पणजी,
पणजीत सध्या स्थानिक मानकुराद, देवगड (रत्नागिरीचा) कर्नाटकचा हापूस, तोतापुरी अशा आंब्यांसह स्थानिक इतरही आंबे बाजारात विक्रीला आले आहेत. परंतु टाळेबंदीमुळे ग्राहक मोठ्या प्रमाणात बाजारात येत नसल्याने विक्रेत्यांना ग्राहकाची वाट पाहत बसावी लागत आहे.
सध्या बाजारात महाराष्ट्र आणि कर्नाटकातून आंब्यांची आवक वाढली आहे. त्याचबरोबर स्थानिक मानकुराद आंबाही खरेदीसाठी बाजारात उपलब्ध आहे. म्हणावा तेवढा ग्राहक मिळत नसला तरी आंब्याचे दर मात्र कमी होताना दिसत नाहीत. पणजी बाजारात ताळगाव, सांताक्रूझ व इतर परिसरातून मानकुराद आंबा स्थानिक महिला विक्रीसाठी घेऊन येत आहेत. सुरुवातीला ग्राहकांना वाढीव दर सांगितल्यानंतर, दरांच्याबाबतीत ग्राहकाला एवढे-तेवढी रक्कम कमी करून मग खरेदीसाठी राजी केले जात आहे. टाळेबंदीमुळे लोकही जास्तप्रमाणात खरेदीसाठी बाहेर पडत नाहीत. त्याशिवाय सध्या अनेकठिकाणी रस्त्यांच्या बाजूला आंबे विक्रेते दिसत आहेत.
मोठ्या प्रमाणात आंबा बाजारात आला असला तरी त्या आंब्याचा दर्जा अद्याप अन्न व औषध प्रशासन खात्याने एकदाही तपासला नाही. आंबे कसे एका रात्रीत पिकले जातात, असे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. याशिवाय अन्न व औषध प्रशासन खात्यालाही त्याची कल्पना आहे, पण आंब्यांची कोठे तपासणी केली, किंवा त्याचा दर्जा तपासला हे निदर्शनास आले नाही. त्यामुळे ज्या प्रकारे बाजाराव्यतिरिक्त विविध ठिकाणी, दुकानांमधून आंब्यांची विक्री होत आहे, त्यांची तपासणी होणे अपेक्षित आहे.
आंब्याचे डझनाचे दर
मानकुराद ६०० ते ८००
देवगड हापूस ३५० ते ४५०
तोतापुरी तीन नग ५०
कर्नाटक हापूस ३०० ते ४००
|