Goa History Canva
गोवा

Goa Politics: गोव्यातील गावडे मुळात कोण?

गोमन्तक डिजिटल टीम

गोविंद शिरोडकर

गोमंतकातील आदिवासींना संघटित करण्याचा व त्यांना आदिवासी म्हणून अधिसूचित करून घेण्यासाठी सरकारसमोर आम्ही आंदोलन उभारले होते. गाकुवेधच्या ‘देवचार’ या मुखपत्रातून अनेक आदिवासी युवकांनी लेख लिहून आपली घुसमट व्यक्त केली होती. गावड्यांच्या शुद्धीकरणावर याच मुखपत्रात २००१साली मी सविस्तर संपादकीय लिहिले होते. आता दैनिक ‘गोमन्तक’चे संपादक राजू नायक यांनी १ सप्टेंबर २०२४ रोजी गावड्यांच्या शुद्धीकरणावर लिहिलेला लेख वाचला. या लेखाच्या संदर्भात माझी काही मते मी इथे मांडीत आहे.

२६ फेब्रुवारी १९२८ रोजी गोमंतकात जे शुद्धीकरण झाले ते आदिवासी गावड्यांचे होते. त्यात इतर बाटलेल्या ज्ञाती बांधवांचा समावेश नव्हता. ‘आदिवासी’ ही हिंदूंच्या वर्णव्यवस्थेतून आलेली जात नाही. आदिवासी समुदायामध्ये हिंदू देवदेवतांसाठी पूर्वी कोणतीच जागा नव्हती. हिंदू हे ईश्वरवादी आहे तर आदिवासी प्रकृती, निसर्गपूजक आहेत.

हिंदूंचे संख्याबळ वाढवण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना भारतातील आदिवासी हिंदूच आहे असे तांडव नेहमी करीत असतात. परंतु भारतात़ील सर्वोच्च न्यायालयाने तसेच मध्य प्रदेशाच्या उच्च न्यायालयाने आदिवासींचा हिंदू म्हणून स्वीकार केलेला नाही. तरीदेखील हिंदू मिशनरि ‘तुम्ही वनवासी हिंदू आहात’, असे सांगून त्यांच्यावर हिंदुत्व थोपवतात.

डॉटर बाबासाहेब आंबेडकर लिहितात की, ‘जो समूह आपला इतिहास जाणत नाही, आपल्या इतिहासापासून प्रेरणा घेत नाही, त्यांना त्यांचा इतिहास कालांतराने अद्दल घडवतो. तुमची ओळख बदलली की आपोआप तुमचा इतिहास बदलला जातो. इतिहास बदलल्यानंतर तुमच्या परंपरा, तुमची सांस्कृतिक पुंजी हे सारे नष्ट केले जाते. आणि म्हणूनच दीर्घकाळ तुम्हांला गुलाम करून ठेवण्यासाठीच तुमची ओळख पुसण्याचे षड्यंत्र उच्चभ्रू समाजाकडून रचले जाते’.

गोव्यात घडवून आणलेला गावड्यांचा शुद्धीकरण सोहळा हे आदिवासी गावड्यांचा इतिहास पुसून टाकण्याचे मोठे षड्यंत्र, कटकारस्थान होते, असा माझा दावा आहे.

भारताच्या सर्वोच्च न्यायालयानेदेखील मान्य केले आहे की भारतातील आदिवासी हेच इथले मूळनिवासी आहे. आर्यांच्या आगमनापूर्वी या भारतात मूळ निवासींचेच राज्य होते आणि त्यांचा स्वतःचा धर्म होता. ते हिंदू नव्हते. आर्यांच्या कोणत्याही साहित्यात ‘हिंदू’ शब्द आपल्याला कुठेच सापडत नाही.

गोमंतकातील गावड्यांच्या शुद्धीकरणासाठी हिंदू समाजातील उच्चभ्रू वर्गाने पुढाकार घेतला. त्यामुळे धर्मांचे पुनर्जीवन होत असल्याचा समज निर्माण होऊन वरच्या थरामध्ये हुरूप निर्माण झाला असे श्री. राजू नायक लिहितात आणि याकरिता महाराष्ट्रातील वैष्णव समाजाच्या मसूर गावातील विनायक मसुरकर या संन्याशाला त्यासाठी गोव्यात बोलावण्यात आले.

