पेडणे: दोडामार्ग-तिळारी परिसरातून आलेल्या ओंकार नामक हत्तीची मूळ कळपापासून ताटातूट झाल्याने त्याने बुजलेल्या अवस्थेत गोव्यात प्रवेश केला आहे. त्याने अद्याप लोकांना कोणत्याही प्रकारचा उपद्रव केलेला नाही. मात्र, त्याला पुन्हा त्याच्या मूळ कळपापर्यंत पोहोचवण्यासाठी वन अधिकाऱ्यांची शिकस्त सुरू असून या हत्तीवर ड्रोन कॅमेऱ्याद्वारे लक्ष ठेवले जात आहे. मोपा विमानतळाच्या एक किमी परिघात हत्ती पोहोचल्याचे रात्री निष्पन्न झाले आहे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग-तिळारी परिसरातील घोटगे, मोर्ले गावांमध्ये चार-पाच हत्तींचा कळप धुमाकूळ घालत होता. याच कळपातील ओंकार हा हत्ती शुक्रवारी कळणे, उगाडे गावातून डेगवे, डोंगरपालमार्गे नेतर्डे-धनगरवाडी येथे आला.
दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पुन्हा जागा झाला. नंतर तो डोंगरपाल-नेतर्डे परिसरातील जंगलात घुटमळत होता. रात्री फकिरपाटो येथून कडशी नदीच्या किनाऱ्याजवळून तो गोव्यात प्रवेश करताना दिसला. हा हत्ती शनिवारी संपूर्ण दिवसभर नेतर्डे व धनगरवाडी परिसरातच घुटमळत होता. सिंधुदुर्ग वनविभाग अधिकारी, कर्मचारी, जलद कृती दल यांच्यासह गोवा वनविभागाचे पथकही या हत्तीवर लक्ष ठेवून आहेत.
रविवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास गावठणवाडा-मोपा येथील श्री वेताळ मंदिराजवळ कुत्रे भुंकू लागले म्हणून लोकांनी पाहिले तर हा हत्ती अगदी लोकवस्तीजवळ पोहोचलेला होता. स्थानिकांनी याची माहिती वन खात्याच्या अधिकाऱ्यांना दिल्यावर ॲटम बॉम्ब आणि फटाके लावून त्याला लोकवस्तीपासून रानात पळविण्यात यश आले.
सिंधुदुर्गातून गोव्यात आलेला हा हत्ती दहा वर्षे वयोमानाचा आहे. त्याच्या कळपात आणखीन चार सदस्य असून त्यांच्याशी चुकामूक होऊन तो महाराष्ट्राच्या हद्दीतून गोव्याच्या हद्दीत आला. कळपातील सदस्यांना शोधत तो गोव्यात आला असावा, असा वन अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.
वाट चुकलेल्या या हत्तीच्या कळपातील इतर सदस्य आता कोल्हापूर जिल्ह्यात पोचले असल्याचे माहिती महाराष्ट्राच्या वन खात्याने गोवा वन खात्याला दिली आहे. या हत्तीच्या बंदोबस्तासाठी गोवा राज्य वन खात्याचे चीफ कंझर्व्हेटर नवीन कुमार, डेप्युटी चीफ कंझर्व्हेटर जीत वारके, रेंज फॉरेस्ट ऑफिसर सेबेस्तियान रॉड्रिग्स, पेडणे वनविभागाचे प्रमुख महाले यांच्यासह फोंडा वन खात्याचे मुख्यालय, म्हादई वन खाते, तसेच पेडणे वन खात्याच्या कार्यालयातील मिळून एकूण ४५ कर्मचारी मोपा परिसरात पाच ठिकाणी तंबू ठोकून या हत्तीवर लक्ष ठेवून आहेत.
काही वर्षांपूर्वी हसापूर, इब्रामपूर, तळर्ण - हळर्ण या भागात महाराष्ट्राच्या हद्दीतून आलेल्या हत्तींनी धुडगूस घालून शेती बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान करून दहशत निर्माण केली होती. त्यावेळी गोवा सरकारने दोन पाळीव हत्ती आणून त्या उपद्रवी हत्तींना महाराष्ट्राच्या हद्दीत पिटाळून लावण्यात यश मिळविले होते. २००५ मध्ये हत्तींनी केलेल्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे लोकांमध्ये हत्तीविषयी दहशत निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर तांबोसे - मोपा- उगवेचे सरपंच सुबोध महाले यांनी एक व्हिडिओ जारी करून लोकांना आवाहन केले आहे की, महाराष्ट्र वन खात्याने दिलेल्या माहितीनुसार, हा हत्ती आक्रमक नाही. असे असले तरी विषय गंभीर असल्याने रात्रीच्या वेळी कोणीही रस्त्यावर किंवा घराबाहेर पडू नये. घराबाहेर विजेचे दिवे लावावेत, जेणेकरून हत्ती जवळपास येण्यास धजणार नाही. वन खात्याचे अधिकारी व कर्मचारी या हत्तीला महाराष्ट्राच्या हद्दीत पाठवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
रविवारी संध्याकाळी महाराष्ट्राच्या हद्दीच्या दिशेने या हत्तीला पिटाळण्यात गोव्याच्या वन खात्याला यश आले होते. हा हत्ती महाराष्ट्राच्या हद्दीच्या दिशेने मार्गक्रमण करीत होता; पण महाराष्ट्राच्या सीमेवर वन खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी असल्याने त्याने पुन्हा मोपाच्या बाजूने मोर्चा वळवला.
गोव्यात हत्ती येण्यामागे त्यांचा विस्कळीत झालेला अधिवास कारणीभूत आहे. त्यांचे खाद्य असलेले बांबू व इतर झाडे जंगलातून कर्नाटकात कागद कारखान्यासाठी नेले जात आहेत. त्याशिवाय एका हत्तीला दिवसाला शंभर ते दीडशे लीटर पाणी लागते. त्यामुळे हे हत्ती तिळारी धरण परिसरात आले होते. त्यामुळे आम्ही महाराष्ट्र सरकारला हा परिसर ‘हत्तीग्राम’ करावा, त्याप्रमाणे आराखडा तयार करावा, जेणेकरून त्यांचा अधिवास सुरक्षित राहील, असे सुचविले होते. कळप सोडून आलेला हा ओंकार हत्ती काही दिवस येथेच मुक्काम करेल. मात्र, लोकांनी त्याला हुसकवण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा तो बिथरल्यास लोकांच्या जीवावर उठण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन दिवस शांत राहिल्यानंतर तो पुन्हा कळपाकडे परतू शकतो. त्यासाठी लोकांनी शांत राहणे गरजचे आहे, असे पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.