म्हापसा: दिवाळीच्या दिवशी ४ वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचा म्हापसा पोलिसांनी अवघ्या ७२ तासांत छडा लावला. या प्रकरणातील संशयित पुंडलिक करिअप्पा गुडगे (२८, सध्या रा. म्हापसा; मूळ रा. धारवाड-कर्नाटक) याला बुधवारी पणजी बसस्थानक परिसरातून अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
उत्तर गोवा पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत तपासाचा संपूर्ण घटनाक्रम उघड केला. या प्रकरणात वैज्ञानिक आणि परिस्थितीजन्य पुरावे भक्कमपणे गोळा करून लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येईल. तसेच खटला जलदगतीने चालविण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
म्हापसा टॅक्सीस्थानक परिसरात फुगे आणि खेळणी विकून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातील ही चिमुरडी ८ नोव्हेंबरच्या रात्री बेपत्ता झाली होती. मुलीचे वडील मजुरीचे काम करतात. त्या दिवशी सायंकाळी त्यांचे काही व्यक्तींशी भांडण झाले होते. त्यावेळी उपस्थित असलेल्या लोकांमध्ये संशयित पुंडलिकही होता. त्यामुळे त्याची आणि मुलीच्या वडिलांची तोंडओळख झाली होती.
रात्री वडिलांच्या गाफीलपणाचा गैरफायदा घेत संशयिताने चिमुरडीला फूस लावून तेथून नेले. त्यानंतर डॉ. राम मनोहर लोहिया उद्यानासमोरील एका निर्जन आणि पडक्या इमारतीत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. रात्री सव्वादहाच्या सुमारास रक्तबंबाळ आणि गंभीर जखमी अवस्थेत चिमुरडी रडत इमारतीबाहेर आली.
त्यावेळी स्थानिक मोटारसायकल पायलटांनी तिला पाहिले. त्यांनी प्रसंगावधान राखून तातडीने तिला चादरीत गुंडाळून उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथून पुढील उपचारांसाठी तिला गोमेकॉत हलविण्यात आले. सध्या तिची प्रकृती स्थिर असून समुपदेशक आणि स्वयंसेवी संस्थांकडून तिची देखभाल केली जात आहे.
ब्लाईंड केसपासून अटकेपर्यंतचा तपास
घटनेची माहिती मिळताच म्हापसा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. उत्तर गोवा पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता, म्हापसा उपअधीक्षक आशिष शिरोडकर आणि पोलिस निरीक्षक अनंत गावकर यांनी रात्रीच घटनास्थळी भेट दिली. फॉरेन्सिक आणि श्वान पथकाने घटनास्थळाची तपासणी केली. यावेळी तेथून एक संशयास्पद बॅग, चादर आणि चिमुरडीचे कपडे जप्त करण्यात आले.
तपासादरम्यान पोलिसांनी सर्वप्रथम पीडितेच्या कुटुंबाचा शोध घेतला. चिमुरडी वडिलांपासून कधी आणि कशी वेगळी झाली, याची माहिती मिळविण्यात आली. टॅक्सी स्टँड परिसरात झालेल्या भांडणावेळी उपस्थित असलेल्या व्यक्तींची चौकशी करण्यात आली.
दरम्यान, घटनास्थळाजवळील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक व्यक्ती चिमुरडीला गल्लीच्या दिशेने नेत असल्याचे स्पष्ट दिसले. या फुटेजमधील व्यक्ती टॅक्सी स्टँडवरील भांडणावेळी उपस्थित असलेल्यांपैकीच एक असल्याचे तपासात निष्पन्न झाले. मात्र, इतर सर्वजण बसस्थानक परिसरात उपस्थित असताना संशयित तेथून गायब असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.
अखेर बुधवारी सकाळी ७ ते ७.३० च्या दरम्यान पणजी बसस्थानक परिसरात दबा धरून बसलेल्या पोलिस पथकाने संशयित पुंडलिक गुडगे याला ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात संशयित म्हापसा येथून पायी चालत पणजीला पोहोचल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांच्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे तसेच घटनास्थळावर सापडलेली बॅग आपलीच असल्याचे मान्य केल्याचे अधीक्षक राहुल गुप्ता यांनी सांगितले.
कठोर कलमांखाली गुन्हा
म्हापसा पोलिसांनी संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १३७ (२) आणि ६५ (२), गोवा बाल कायद्यातील कलम ८ व ८(२), तसेच पॉक्सो कायद्यातील कलम ४, ६, ८, १० आणि १२ अन्वये गुन्हे नोंदवले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक नवीना साउतोडकर करत आहेत.
सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे एसपींचे आवाहन
या प्रकरणाच्या तपासात सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरल्याने उत्तर गोवा पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांना विशेष आवाहन केले आहे. गुन्हे रोखण्यासाठी तसेच गुन्हे घडल्यानंतर तपासाला मदत होण्यासाठी दुकाने आणि घरांच्या बाहेरील परिसरावर लक्ष ठेवणारे अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे त्यांनी सांगितले.
२०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
उत्तर गोवा जिल्हा पोलिस आणि गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकांनी राज्यभर शोधमोहीम राबवली. म्हापसा, गिरी, पर्वरी ते पणजी या मार्गावरील २०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. त्यानंतरच तपासाची दिशा ठरविण्यात आली.
मोबाईल नाही, डिजिटल पुरावाही नाही; तरीही पोलिसांनी काढला माग
संशयिताकडे मोबाईल फोन नसल्याने त्याच्या हालचालींचा डिजिटल माग काढणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरले. तो केवळ कन्नड भाषा बोलत असल्याने तपासात अडचणी निर्माण झाल्या. मात्र, घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज, टॅक्सी स्टँडवरील भांडणाची माहिती आणि प्रत्यक्षदर्शींच्या चौकशीतून पोलिसांनी संशयितापर्यंत पोहोचण्याचा मार्ग शोधला. अखेर पणजी बसस्थानक परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.