त्यांच्यामुळे सुमारे ९,००० ख्रिस्ती गावडा प्रतिनिधींना हिंदू धर्मात प्रवेश दिल्याचे ढोंग रचण्यात आले. कारण या धर्ममार्तंडांनी गावड्यांचा पूर्ण हिंदू म्हणून कधीच स्वीकार केला नाही. त्या उलट त्यांना ‘नव-हिंदू’ नावाचे नवे लेबल चिकटवण्यात आले. पोर्तुगीज सत्तेनेही या प्रकाराकडे कटकारस्थान म्हणूनच पाहिले आणि या घटनेमुळे गावडा समाजात चलबिचल निर्माण झाली.

यासंदर्भात माझा या उच्चभ्रू समाजातील धुरीणांना एकच प्रश्न होता आणि आहे की पोर्तुगिजांनी केलेल्या धर्मांतरात किंवा बाटाबाटीमध्ये फक्त गावडेच होते का? यात इतर बहुजन समाज, उच्चभ्रू समाजाचा सहभाग नव्हता काय? सत्य हेच आहे की या धर्मांतरण करताना पोर्तुगिजांनी कोणत्याही ज्ञातीला सोडले नव्हते, हे कटू सत्य आहे.

तर मग तथाकथित उच्चभ्रू समाजाने गावड्यांबरोबर स्वतःच्या समाजांचे शुद्धीकरण का करून घेतले नाही? कारण त्यांनी तर स्वतःला पोर्तुगिजांकडून ‘भाटभेस’ मिळवण्यासाठी हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन धर्मात प्रवेश केला होता. आज हाच समाज आपण या गोमंतकात अल्पमतात आहोत म्हणून गळा काढतो.

एवढेच नव्हे तर बाटलेल्या व न बाटलेल्या उच्चभ्रू समाजामध्ये रोटीबेटीचे व्यवहार आता चालू झाले पाहिजेत, असे मतप्रवाह मांडले जातात. बाटलेल्या उच्चभ्रू समाजाचे शुद्धीकरण झाले असते तर हिंदूंची संख्या कितीतरी पटीने वाढली नसती का?

गोव्यातील गावडे हे मुळात कोण, यासंदर्भात खूप कमी दाखले सापडतात व पोर्तुगीज दप्तरात त्यांची नोंद केवळ १६व्या शतकात सापडते, असे राजू नायक लिहितात.

ज्यांनी गाव वसवून ते वसवणुकीला आणले त्यांना ‘गावडे’ असे संबोधतात. हे अनेक इतिहासकारांनी आणि संशोधकांनी संशोधन करून लिहिलेले आहे. त्याचा संदर्भ सोळाव्या शतकापर्यंतच सीमित आहे का? या काळात सारस्वत आणि गावडा समाजाचा जो इतिहास रचला तो त्यांना अनुरूपच होता असे म्हणून त्यांची पाळेमुळे त्यांनी उत्तर भारतातील गौड प्रदेशाची जोडली आहे. आदिवासी गावडा समाजाने गौड सारस्वत समाजाबरोबर स्थलांतर केले या त्यांच्या दाव्याला माझा आक्षेप आहे.

सारस्वत हा गोमंतकातील पुढारलेला आर्य समाज आहे. परशुरामाने सारस्वतांना त्रिपुराहून गोमंतकात आणून वस्ती केली अशी कथा सह्याद्री खंडात आढळते. त्या कथेच्या आधारे आपण मुळात बंगालमधून म्हणजेच गौड देश इकडून आलो अशी बहुतेक सारस्वतांची समजूत आहे.

परंतु थोर संशोधनकार स्वर्गीय काशिनाथ दामोदर नायक यांनी ही समजूत भ्रामक असल्याचे साधार दाखवून सारस्वतांचे गोव्यातील आगमन काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात यामार्गे झाले असल्याचे सांगितले आहे. त्यांचा हा संशोधनपर लेख अत्यंत मौलिक आहे असे पंडित महादेव शास्त्री जोशी यांनी लिहिलेले आहे.

मुळात भारतातील आर्यांच्या आगमनानंतर आर्यांनी कधीच इथल्या मूलनिवासी आदिवासींना कधी चांगली वागणूक दिली नाही. याउलट नेहमी आदिवासीची संस्कृती नष्ट करण्याचे सत्र त्यांनी आरंभले. आदिवासींशी अनेक युद्धे केली. त्यांना त्यांच्या वसाहतीमधून संपूर्ण भारतात रानावनात पिटाळून लावले. अनेक आदिवासींना आपले गुलाम करून त्यांची शूद्रात गणना केली.

आदिवासी आणि आर्य यांच्यात नेहमी विळ्या-भोपळ्याची दुश्मनी असताना सारस्वतांबरोबर स्वखुशीने आदिवासी गावडे कसे येऊ शकतात, हा माझा सवाल आहे. ब्रिटिश राजवटीत झालेल्या भारताच्या १८७१च्या जनगणनेच्या तुलनेत सन १९००, १९१० ते १९२१ या कालखंडात भारतातील हिंदूंची लोकसंख्या ख्रिश्चन व मुस्लिमांच्या लोकसंख्येच्या तुलनेत खूपच खालावली आहे, हे हिंदू नेत्यांच्या लक्षात आले आणि आता ‘हिंदू खतरे मे है’ याची जाणीव त्यांना झाली.

गोमंतकात गावडा समाज आदिवासी म्हणून गणला जातो. तथाकथित बाटलेल्या आदिवासी गावड्यांचे आपण शुद्धीकरण करून त्यांना ‘हिंदू’ हे बिरुद लावले तर गोमंतकात हिंदूंची संख्या वाढू शकते, असा हिंदुत्ववादी संघटनांचा आणि उच्चभ्रू सारस्वत समाजाचा समज झाला. आणि त्यानुसार त्यांनी राष्ट्रीय पातळीवरील हिंदुत्ववादी संघटनांशी संधान बांधून आपल्या कार्याला सुरुवात केली.

त्यानुसार हिंदुत्ववादी संघटनांनी गोमंतकात आदिवासी गावड्यांचे शुद्धीकरण करून त्यांना हिंदू नव्हे तर ‘नवहिंदू’ करण्याचा कट रचला. या कार्यासाठी गोमंतकातील उच्चभ्रू समाज महाराष्ट्रातील हिंदू सभेशी जोडला गेला. आदिवासी गावडे यांचे उन्नयन करण्याचा त्यांचा कोणताच हेतू नव्हता. तर फक्त हिंदू म्हणून त्यांच्यावर शिक्कामोर्तब करून हिंदू धर्माचा प्रसार करण्याचा व हिंदूंची संख्या वाढवण्याचा त्यांचा संधिसाधू डाव होता.

(लेखक ‘गाकुवेध’ संघटनेचे संस्थापक व प्रवक्ता आहेत.)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CM Pramod Sawant: परप्रांतीयांचा मुद्दा तापणार; मुख्यमंत्री सावंतांनी थेटच सांगितलं, 'प्रत्येक क्षेत्रात घुसखोरी'

Automated vacuum Sewer: आधुनिक पद्धतीने सांडपाणी व्यवस्थापन करणारे गोवा ठरले पहिले राज्य!

Sunburn Festival Goa: अमलीपदार्थ, देहव्यापाराला चालना देणारे उत्सव आमच्या इथे नकोच; दक्षिण गोव्यातले नेत्यांचा निर्धार

Baga Crime: गोव्यात पर्यटकांचा धुडगूस! स्थानिकांना मारहाण; संतप्त जमावाचा पोलिसांना घेराव

गोव्यात येऊन 'काहीही' करून चालणार नाही! पर्यटकांनी निसर्ग पाहावा, संस्कृती समजून घ्यावी; संपादकीय

SCROLL FOR NEXT