ज्ञानेश मोघे
‘जो समस्या दाखवेल तो विरोधक’ अशी कला-संस्कृती खात्याचे मंत्री भूमिका घेत आहेत. काय आहेत कला अकादमीचे नेमके प्रश्न, कुठून झाला त्याला प्रारंभ याचे सविस्तर स्मरण.. ‘हा सूर्य आणि हा जयद्रथ’.
शरद पोंक्षे यांचे ‘पुरुष’ नाटक कला अकादमीच्या मास्टर दीनानाथ कला मंदिरात सादर होते काय आणि कला अकादमीची वास्तू पुन्हा चर्चेत येते काय! पोंक्षे पत्रकारांसमोर नाट्यगृहातील त्रुटी उघड करतात आणि कला अकादमीचे अध्यक्ष तथा कला-संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे चिडून शरद पोंक्षे यांना ‘सुपारीबाज’ ठरवतात. ही एक गोष्ट कला अकादमीबद्दल ममत्व बाळगणाऱ्या गोव्यातील लोकांना पुन्हा चवताळून उठायला पुरेशी होती.
एका कलाकाराला निव्वळ कला अकादमीतील त्रुटी मांडल्यामुळे (ज्या त्रुटींच्या आघातामुळे त्यांच्या नाट्यप्रयोगालाही वाईट परिणामांना सामोरे जावे लागले होते) कला आणि संस्कृती खात्याच्या मंत्र्यांकडून सुपारी घेतल्याच्या असभ्य आरोपाला सामोरे जावे लागणे साऱ्यांच्या आकलनापलीकडले होते. आणि त्यातच भर म्हणजे अवघ्याच दिवसांनी तिथे सादर होत असलेल्या भरत जाधव यांच्या ‘श्रीमंत दामोदर पंत’ या नाट्यप्रयोगाच्या वेळी वातानुकूलन यंत्रणेत झालेला बिघाड. मास्टर दीनानाथ कला मंदिराच्या तांत्रिक घटकांमधील त्रुटी उघड करणारा हा प्रसंग तर कला अकादमीच्या वास्तूतील सारा गोंधळ स्पष्ट करणारा कहर होता.
निविदा न काढता कामाला प्रारंभ; आणि मंत्री गावडेंचे ‘ते’ प्रसिद्ध उद्गार
नुकत्याच नूतनीकरण झालेल्या वास्तूचे धिंडवडे अशा प्रकारे इतक्या अल्पकाळात कुठेच निघाले नसतील. या साऱ्याला जबाबदार कोण? सबंध देशात वास्तुरचनेचा आदर्श म्हणून एकेकाळी ख्यातनाम असलेल्या या प्रतिष्ठित वास्तूला अशा दुर्दशेकडे कोणी आणून पोहोचवले? या साऱ्याची सुरवात २०२२ मधील विधानसभा निवडणूक अवघ्या महिन्यावर आली असताना एका अभद्रतेने झाली होती. कला अकादमीच्या नूतनीकरणाचे काम निविदा न काढता अशा प्रकारच्या कामाचा पुरेसा अनुभव नसलेल्या एका बिल्डर आस्थापनाकडे सोपवले गेले तेव्हाच अनेकांच्या भुवया कुशंकांनी उंचावल्या.
विरोधकच नव्हे तर भाजपमधील स्वकीयांनी देखील या निर्णयावर शरसंधान साधले. पक्ष प्रवक्ते असलेले सावियो रॉड्रिगीस यांनी याप्रकरणी शंका उपस्थित करत चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे ट्विटरच्या (एक्स) माध्यमातून केली आणि सर्वप्रथम सरकारला लाजेच्या भरीस घातले. मंत्री गोविंद गावडे यांनी त्यावेळी दावा केला होता की, नूतनीकरणाचे काम निविदा न काढता नामांकन प्रक्रियेद्वारे करणे हा सार्वजनिक बांधकाम खात्याचा निर्णय होता.
गावडे यांचा दावा फेटाळून लावताना सार्वजनिक बांधकाम खात्याचे तेव्हाचे मंत्री नीलेश काब्राल यांनी एका खासगी मीडियाशी बोलताना सांगितले की, कला अकादमीचे काम ‘टॅक्टन बिल्डर्स’ला नामांकन तत्त्वावर देण्याची सूचना कला आणि संस्कृती विभागाकडून आली होती. गावडे आपले विधान बदलत राहतात. ते विधानसभेत एक गोष्ट सांगतात आणि प्रश्न विचारल्यावर भलतेच सांगतात. दरम्यान, त्यानंतर कला अकादमीच्या नूतनीकरणाचे काम निविदा न करता मंजूर करण्यात आल्याचे मान्य करताना गावडे यांनी जुलै २०२२ मध्ये राज्य विधानसभेत ते प्रसिद्ध अजब विधान केले, ज्या विधानाला (आणि त्यांना) देशभर प्रसिद्धी मिळवून दिली. त्यांचे विधान होते, ‘‘तुम्ही १६३२ ते १६५३ मध्ये बांधलेल्या आग्रा येथील ताजमहालास भेट दिली असेल. आजपर्यंत ताजमहाल सुंदर का राहिला आहे याचा तुम्ही विचार केला आहे का? कारण शाहजहानने ताजमहाल बांधण्यासाठी कोटेशन मागवले नव्हते!’’.
‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील भ्रष्टाचार पद्धतशीर रोखण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहेत. अशा वेळी आम्हाला या मार्गावर चालण्याची गरज नाही’’ असे ट्विट पुन्हा सावियो रॉड्रिगीस यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा निर्देश करत त्यावेळी केले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कला अकादमीच्या नूतनीकरणासाठी काम मंजूर करताना कोणताही घोटाळा झालेला नाही आणि सर्व प्रक्रिया पाळल्या गेल्या आहेत असा निर्वाळा जुलै २०२२ मध्ये देत ऑक्टोबर महिन्यापर्यंत कला अकादमी पुन्हा खुली होईल असे जाहीरही केले होते.परंतु इतक्या लवकर कला अकादमी पुन्हा खुली होण्याचे कुणाच्याच नशिबात नव्हते.
मध्यंतरीच्या काळात कला अकादमीच्या नूतनीकरणासंबंधी वादविवाद, चर्चा चालूच राहिल्या. मात्र कला अकादमी खुली होण्याची वाट पाहत सर्वांनी आपला संयम राखून ठेवला होता व या वादविवादांना जाहीर स्वरूप येऊ दिले नव्हते. त्या काळात कामाच्या दर्जाबाबत चार्ल्स कुरैय्या फाऊंडेशनने आक्षेप घेत प्रश्न उपस्थित केले होते. १९९६ आणि २००४ मध्ये, पूर्वीचा स्तर तसाच राखून त्यावर दोनदा चुकीच्या पद्धतीने केल्या गेलेल्या वॉटर-प्रुफिंगचे उदाहरण त्यांनी दिले होते. अशा तऱ्हेच्या कामामुळे ओव्हर लोडींग होऊन या वास्तूत अनेक संरचनात्मक समस्या उद्भवल्या आहेत असे त्यांचे म्हणणे होते. या नूतनीकरण कामातील पारदर्शकतेचा अभाव लक्षात घेऊन त्यांनी या कामाबद्दल चिंताही व्यक्त केली होती. अशा गदारोळात कला अकादमीच्या वास्तूचे नूतनीकरण अंतिम टप्प्यात येत चालले होते व त्याचवेळी एका अनपेक्षित दुर्दैवाचा आघात या वास्तूवर कोसळला.
