आपल्या कार्यामुळे 'वृक्षमाता' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि पद्मश्री सन्मानाने गौरवलेल्या सुप्रसिद्ध पर्यावरणवादी सालूमारदा थिमक्का यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी शुक्रवारी निधन झाले. त्यांनी ३८५ वडाची झाडे लावली आणि त्यांची आपल्या मुलांप्रमाणे काळजी घेतली. त्यांच्या निधनाने पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले असून, त्यांचे कार्य येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.
काणकोण येथे आज एक भीषण अपघात झाला. कर्नाटक नोंदणीकृत वाहन वास्कोहून कर्नाटकाच्या दिशेने जात असताना, समोरून येणाऱ्या एका दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, दुचाकीस्वार रस्त्याबाहेर फेकला गेला. या घटनेमुळे मार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
सांताक्रूझ येथे झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर वीज विभागाने पुन्हा एकदा बेकायदेशीर केबल्स हटवण्यास सुरुवात केली आहे. कार्यकारी अभियंता (EE) काशीनाथ शेट्ये यांच्या नेतृत्वाखालील अधिकाऱ्यांनी वीज खांबांवर लटकलेल्या या केबल्स काढून टाकण्याची मोहीम हाती घेतली आहे. ही कारवाई अपघात टाळण्यासाठी आणि वीज सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक आहे.
कोडार कोमुनीदाद समितीच्या दोन पदाधिकाऱ्यांनी आपले प्लॉट दुसऱ्या जागी गैरमार्गाने दाखवल्याचा आरोप कोडार गावातील स्थानिकांनी केला आहे. सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन चौकशी करावी अशी मागणी एसटी समाजातील लोकांनी केली आहे.
नार्वे येथील पंचगंगा तीर्थस्थळी लवकरच 'गोमंत सरीता दर्शन' अंतर्गत 'घाट आरती' प्रकल्प. पर्यटनमंत्री, राज्यसभा खासदार आदींच्या उपस्थितीत केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते प्रकल्पाची पायाभरणी.
पर्ये मतदारसंघात आमदार डॉ. दिव्या राणे यांच्या मार्गदर्शनाखाली बिहार विजय रॅली अतिशय उत्साहात पार पडली. ही भव्य रॅली मोर्ले ते होंडा भुईपाल या मार्गावर काढण्यात आली.
या रॅलीत मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्त्यांची उपस्थिती होती आणि संपूर्ण परिसर घोषणांनी दुमदुमून गेला होता.
सरकारी हायस्कूल, म्हापसा येथील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी 'विज्ञान सहल' उपक्रमांतर्गत सांताक्रूझ येथील 'मानस' या स्थळाला भेट दिली. या भेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना आणि पालकांना गोव्याची प्राचीन संस्कृती आणि भारतीय ज्ञान प्रणालीची समृद्धी समजावून सांगणे हा होता. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वैज्ञानिक शिक्षणासोबत सांस्कृतिक वारसा जाणून घेण्याची संधी मिळाली.
मोर्ले गावाच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी आमदार डॉ. दिव्या राणे यांच्या हस्ते मोर्ले कॉलनी येथील हॉटमिक्स डांबरीकरण कामाचे आज उद्घाटन करण्यात आले. मोर्लेमधील वाड्या-वाड्यांवरील रस्ते दुरुस्त करण्यासाठी आणि त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण करण्यासाठी अजून साडेतीन कोटी रुपये मंजूर झाले आहेत. सरपंच अमित शिरोडकर आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत विधिवत पूजा आणि नारळ फोडून या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
गोव्याची पर्यटन राज्य म्हणून असलेली प्रतिमा आता आध्यात्मिक क्रीडा व इतर विविध क्षेत्रातून पर्यटनदृष्ट्या पुढे आणण्यासाठी गोवा सरकार प्रयत्नशील आहे. याच अनुषंगाने हरवळे साखळीतील प्रसिद्ध श्री रुद्रेश्वर मंदिराच्या परिसराचे आधुनिक पद्धतीने सुशोभीकरण व विकास करण्यात येणार आहे. या परिसराचा संपूर्ण चेहरामोहरा बदलला जाणार असून केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन या योजनेतून १० कोटी रुपये या प्रकल्पासाठी मिळणार. तर उर्वरित १० कोटी गोवा सरकार खर्च करणार. राज्यात अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण व मोठे प्रकल्प केवळ केंद्रीय नेतृत्व खंबीर असल्यामुळेच होऊ शकत आहेत. संपूर्ण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू ठेवलेल्या विकास पर्वाला देश पातळीवर मोठा प्रतिसाद मिळत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हरवळे साखळी येथे केले. हरवळे साखळी येथील श्री रुद्रेश्वर देवस्थान परिसर व धबधब्याच्या सुशोभीकरण व विकास प्रकल्पाची पायाभरणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.