पणजी: आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा दुसरा दिवस गाजला तो दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीमुळे. शुक्रवारी ‘रेड कार्पेट’वर हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफ, दक्षिणेचे सुपरस्टार कमल हसन आणि मनोज वाजपेयी यांनी हजेरी लावताच परिसरात मोठी गर्दी उसळली. या तिघांच्या उपस्थितीमुळे महोत्सवाला ‘चार चांद’ लागले.
जॅकी श्रॉफ यांची इफ्फीतील एन्ट्री दरवर्षीच चर्चेचा विषय ठरते. यंदाही ते आपल्या खास अंदाजात अवतरले. “क्या रे भिडू, सब कुछ ठिक है ना...” असे म्हणत चाहत्यांना खूश केले. पत्रकारांनीही त्यांच्याशी संवाद साधला. एका पत्रकाराशी मराठीत बोलताना त्यांनी गळ्यातील वृक्षाच्या आकाराचे लॉकेट दाखवून ‘झाडे लावा, देश वाचवा’ असा संदेश दिला.
‘फॅमिली मॅन’ वेब सीझन-३ च्या विशेष शोदरम्यान अभिनेता मनोज वाजपेयी अनपेक्षितपणे उपस्थित राहिल्याने प्रेक्षकांमध्ये उत्साह पसरला. संपूर्ण टीमसह आलेल्या मनोज वाजपेयींसोबत चित्रपट पाहण्याची संधी मिळाल्याने चाहते विशेष आनंदी होते.
कमल हसन यंदा इफ्फीत निर्मात्याच्या भूमिकेत दाखल झाले. ‘अमरन’ या चित्रपटाच्या संपूर्ण टीमसह ते रेड कार्पेटवर दिसले. पांढरी पॅंट आणि निळ्या ब्लेझरमधील त्यांच्या छायाचित्रासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली. मात्र, कडक सुरक्षा व्यवस्थेमुळे अनेकांना त्यांच्यापर्यंत पोहोचणे शक्य झाले नाही. चित्रपट प्रदर्शनानंतर ‘अमरन’ हा एका शहिदाची कहाणी सांगणारा चित्रपट आहे,’ असे हसन म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.