Iffi Goa : गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत 53 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होणार आहे. राज्यात होणारा हा 19 वा चित्रपट महोत्सव असेल. 2004 साली गोव्यात पहिल्यांदा इफ्फीची मुहूर्तमेढ रोवली गेली. गोवा हे एकमेव राज्य आहे, ज्याला इफ्फीच्या कायमस्वरूपी आयोजनाचा विशेषाधिकार मिळाला आहे. गेल्या 18 वर्षात इफ्फीमध्ये अनेक मोठे बदल झाले आहेत.
भारतात पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 1952 साली मुंबई येथे आयोजित केला होता. यंदाचा हा 70 वा इफ्फी आहे. तेव्हापासून विविध शहरांमधून प्रवास केल्यानंतर आणि विविध संघटनात्मक आणि संरचनात्मक बदलांमधून तो अखेरीस 2004 साली गोव्यात पोहोचला. तेव्हा गोव्यात मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार होते. त्यावेळी ज्येष्ठ सिने अभिनेते दिलीप कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत इफ्फीचा पडदा उघडला. यापूर्वी, इफ्फी हा दिल्ली आणि इतर शहरांमध्ये फिरणारा एक रोमिंग उत्सव होता. मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद आणि तिरुअनंतपुरमनंतर गोवा हे त्याचे कामयचे घर झाले.
गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ आहे. येथील सुंदर, रूपेरी समुद्र किनारे आणि निसर्गसौंदर्य सर्वांनाच भुरळ घालते. पण गोव्यात इफ्फीचे आयोजन करणे हे मोठे आव्हान होते. कोणताही पुर्वानुभव नसलेले प्रशासन, पायाभूत सुविधांचा अभाव आणि चित्रपट संस्कृतीची पुसटशी ओळख. पण तत्कालीन खंबीर नेते तथा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ती धुरा समर्थपणे आपल्या खांद्यावर पेलली. त्यांनी जुन्या ‘जीएमसी’मध्ये आयनॉक्स कॉम्प्लेक्सच्या परिसरात इफ्फीचे व्यवस्थापन केले.
अत्यंत कमी वेळेत त्याची तयारी झाली आणि 29 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2004 या कालावधीत पहिला इफ्फी धुमधडाक्यात साजरा झाला. पण पुढचा इफ्फी गोव्यात होणार की नाही, अशी भीती लोकांच्या मनात होती. ही भावना अनेक वर्षे कायम राहिली. दरवर्षी गोव्यातील लोक ‘इफ्फी पुढच्या वर्षी गोव्यात होणार की नाही, या मुद्यावर बोट ठेवत होते. परंतु दरवर्षी राज्य सरकारकडून सातत्याने सुधारणा केल्या जात होत्या. एकूणच गोव्याचे दर्जेदार आयोजन आणि देशी-परदेशी प्रतिनिधींचा वाढता प्रतिसाद पाहून केंद्र सरकारला शेवटी गोवा हे इफ्फीचे कायमस्वरूपी ठिकाण म्हणून घोषित करावे लागले.
39 व्या इफ्फीचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य होते ते म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीचे निर्माते दादासाहेब फाळके यांच्या ‘कालिया मर्दन’ चित्रपटाचे. लाईव्ह बॅकग्राउंडसह मूक चित्रपट पाहणे, हा इफ्फीच्या इतिहासात प्रथमच एक अनोखा रोमांचकारी अनुभव होता. 2009 साली 40 व्या इफ्फीचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य होते ते पटवर्धन ब्रदर्सच्या ‘मॅजिक लँटर्न शो’चे. 2010 साली गोव्यात झालेल्या 41 व्या इफ्फीमध्ये पुरस्कारांच्या यादीत आणखी दोन पुरस्कार उदा. सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री समाविष्ट करण्यात आले. भारतीय चित्रपटसृष्टीच्या शताब्दी वर्षात 43 व्या इफ्फीमध्ये सिनेनिर्मितीमधील सर्वोत्तम तांत्रिक कामगिरीसाठी शताब्दी पुरस्कार देण्यात आला. 44 व्या इफ्फीमध्ये मोठ्या संख्येने चित्रपट तर होतेच, शिवाय 160 विदेशी पाहुणे आणि उत्तर पूर्वपासून 151 भारतीय चित्रपट होते.
1996 साली इफ्फीमध्ये जो ''स्पर्धा विभाग'' पुन्हा सुरू करण्यात आला, तो प्रथम आशियापुरता मर्यादित होता. 2005 साली गोव्यात मध्ये आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका सिनेमापर्यंत त्याचा विस्तार केला. 2004 साली गोव्यात जेव्हा इफ्फीची सुरुवात झाली, तेव्हा तो एखाद्या सण-उत्सवाप्रमाणे साजरा करण्यात आला.
गोव्यातील लोकांसाठी जणू मेळाच. अगदी ग्रामीण भागातही कलाकारांच्या मिरवणुका निघायच्या. आयनॉक्ससमोरील दयानंद बांदोडकर मार्गावर विविध प्रकारचे सिनेमाविषयक कक्ष लक्ष वेधून घेत. सुरुवातीची 3 वर्षे ही प्रथा सुरू राहिली. 2007 साली येथे प्रतिनिधींच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक सुधारणा करण्यात आल्या. तिकीट काढण्यासाठी ऑनलाईन प्रणाली सुरू करण्यात आली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.