Unseasonal Rain in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Rain: गोव्यात अवकाळी पावसामुळे लाखोंचे नुकसान! झाडांची पडझड; पेडणे,सत्तरी, केपे, काणकोणला फटका

Unseasonal Rain in Goa: राज्यात मागील काही दिवसांपासून तुरळक प्रमाणात पडणाऱ्या अवकाळी पावसाने पेडणे, सत्तरी, केपे, काणकोण भागात जोरदार बरसात केली.

Sameer Panditrao

पेडणे: राज्यात मागील काही दिवसांपासून तुरळक प्रमाणात पडणाऱ्या अवकाळी पावसाने शनिवारी (ता.५) पेडणे, सत्तरी, केपे, काणकोण भागात जोरदार बरसात केली. त्यामुळे ठिकठिकाणी झाडांची पडझड झाली. ही झाडे रस्ते व वीजवाहिन्यांवर पडल्याने काही प्रमाणात नुकसानही झाले. पैंगीण भागात भातशेतीवर परिणाम झाला.

पेडणे तालुक्यात आज सायंकाळी ४.३० वा. गडगडाट व वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. सुमारे एक तास पाऊस पडला. काही काळ वीजही खंडित झाली. या पावसामुळे लोकांची धावपळ उडाली. दुचाकीस्वारांनी जवळ मिळेल त्या घर, इमारतीचा आश्रय घेतला. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते. नगरपालिका, तसेच पंचायत क्षेत्रातील मान्सूनपूर्व कामे केली नसल्यामुळे तसेच गटार न उपसल्यामुळे अनेक भागात पाणी रस्त्यावरून वाहत होते.

दरम्यान, शनिवारी सायंकाळी पडलेल्या मुसळधार पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे तांबोसे-पेडणे येथील शैलेंद्र सामंत यांच्या मालकीच्या कुळागारातील एक माड, तीन आंब्याची झाडे व दहा केळीची झाडे मुळासकट उन्मळून पडली व सुमारे चाळीस ते पन्नास हजारांचे नुकसान झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी या बागायतीतील रस्त्यावर पडलेली झाडे कापून बाजूला केली व रस्ता खुला केला.

हरमल भागातही शनिवारी सायं. ४.३० वा.च्या सुमारास पाऊस पडल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. या भागात पर्यटकांची बरीच धांदल झाली तर अनेकांनी रेनकोट वगैरे न घेतल्याने पाऊस थांबतो याची वाट पाहावी लागली. अनेकजणांची नवीन बांधकामे व घर शाकरणी सुरू असल्याने खूपच गैरसोय व नुकसान झाले. दरम्यान, हरमल-केरी रस्त्याच्या दरवर्षी होणाऱ्या स्थितीवर सार्वजनिक बांधकाम खात्याचे लक्ष नसल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला.

काणकोणात कापलेली भातशेती भिजली

काणकोणात शनिवारी सायं. ५ वा.च्या सुमारास गडगडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने काही शेतात पाणी साचून उभी पिके आडवी झाली. नवीन आलेली काजू फुले गळून पडल्याने काजू पिकावर परिणाम होणार आहे. अवकाळी पावसाचा परिणाम पर्यटन व्यवसायावरही होणार आहे. अवकाळी पावसामुळे पोळे येथे वीजवाहिन्यांवर झाड उन्मळून पडले तर भाटपाल येथे रस्त्यावर झाड उन्मळून पडल्याने वाहतुकीवर परिणाम झाला.

नावेलीत घरावर कोसळले झाड

सांगे भागात अवकाळी पावसासोबत आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे नावेली-कुर्पे येथील राघू करमलकर (५२) या अर्धांगवायूचा झटका आलेल्या व्यक्तीच्या घरावर झाड पडून नुकसाने झाले. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. या घरात राघू करमलकर एकटेच राहत असून त्यांच्या पश्‍चात त्यांची देखरेख करणारा कोणी नसल्याने प्रशासनाने यात गांभीर्याने लक्ष घालून घरदुरुस्ती करून द्यावी तसेच राघू करमलकर यांच्यावर उपचार करण्यासाठी योग्य ठिकाणी त्यांची रवानगी करावी, अशी मागणी लोकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

Goa Island: बेटे आमची, गोव्याला देणार नाही; मालकीसाठी धडपडणाऱ्या कर्नाटकची कोलांटी उडी,केवळ माजाळीजवळील बेटाबाबत वाद

Goa Amar Bandekar Case: किरकोळ कारणावरून हत्या, आता न्यायालयात हिशेब! तिघांविरुद्ध खुनाचा खटला चालणार, दोषमुक्ततेचा अर्ज फेटाळला

SCROLL FOR NEXT