२०२३च्या जुलै महिन्याच्या १६ तारखेच्या मध्यरात्री कला अकादमीच्या खुल्या रंगमंचाचे छप्पर कोसळून पडले. एका क्षणात तो रंगमंच होत्याचा नव्हता झाला. कोणतीही निविदा न काढता तब्बल ५५ कोटी रुपये खर्च करून होत असलेल्या कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या दर्जावर त्यावेळी खऱ्या अर्थाने गंभीर प्रश्न विचारायला सुरवात झाली. सर्व शंकांना खतपाणी मिळण्याचा तो प्रसंग होता. या घटनेचे कारण शोधण्यासाठी मुख्य सचिवांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला आयआयटी रूडकी किंवा कोणत्याही अन्य आयआयटी/एनआयटीसारखी स्वतंत्र एजन्सी तातडीने नियुक्त करण्याचे निर्देश दिले. तर, ‘जे छत कोसळले आहे ते मुख्य इमारतीचा भाग नव्हते आणि फॅब्रिकेटेड स्टीलची ती ४३ वर्षे जुनी रचना होती’ हा मंत्री गोविंद गावडे यांचा त्याबद्दलचा खुलासा होता.
त्यानंतर पाच महिन्यांनी, १० नोव्हेंबर रोजी नूतनीकरण झालेल्या कला अकादमीच्या वास्तूचे उद्घाटन वाजतगाजत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र दीनानाथ मंगेशकर कला मंदिरात उद्घाटन सोहळा होत असताना बाजूलाच कोसळून पडलेल्या जुन्या रंगमंचाचा उल्लेखही मान्यवरांनी आपल्या भाषणात केला नाही. शिवाय तिथले ब्लॅक बॉक्स, आर्ट गॅलरी, क्लास रूम यांच्या अपूर्ण अवस्थांचाही उल्लेख त्यांच्या भाषणात नव्हता. (ब्लॅक बॉक्स आणि त्याला आर्ट गॅलरी तर अजूनही वाईट स्थितीतच आहेत.) उद्घाटन झाल्यानंतर बराच काळ हे नाट्यगृह भाड्याने देखील दिले जात नव्हते. कारण अर्थातच त्या संबंधित बरेच काम अजूनही बाकी होते.
तशातच २४ एप्रिल २०२४ मध्ये अवकाळी पडलेल्या पावसामुळे कला अकादमीच्या छतामधून नाट्यगृहात होणाऱ्या पाण्याच्या वर्षावाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आणि कला अकादमीचे हे नूतनीकरण पुन्हा चर्चेत आले. मात्र यावेळी गोमंतकीय कलाकार कला अकादमीच्या या तथाकथित नूतनीकरणासंबंधी तपास व्हायला हवा हा विचार घेऊन आक्रमकतेने एकत्र आले आणि ‘कला राखण मांड’ ही कलाकारांची संस्था जन्माला आली.
कला अकादमीच्या नूतनीकरणात झालेल्या घोटाळ्यासंबंधी त्यांनी जोरदार आवाज उठवायला सुरवात केली. यादरम्यान मडगावच्या गोमंत विद्यानिकेतनमध्ये चार्ल्स कुरैय्या फाऊंडेशनच्या तन्वी कारिया यांनी कलाकार, कलाप्रेमी, राजकीय नेते अशा सुमारे १०० लोकांसमोर अकादमीच्या नूतनीकरण कामात काय चुका झाल्या आहेत हे प्रभावीपणे आपल्या सादरीकरणातून स्पष्ट केले होते.
