फोंडा: डोंगर कापणीचा लाभ उठवताना बेकायदा बांधकामेही दीपनगर - कुर्टी भागात सुरू असून केरळमधील वायनाडसारखी स्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. कारण अशा परिस्थितीत ही वस्तीच गायब होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
दीपनगर - कुर्टीतील स्मशानभूमीसाठी निर्धारित करण्यात आलेल्या जमिनीतही बेकायदा बांधकामे सुरू असून त्याकडे कुर्टी - खांडेपार पंचायतीचे अजिबात लक्ष नसल्याचा आरोप खांडेपार येथील आरटीआय तथा सामाजिक कार्यकर्ते संदीप पारकर व इतर स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
पंचायत क्षेत्रातील हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन व इतर धर्मीयांसाठी सतरा हजार चौरस मीटर जमीन दीपनगर - कुर्टी भागात राखून ठेवण्यात आली होती. त्यातील सर्वाधिक जागा दिलेल्या मुस्लिमांच्या दफनभूमीचे काम करण्यात आले असून हिंदूंसाठीही स्मशानभूमी बांधण्यात आली असून कालच त्याचे ‘थोडक्यात'' उद्घाटन करण्यात आले आहे, मात्र या स्मशानभूमीच्या बांधकामाशेजारीच जमिनीवर अतिक्रमण करण्यात आले असून दहा मीटर रुंदीचा रस्ताच सध्या गायब झाला आहे.
स्मशानभूमीसाठी प्रचंड प्रमाणात डोंगर कापणी करण्यात आली असून ही डोंगर कापणी करताना कोणतेही तारतम्य बाळगलेले नाही. या डोंगराची उभी कापणी करण्यात आली असून माती ठिसूळ बनल्याने पावसात या डोंगराची माती खाली कोसळत आहे. या स्मशानभूमीच्या खाली लोकवस्ती असून त्यात बेकायदेशीर बांधकामे करण्यात आली आहेत. स्मशानभूमीसाठी राखून ठेवलेल्या जमिनीवरही अतिक्रमण करण्यात आले असून बेकायदेशीर काम सुरू आहे, मात्र तक्रार देऊनही पंचायतीने कारवाई करण्यास टाळाटाळ सुरू केल्याचा आरोप पारकर यांनी केला.
वास्तविक हिंदू, मुस्लीम व ख्रिश्चनांबरोबरच इतर धर्मीयांसाठी राखून ठेवलेल्या या जमिनीवर रस्ता बांधण्यात आला आहे. माजी सरपंच गुरुदास खेडेकर यांच्या कार्यकाळात या रस्त्यावर गेट उभारण्यात आली होती, आणि त्याला कुलूप ठोकण्यात आले होते, पण आता ही गेट सताड उघडी असून ‘आव जाव घर तुम्हारा’ अशी येथील स्थिती आहे. स्मशानभूमीच्या जमिनीत येथे बेकायदा वास्तव्य करणाऱ्यांनी आपली वाहने पार्क केली तर दहा मीटर रुंदीचा हा रस्ता आता पाच मिटरही राहणार की नाही, अशी शंका नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.
दीपनगर - कुर्टीतील ही जागा कोमुनिदादची असून बेकायदा डोंगर कापणी करण्यात आली असल्याने या जागेला कुणी वाली आहे की नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दीपनगरच्या या डोंगरावर बेकायदा बांधकामे उभी राहिली असून पंचायतीकडून आठ बांधकामांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, मात्र काही दिवसांपूर्वी स्मशानभूमीच्या जागेत अतिक्रमण केलेल्या बांधकामासंबंधी पंचायतीकडे तक्रार करूनही कोणतीच कारवाई झाली नसल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर उद्या स्मशानभूमीची जागाही गायब होण्याचा धोका संदीप पारकर यांनी व्यक्त केला आहे.
या ठिकाणी उभारण्यात आलेली ‘एमआरएफ’ शेडही दुर्लक्षित असून रस्त्यावर सांडपाणी सोडल्यामुळे गेल्या वर्षी या वस्तीला कारणे दाखवा नोटीस आरोग्य खात्याने बजावली होती. या वस्तीत बेकायदा बांधकामे होत असून त्यामुळेच ही अनागोंदी चालली असल्याचा आरोप करून कुर्टी - खांडेपार पंचायतीने कुणाचाही मुलाहिजा न बाळगता धडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांतर्फे करण्यात येत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.