खांडोळा, विस्तारणाऱ्या गावातील शेत जमिनीत निवासी इमारतीची उभारणी गतीने होत आहे, पण खांडोळा-अमेयवाडा खाजन शेतात पारंपरिक शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. दिलासादायक बाब आहे.
येथील तेंडली, भेंडी, मुळा, वाल, चिटकी, लाल भाजी, मका, मिरची, कणगी, हळसांदे, चवळी, चिबूड, दूधी भोपळा अशी डझनभर पिके घेतली जातात. मोर, मगर, साळींद्रे आणि इतर जनावरांचा उपद्रव असूनही जिद्दीने शेती केली जाते, हे येथील शेतीचे आणि शेतकऱ्यांचे वैशिष्ट्य आहे.
राज्यात अनेक गावात पारंपरिक शेतीकडे दुर्लक्ष होत असूनही दिलासादायकबाब म्हणजे अमेयवाडा येथील शेतीत पारंपरिक पद्धतीने अखंडितपणे पावसाळी, हिवाळी आणि उन्हाळ्यातही शेती केली जाते. या परिसरातील लोकांना रोज ताजी भाजी मिळते. आबालवृद्ध या शेतीत काम करतात. शुक्रवार १९ रोजी या शेतात सकाळी ८ वाजता वय वर्षे ८० असूनही युवतींना लाजवेल असे काम लक्ष्मी तुरी करीत होत्या. शेतात पिकांना पाणी देण्यापासून पिकांची मशागत करण्यापर्यंत त्या गेली अनेक दशके हे काम करतात.
येथील भाजी सकाळ-संध्याकाळी उपलब्ध होते. मुबलक पाणी पुरवठा असल्यामुळे येथील भाजी ताजी आणि टवटवीत असते. अवघ्या पाचशे मीटरवर अंतरावर शेत असल्यामुळे परिसरात सर्वांना दररोज ताजी भाजी मिळते. येथे अधिक पिकलेली भाजी माशेल बाजार किंवा खांडोळा महाविद्यालयाजवळ विकली जाते. मिरची, वाल, चिटकी, वांगी मोठ्या प्रमाणात येथे पिकवली जातात.
मका आणि चविष्ट तेंडली
शेतकऱ्यांनी मक्याची लागवड केली असून एका रोपाला किमान चार ते पाच मक्याची कणसे लगडलेली आहेत. त्यांची चवही वेगळीच आहे. झाडांवरचे कणस कच्चेही खाता येते, इतका चविष्टपणा त्या कणसात आहे.
शिवाय या ठिकाणी तेंडलीही लागलेली आहे. हिरव्यागार वेली बहरलेल्या आहेत. त्या वेलीत लुकलुकणारी तेंडली लागली आहेत. तीही शेतात जाऊन कच्ची खाणे खूपच आनंददायी वाटते. एकूणच या मातीचा चविष्टपणा या पिकात दिसून येतो.
साळिंदरे, मगरी, मोरांची संख्या या भागात अधिक असल्यामुळे त्याचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. साळिंदरे जास्त करून रात्रीच्या वेळी या शेतात शिरून नुकसान करते, असे शेतकरी कमलाकांत नाईक यांनी सांगितले. आठ मोर घुसून कशी शेती नष्ट करतात, तेही त्यांनी प्रत्यक्ष दाखवले. आज शेतात कितीही आरडाओरड केली तरीही ते हलत नव्हते.
तिखट मिरची
अमेयवाड्यातील मिरचीला मोठा भाव आहे. जवर्षांची बेगमी करताना या मिरचीला स्वैपाक घरात मोठा मान आहे. मासे किंवा चिकण, मटणातही या मिरचीमुळे वेगळी रंगत येते, असे मत येथील शेतकरी संजय नाईक यांनी सांगितले. ते यंदा शेतात मिरची, वाल, वांगी अशी उत्तम पीक घेत आहेत.
खांडोळ्यातील कुर्डूवाडा, कुपेल, अमेयवाडा, आदोर्न व नदीजवळच्या इतर भागातसुद्धा नदीचे खारे पाणी शेतात घुसत असल्याने शेती नष्ट होत आहे. पिके घेता येत नाहीत. आवश्यक त्या सर्व ठिकाणी शासनाने बांध बांधणे गरजेचे आहे.
या ठिकाणी मगरींचाही धोका आहे. मोठ्या प्रमाणात मगरी शेतात येतात. बांध दुरुस्त केले तर हा धोका कमी होईल, त्यासाठी शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत पर्यावरणप्रेमी मधू गावकर यांनी शुक्रवारी प्रत्यक्ष शेतात घुसलेल्या मोरांबाबत व्यक्त केले
‘वॉटर पंपा`चा वापर:
पूर्वी हिवाळा, उन्हाळ्यातील शेतीला पाणी पुरवठा हा छोट्या विहिरी, खड्यातून पाणी स्वतः हाताने काढून रोपांना दिले जात होते. पण शासनाच्या योजनांनुसार आणि आमदार तथा मंत्री गोविंद गावडे, तसेच माजी सरपंच तथा विद्यमान पंच दिलीप नाईक यांच्या सहकार्याने या परिसरात चांगला रस्ता तयार करण्यात आला.
त्यामुळे थेट शेतात वाहनासह पोचता येते. तसेच जवळ जवळ ११ विहिरी बांधण्यात आल्या असून तेथे पंप बसविण्यात आला आहे. शेतातच छोटे पंपहाऊस बांधले आहे. त्यामुळे शेतकरी आणि शासन यांच्या प्रयत्नातून येथे उत्तम शेती केली जाते. असा प्रकार राज्यात इतरत्रही होणे गरजे आहे. लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने या शेतीसाठी केलेले उल्लेखनीय कार्य कौतुकास्पद आहे.
अमेयवाड खाजन शेतात आबालवृद्ध काम करतात, ते फक्त आपली पारंपरिक शेती टिकवण्यासाठीच. त्यामुळेच कृषी संस्कृतीचे संवर्धन होते. येथील लक्ष्मी तुरी या आजीने वयाची ८० वर्षे पूर्ण केली आहेत. या वयात विश्रांती घ्या, असे अनेकजण सांगतात. पण सकाळी ७ वाजल्यापासून त्या शेतात काम करतात. ते काही आर्थिकप्राप्तीसाठी नव्हे तर कृषीसंस्कृतीच्या संवर्धनासाठी करतात. शेती हेच आपले खरे जीवन आहे, शेती चांगली पिकली, राहिली तर आपले जीवनही चांगले राहते, हाच संदेश या ‘माऊली’ आपल्या कार्यातून निश्चितपणे देतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.