१९८६, १९९६ आणि २००४ मध्ये कला अकादमीचे केलेले काम निकृष्ट दर्जाचे कसे होते ते तिने सांगितले. त्याला अकादमीच्या नूतनीकरणाच्या कामात दृष्टिकोनाचा अभाव असल्यामुळे खुल्या रंगमंचाचा स्लॅब कोसळला तसेच इतर ठिकाणी गळती लागली असे त्या त्यावेळी म्हणाल्या होत्या. उदाहरणार्थ, समोरच्या संरचनेत जिथे बांबूच्या तुळ्या होत्या, ज्यावर वेली वाढतात तिथे पीव्हीसी पाईप लावण्यात आले होते याकडे त्यांनी लक्ष वेधले. हेही निदर्शनास आणून दिले की भिंतीवरील मूळ कलाकृतीमध्ये जिथे अतिशय मनोरंजक बारकावे होते त्यांची जागा निकृष्ट कामाने घेतली होती. कला अकादमीचे हे सारे काम अक्षम अशा उपसल्लागारांद्वारे केला गेल्याचा ठपकाही त्यांनी त्यावेळी ठेवला.
कला अकादमीचा खुला रंगमंच कोसळल्याच्या पहिल्या वर्धापनदिनी ‘कला राखण मांड’ने भरपावसात सादर केलेल्या ‘क्राय’ या कार्यक्रमाचे पडसाद दूरवर उमटले आणि शेवटी माननीय मुख्यमंत्र्यांना देखील कला अकादमीच्या नूतनीकरणात त्रुटी असल्याचे मान्य करावे लागले. त्यांना या नूतनीकरणात झालेल्या घोटाळ्याचा तपास करण्यासाठी प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक विजय केंकरे यांच्या अध्यक्षतेखाली ‘टास्क फोर्स’ समिती स्थापन करावी लागली.
या समितीच्या पाहिल्याच पाहणीनंतर ‘हे काम ३५ टक्के मार्क मिळवण्याच्या देखील लायकीचे नाही’ असा शेरा अध्यक्ष विजय केंकरे यांनी मारला आणि सर्वांना परिस्थितीचे नेमके निदान करून दिले. या टास्क फोर्सच्या सूचनांकडे दुर्लक्ष करण्याचाच धडाका मंत्री गावडे यांनी सुरुवातीपासून लावला आहे. सूचनांच्या विरुद्ध जाऊन त्यांनी ‘अ’ गट मराठी राज्य नाट्यस्पर्धा, तियात्र स्पर्धाचेही आयोजनही कला अकादमीच्या नाट्यगृहात केले.स्पर्धेच्या काळात प्रकाशयोजना सुरळीत व्हावी म्हणून साधने देखील त्यांनी इतर ठिकाणाहून मागवून घेतली आणि ‘पहा सारे सुरळीत आहे’, असा दिंडोरा पिटला. पण हे सारे पितळ ‘पुरुष’ या नाट्यप्रयोगाच्या वेळी उघड झाले आणि ‘हा सूर्य आणि हा जयेंद्रथ’ अशा केविलवाण्या स्थितीला कला अकादमीला सामोरे जावे लागले.
त्यापूर्वीही अनेक स्थानिक नाट्यप्रयोगांच्या वेळी निर्मात्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. कधी मुख्य पडदा नीट उघडत नाही, कधी प्रवेशाचा पडदा अर्ध्यावर अडकला आहे, ध्वनिव्यवस्था नीट नाही वगैरे वगैरे. मात्र या निर्मात्यांच्या तक्रारींकडे कला अकादमीच्या व्यवस्थापनाने सराईतपणे दुर्लक्ष केले होते. शरद पोंक्षे यांना ज्या गैरसोयींना सामोरे जावे लागले, ती काही पहिलीच वेळ नव्हती. मात्र शरद पोंक्षे हे राष्ट्रीय स्तरावरील मान्यतेचे कलाकार असल्याकारणाने त्यांच्या विधानातून कला अकादमीची निकृष्ट दर्जाच्या यंत्रणेची कुख्याती सर्वदूर पोहोचली. त्यावर आक्षेप घेण्यासाठी मंत्री गावडे यांना विशेष पत्रकार परिषद घेऊन खुलासा करावा लागला. या पत्रकार परिषदेत त्यांनी ‘हे सुपारीबाज आहेत’ हा केलेला आरोप मात्र त्यांच्याच अंगलट आला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.