पणजी : पूजा नाईकच्या ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणातील ‘तो’ मंत्री, आयएएस अधिकारी आणि अभियंता कोण? असा प्रश्न गुलदस्त्यात असतानाच या प्रकरणात विद्यमान वीजमंत्री सुदिन ढवळीकर, आयएएस अधिकारी निखिल देसाई आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर या तिघांचा सहभाग असल्याची जनतेत चर्चा असल्याचे सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी खळबळ उडवून दिली आहे. या तीन नावांबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तत्काळ स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
‘‘माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मंत्रिमंडळातील विद्यमान सदस्य सुदिन ढवळीकर, तसेच सध्या दमणमध्ये बदलीवर असलेले आयएएस अधिकारी निखिल देसाई आणि प्रधान मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर यांच्या सहभागाची चर्चा संपूर्ण गोव्यात सुरू आहे. विद्यमान मंत्री त्यात सामील आहेत का, यासंदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपली भूमिका आता स्पष्ट करावी’’, असे अमित पाटकर म्हणाले.
‘‘सरकारने आता लपवाछपवी न करता जे काय आहे ते अत्यंत स्पष्ट करावे, साऱ्या जनतेला ही नावे कोणाची आहेत ते समजले आहे. एका वृत्तवाहिनीने पूजा नाईकची मुलाखत जाहीर केल्यानंतर पत्रकारांवर मंत्र्याने दोषारोप सुरू केले आहेत’’, असेही त्यांनी सांगितले.
प्रदेशाध्यक्ष पाटकर पुढे म्हणाले, ‘‘हा खूप मोठा घोटाळा आहे. त्यात मंत्री, आयएएस अधिकारी आणि प्रधान मुख्य अभियंता गुंतला असेल व त्या मंत्र्याचे नाव घेऊन कथित आरोप झाला असेल तर एका अधीक्षक पदावरील अधिकाऱ्याला तुम्ही पत्रकारांसमोर बोलायला का लावता?
पोलिस महासंचालक कुठे आहेत? एक अधीक्षक आयएएस अधिकाऱ्याची चौकशी करू शकतो काय? लोकांची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे. हे सरकार भ्रष्ट आहे व तसे संपूर्ण जनता बोलू लागली आहे. ही नावे गोव्यात चर्चेचा विषय ठरली असून, मुख्यमंत्र्यांनी त्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी.’’
‘‘ढवळीकर या प्रकरणात गुंतले नसतील तर सरकारने तसे स्पष्टीकरण द्यावे. कारण ते (ढवळीकर) या सरकारात कॅबिनेट मंत्री आहेत. वीज दरवाढ प्रकरणात मोठा घोटाळा घडू पाहत होता. मंत्र्यांनी पहिल्या दिवशी एक वक्तव्य केले, तर दुसऱ्या दिवशी यू-टर्न घेतला. प्रधान मुख्य अभियंता अजून त्या पदावर असून, त्यांना सतत मुदतवाढ दिली जात आहे. मुख्यमंत्री या प्रकरणात गप्प का आहेत’’, असा सवालही पाटकर यांनी उपस्थित केला.
‘‘काँग्रेस पक्ष या प्रश्नावर कठोर भूमिका घेत असून, यात युवकांवर अन्याय होत आहे. युवकांनी कर्ज काढून हे पैसे आणून दिले असून, राष्ट्रीय पातळीवर तसेच संसदेतही हा प्रश्न आम्ही उपस्थित करू’’, असे पाटकर यांनी नमूद केले.
भाजप सरकार नोकऱ्या विकते, हे या प्रकरणातून सिद्ध झाले आहे. नोकऱ्यांसाठी हे जे पैसे दिले आहेत, ते सरकारने जप्त केले पाहिजेत. कारण नोकऱ्यांसाठी अशी लाच देणे, हासुद्धा गुन्हाच आहे.विजय सरदेसाई, आमदार, गोवा फॉरवर्ड
अमित पाटकर यांनी ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणात ज्यांची नावे घेतली, त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. हा विषय आम्ही राष्ट्रीय पातळीवरही नेणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणातील सत्य लवकर बाहेर आणावे. गिरीश चोडणकर, काँग्रेस नेते.
‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणात जे सहभागी आहेत, त्यांच्यावर तत्काळ कारवाई झाली पाहिजे. मंत्री सुदिन ढवळीकरांचा त्यात सहभाग असेल, तर मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा. शिवाय त्यांची आमदारकीही रद्द करण्यात यावी. सर्व विरोधी पक्ष मिळून कृती ठरवू.वीरेश बोरकर, आमदार, अारजी.
विद्यमान मंत्री सुदिन ढवळीकर ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणात सहभागी असल्याचे आपण याआधीच सांगितले आहे. ढवळीकरांसह आयएएस अधिकारी आणि अभियंत्यावर मुख्यमंत्र्यांनी कारवाई केलीच पाहिजे. शिवाय या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी झाली पाहिजे. या घोटाळ्यामुळे गोमंतकीय युवकांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे आम्ही हा निवडणुकीचा विषय बनवू.ॲड. अमित पालेकर, राज्य निमंत्रक, आप.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.