकरण करण्याचा एक विशिष्ट अजेंडा होता. म्हणून त्या वसाहतीतील स्थानिकांसाठी धर्मांतर करण्यास बाध्य करणारे कायदे संमत झाले. या कायद्यांमुळे ‘आचार संहिता’ म्हणून सरकारला नेमके काय अपेक्षित आहे हे लोकांना कळले. स्थानिकांना आपली वेशभूषा, राहण्याची पद्धत, जगण्याची पद्धत व सांस्कृतिक प्रथा यांचा त्याग करून ख्रिश्चन पद्धतीप्रमाणे वागणे बंधनकारक होते. पण, या ‘आचार संहिते’चे उल्लंघन करणे म्हणजेच कायद्याचे उल्लंघन करणे, अशा पद्धतीने सरकारी अधिकारी वागत. आपल्या प्रथा जपाव्यात तर शिक्षेचे भय, न जपाव्यात तर सांस्कृतिक ठेवा घालवून बसण्याचे भय अशा दुहेरी कात्रीत गोमंतकीय सापडले.

इन्क्विझिशन आणि 1736 चा आदेश

1560 साली गोव्यात इन्क्विझिशनची स्थापना करण्यात आली. त्याचे अधिकार क्षेत्र ‘केप ऑफ गुड होप’च्या पूर्वेकडील सर्व पोर्तुगीज वसाहतींच्या भूभागापर्यंत विस्तारले. नवीन धर्मांतरितांमध्ये त्यांच्या जुन्या धर्माच्या पद्धतींकडे परत जाण्याची सहजप्रवृत्ती मोठ्या प्रमाणात होती. या ’मूर्तिपूजक’ विधर्मी प्रवृत्तींना रोखण्यासाठी, शोधून काढण्यासाठी आणि शिक्षा करण्याच्या उद्देशाने इन्क्विझिशन अस्तित्वात आले.नव-धर्मांतरितांना त्यांच्या पूर्वजांचे संस्कार आणि चालीरीती, अगदी बंद दरवाजाच्या मागे पाळण्यास मनाई होती. इन्क्विझिशनने केलेल्या छळामुळे शेजारच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर लोक स्थलांतरित झाले. एकदा अटक करून तुरुंगात टाकल्यानंतर पीडितांना पुली, पाणी किंवा आग यांपासून केल्या जाणारा अमानुष छळ सोसावा लागे. खांबाला बांधून जिवंत जाळले जात असे. 1774 मध्ये पोर्तुगालचे उदारमतवादी मंत्री मार्केस डी पोम्बल यांच्या प्रयत्नांमुळे इन्क्विझिशनचे कार्य काही काळ थांबले, परंतु 1778 साली पोर्तुगालची राणी डी. मारिया यांच्या कारकिर्दीत ते 1812 साली संपुष्टात येईपर्यंत इन्क्विझिशन सुरूच होते. परंतु, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शक्ती त्यानंतरही अन्य मार्गांनी कार्यरतच राहिल्या. त्यामुळेच, नवख्रिश्चन झालेल्या हिंदू धर्मीयांना, त्यांनी हिंदू प्रथा पाळण्याच्या गुन्ह्यांबद्दल(?) पवित्र न्यायाधिकरणाच्या अमानुष शिक्षा भोगाव्या लागल्या. 1736 साली गोव्यात प्रसिद्ध झालेल्या एका अतिशय व्यापक आदेशात या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. पोर्तुगीजांनी मूळ गोव्यातील धर्मांतरितांच्या संस्कृती आणि जीवनशैलीवर कसा प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला हे स्पष्ट करणारे होते याचे हे फर्मान एक उत्तम उदाहरण आहे.

या फर्मानाच्या प्रस्तावनेत त्याची उद्दिष्टे मांडण्यात आली होती. ‘न्याय करणाऱ्यांना असे वाटले की, गोवा बेट, लगतच्या बेटांवर, सासष्टी आणि बार्देश या उपजिल्ह्यांतील नव-ख्रिश्चन, ते हिंदू असताना पाळत असलेल्या काही चालीरीती व प्रथा आजही पाळत आहेत. कॅथलिक पंथाची शुद्धता टिकवून ठेवण्यासाठी या हिंदू रीतिरिवाजांचे आचरण करण्यास नव-ख्रिश्चनांना बंदी घालण्यात आली आहे.’

‘पूर्वाश्रमीच्या अशा रीतिरिवाजांमुळे, प्रथेमुळे निष्ठावंत कॅथलिक विवेकबुद्धीला होणारी अपायकारक हानी रोखणे’, हासुद्धा या आदेशाचा उद्देश होता. ‘अशा सर्व रद्द करण्यात आलेल्या प्रथा पाळल्या जात नाहीत, हे सुनिश्चित करणे महत्त्वाचे आहे. ख्रिश्चनांनी, त्यांच्या सर्व वर्तनात, हिंदूंशी कसलेही साम्य ठेवता कामा नये. पोर्तुगिजांशी निष्ठावंत राहावे म्हणून नव-धर्मांतरितांना अशा प्रथा पाळण्यास मनाई केली जावी.’

प्रतिबंधित रूढींची, प्रथांची यादी इतकी लांबलचक आहे की, त्यावर आजच्या गोमंतकीयांचा विश्वास बसणे कठीण आहे. मानवी अस्तित्वाच्या प्रत्येक टप्प्यावर हिंदू संस्कृती स्वीकारलेल्यांना आणि अंगीकारलेल्यांना, त्या सर्व सांस्कृतिक, हिंदू प्रथांना पाळण्यास मनाई करण्यात आली होती. एवढेच नव्हे तर त्या पाळल्या जातात की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी कायम पाळत ठेवण्यात आली होती. त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या रीतिरिवाजांचे पालन केल्याचे लक्षांत येताच त्यांची इन्क्विझिशनद्वारे अटक केली जात असे आणि खटला चालवण्यात येई. मिशनरींनी स्थानिक लोकांचे धर्मांतर करण्यासाठी विविध पद्धती वापरल्या; जसे की कर्जवाटप आणि कर माफी, जमिनीच्या सवलती, भेटवस्तू, पदांवर नियुक्ती इत्यादी अनेक. जेव्हा या पद्धतींचा अपेक्षित परिणाम झाला नाही, तेव्हा त्यांनी हकालपट्टी, बंदी यांसारख्या कठोर पद्धतींचा अवलंब केला. धार्मिक विधी करण्यास मनाई, देवतांच्या प्रतिमा नष्ट करणे आणि मंदिरे पाडणे इत्यादी अनेक नृशंस उपक्रम राबवले गेले. - पूर्वार्ध

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT