53 IFFI Goa
53 IFFI Goa Dainik Gomantak
गोवा

IFFI Goa Controversy : इफ्फीत गोमंतकीयांना मानाचं स्थान कधी मिळणार?

गोमन्तक डिजिटल टीम

IFFI Goa Controversy : 53 व्या इफ्फीचा उदघाटन सोहळा पार पडला. भाषणे, रंगारंग कार्यक्रम असे नेहमीप्रमाणेच याचे स्वरूप होते. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम खचाखच भरले होते. पण त्यात सिनेकर्मी वा कलाकारांपेक्षा हौशे, नवशे, गवशे यांचा भरणाच अधिक होता. कोण वरूण धवनला बघायला आले होते, तर कोण कार्तिक आर्यनला. कोणाला अजय देवगणप्रेमाने खेचून आणले होते, तर कोणाला परेश रावलच्या. काहीजण होऊ घातलेल्या रंगारंग कार्यक्रमाचा आकर्षणापोटी आले होते. पण या गर्दीत खरा सिनेप्रेमी मात्र हरवून गेला होता.

खरे तर इथे सिनेकर्मींना तसे स्थानही नव्हते. इथे त्यांना शिकण्यासारखे काहीही नव्हते. हा दोन घटका करमणुकीचा प्रकार होता. तसे पाहायला गेल्यास याला इफ्फीचे प्रतिनिधी होण्याकरता तशी पात्रताही लागत नाही. 2004 साली इफ्फीचे प्रतिनिधी होण्याकरता पात्रता लागत असे. सिने-नाट्य क्षेत्रातील व्यक्ती, समीक्षक, क्षेत्राशी निगडित संबंधित व्यक्ती, यासारख्यांनाच त्यावेळी प्रतिनिधी होता येत असे. अर्जासोबत तशी प्रमाणपत्रेही जोडावी लागत असत. पण नंतर गर्दी जमविण्याकरता या अटी शिथिल केल्या गेल्या. त्यामुळे इफ्फीला जत्रेचे, काल्याचे स्वरूप आले. हा महोत्सव दर्दींचा न राहता गर्दीचा बनला. परवा श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवरही असाच प्रत्यय येत होता.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 2025 पर्यंत गोव्यात ‘सिनेमा हब’ होणार असे सांगितले असले तरी ही गोष्ट प्रत्यक्षात येणे कठीणच वाटते. तशा इफ्फीच्या उदघाटन व समारोप सोहळ्यात अनेक घोषणा केल्या जातात. पण एकदा का इफ्फी उरकला की, पुढील इफ्फी येईपर्यंत या घोषणांची आठवणसुद्धा राहात नाही. दोनापावल येथे एक भव्य परिषदगृह होणार, ही घोषणा गेली कित्येक वर्षे केली जात आहे. मनोहर पर्रीकर यांनीही 50 व्या इफ्फीचा उदघाटन सोहळा या परिषदगृहात होणार, असे जाहीर करून टाकले होते. पण अजूनही हे परिषदगृह कागदावरच आहे. इफ्फी गोव्यात येण्यापूर्वीच तशी अट घातली होती. इफ्फीच्या सोहळ्याकरता एक कायमचे परिषदगृह असावे, अशी ती अट होती. त्यावेळी एक-दोन वर्षांत ही अट तडीस नेण्याचे आश्वासनही दिले होते. पण अजूनही हे सोहळे म्हणजे फिरत्या रंगमंचासारखेच झाले आहेत. कधी कला अकादमी, कधी कांपाल मैदान आणि आता श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम असा या सोहळ्याचा प्रवास सुरू आहे.

गोव्यात ‘चित्रपट हब’ होणार हे सांगणे ठीक आहे; पण त्याकरता प्रथम चित्रपटनिर्मिती व्हायला हवी. यंदाच्या इफ्फीत एकही गोमंतकीय फिचर फिल्म नाही. का नाही, याचा शोध खरे तर मुख्यमंत्र्यांनी घ्यायला हवा. सुभाष फळदेसाई हे मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष असताना आर्थिक अनुदानाकरता आम्ही त्यांची भेट घेतली होती. गोव्यातील चित्रपट निर्मात्यांकरता असलेली आर्थिक अनुदान योजना परत सुरू करावी, अशी आमची मागणी होती. पण निधीची चणचण असल्याने ही योजना शीतपेटीत पडल्याचे कारण सांगण्यात आले. पण यंदाच्या इफ्फीचे बजेट आहे 57 कोटी. त्यातले 17 कोटी गोवा सरकार खर्च करणार आहे. ही कोट्यवधींची उधळण बाहेरून येणाऱ्या सिताऱ्यांवर केली जाणार आहे. गोमंतकीय मात्र फक्त टाळ्या वाजवतच राहाणार आहेत. एखादा गोमंतकीय त्या लेव्हलवर कसा पोहोचेल याचा विचार मात्र कोणीही करताना दिसत नाही. सुरुवातीच्या काही वर्षांतच तशा प्रकारची पावले उचलली गेली होती. पण आता ही पावले उलट्या दिशेने वळायला लागल्यासारखी दिसत आहेत. एवढ्या मोठ्या बजेटमध्ये गोव्यातील सिनेकर्मी वाहत जातात की काय, असे वाटू लागले आहे.

यंदाचे हे आयोजन ‘एनएफडीसी’तर्फे करण्यात आले आहे. पूर्वी ही संस्था चांगले चित्रपट निर्माण करत असे. ‘जाने भी दो यारों’, ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यूं आता है?’ यासारखे दर्जेदार कलात्मक चित्रपट याच संस्थेने निर्माण केले होते. आता ही संस्था इफ्फीवर पगडा ठेवू पाहात आहे. या सगळ्या गदारोळात इफ्फीचा आत्माच हरविल्यासारखा झाला आहे. सुरुवातीलाच ही बाब अधोरेखित होऊ लागली आहे.

-मिलिंद म्हाडगुत

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva Teaser: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धुमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT