Goa: साधला आपुलकीचा संवाद  Dainik Gomantak
गोवा

त्यांनी केले पॉझिटिव्ह रुग्णांना तब्बल तीन लाख कॉल

दैनिक गोमन्तक

-अनिल पाटील

पणजी : कोरोना काळात (Corona In Goa) सहा फुटांचे अंतर राखता राखता काहींनी आपल्या जवळच्या माणसांचे आयुष्यभराचे अंतर अनुभवले. अनेकांच्या आयुष्यात प्रचंड कोलाहल माजले. अनेकांनी आपला जिवाभावाचा आधार गमावला. पण, भोवताली निराशेचे प्रचंड मळभ असतानाही राज्य सरकार आणि आरोग्य विभागाने उभारलेल्या ‘होम आयसोलेशन मॉनिटरिंग सिस्‍टीम’मधील (Home Isolation Monitoring System) स्वयंसेवकांनी तब्‍बल तीन लाख कॉल करून लाखो लोकांची हतबलता दूर करत त्‍यांना आपलेपणाचा आधार दिला. अशी माहिती या सेंटरच्या समन्वयक अंकिता आनंद यांनी दिली आहे.

कोरोना ह्या जागतिक महामारीत सारेच भरडले आहेत.या संकट काळात या यंत्रणेने कोरोना बाधित व्यक्ती, कुटुंब यांच्याशी दिवसरात्र संवाद साधत त्यांच्या भावनांना वाट दिली. असंख्य गहिवर ऐकले आणि त्यांना मायेची साथ देत त्यांच्या सोबत कुणीतरी असल्याचा विश्वास रुजवला. कोरोना लाटेच्या ‘पीक सिझन’मध्ये सर्वच पॉझिटिव्ह रुग्णांना हाताळणे आरोग्य यंत्रणेला शक्य होत नव्हते. तेव्हा केंद्र आणि राज्य सरकारने घरी विलगीकरणाला म्हणजे ‘होम आयसोलेशन’ला परवानगी दिली. तसेच या रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी ‘होम आयसोलेशन मॉनिटरिंग सिस्टीम उभारली आणि त्याद्वारे उपचार सुरू केले. कोरोना पॉझिटिव्‍ह रुग्णांना स्वयंसेवकांनी तब्बल तीन लाख फोन केले. हे कॉल केवळ औपचारिकता नव्हते, तर धीराचे, प्रेमाचे, औषधोपचाराचे आणि महत्त्‍वाचे म्हणजे मानसिक आधाराचे होते. काहींना तर माणुसकी तोडू पाहणाऱ्या कोविड संकटात हे संदेश देणारे देवदूत वाटत होते. पण फोन करणारे स्वयंसेवकही या अनोळखी नात्यात गुंतत होते. काल फोन केलेला आज मरण पावला की त्यातून येणारे डिप्रेशन, दुःख जवळच्या नात्यापेक्षा कमी नसायचे.

आता व्‍हिडीओ कॉलिंगचा प्रयत्‍न

राज्यात आत्तापर्यंत १ लाख ७१ हजार ७०५ कोरोना बाधितांची नोंद झाली असून, त्यापैकी १ लाख ६७ हजार ५५६ रुग्ण बरे झाले आहेत. या रुग्णांपैकी १ लाख १९ हजार ५१६ रुग्णांनी घरी विलगीकरणाचा पर्याय निवडला होता. या पॉझिटिव्‍ह रुग्णांवर लक्ष ठेवून निरीक्षण नोंदवण्याचे काम या यंत्रणेद्वारे केले जात होते. कोरोनाच्‍या पीक सीझनमध्ये दररोज हजारो लोक पॉझिटिव्‍ह येत होते. अशावेळी प्रत्येक तालुक्यामध्ये तात्पुरत्या स्वरूपाचे सेंटर उभे केले होते. आता या यंत्रणेमध्ये नव्याने बदल करण्यात येत असून, रुग्णांशी व्हिडीओ कॉलिंगद्वारे संपर्क साधण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या सिस्टीममध्ये डॉक्टरांची नेमणूकही केली आहे.

मिताली नाईक

कोरोनामुळे अनेकांच्‍या आयुष्यात बदल झाले आहेत. आम्ही या सिस्टीममध्ये काम करत असल्याने अनेकांशी संवाद साधत होतो. त्यावेळेला त्यांच्यातला भय, गळून पडलेला आत्मविश्वास, अगतिकता स्पष्टपणे कानावर पडत होती. पण माहितीच्या संकलनातील यांत्रिकता बाजूला करून आम्ही त्यांना धीर देत होतो. ही नवी, अदृश्य नाती होती.

- मिताली नाईक, स्वयंसेवक

नारायण मुळगावकर

या सिस्टीममध्ये काम करण्याचा अनुभव अगदी वेगळाच आहे. मधल्या काळात वेदना, हाल नक्की काय असतात हे खरोखरच आम्ही समजून घेत होतो. एकटे पडलेले अनेक लोक खूप कष्टपूर्वक संवाद साधत होते. आम्ही त्यांना धीर देत होतो.

- नारायण मुळगावकर, स्वयंसेवक

प्रियंका दिनीज

हे काम करताना मला खूप अभिमान वाटतो. कारण आम्ही प्रत्यक्ष कोरोना रुग्णांशी बोलतो. पूर्वी अनेक लोक मानसिक तणावात होते. ते आमच्या फोनची वाट पाहत असायचे. त्यांना दिलेल्या धीराबद्दल आमचे आभारही मानत होते. जे रुग्ण या काळात मरण पावले त्यांच्‍या नातेवाईकांचे दुःख आपले दुःख वाटत होते.

- प्रियंका दिनीज, स्वयंसेवक

शेरॉल वाझ

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या पीक सीझनमध्ये हजारो रुग्ण समोर येत होते. सारा भवताल धास्तावलेला होता आणि घरी विलगीकरण केलेल्या लोकांवर लक्ष ठेवण्याचे अवघड काम ही सिस्टीम म्हणजे आम्ही करत होतो. काहींवर औषधोपचार केला जात होता. मी मूळ कलाशिक्षक आहे, मात्र मला ते डॉक्टर समजत होते. एका बाजूला स्वतःचा अभिमान वाटत होता आणि दुसऱ्या बाजूला जबाबदारीची जाणीवही होती.

- शेरॉल वाझ, स्वयंसेवक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT