Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; गोविंद गावडेंकडून पंतप्रधानांचे अभिनंदन

Khari Kujbuj Political Satire: सरकारच्‍या मंजुरीने या दोन अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल करून त्‍यांची चौकशी करण्‍यात येणार असल्‍याचे क्राईम ब्रांचचे अधीक्षक राहुल गुप्‍ता यांनी याआधीच स्‍पष्‍ट केले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

गोविंद गावडेंकडून पंतप्रधानांचे अभिनंदन!

बिहार विधानसभेत ‘एनडीए’ने जे घसघशीत यश मिळविले आहे, ते फक्‍त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्‍या विकासकामांना दिलेली पावती आहे, अशा आशयाचे ट्‍वीट माजी मंत्री गोविंद गावडे यांनी केले आहे. या ट्‍वीटमध्‍ये गोविंदरावांनी मोदी धोरणांचा उदो उदो करताना त्‍यांचे अभिनंदनही केले आहे. याचा अर्थ गोविंदरावांना मुख्‍यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातून काढून टाकले, तरी त्‍यांचा भाजपच्‍या धोरणांवर ठाम विश्‍वास आहे, असे म्‍हणण्‍यास काही हरकत नाही. एका बाजूने गोविंद समर्थक असलेले प्रकाश वेळीप गोव्‍यात एसटींचा नवा पक्ष सुरू करू पहात असताना गोविंदराव मात्र भाजपचीच धोरणे चांगली असे म्‍हणू लागले आहेत. प्रकाश आणि गोविंद गावडे यांच्‍या भाजपबद्दलच्‍या भूमिका वेगवेगळ्‍या आहेत, असे म्‍हणायचे का? ∙∙∙

सुदिन सुटणार?

‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणात पूजा नाईकने मंत्री सुदिन ढवळीकर यांना पैसे दिले नसल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे. परंतु, त्‍यांनी ओळख करून दिलेल्‍या आयएएस अधिकारी निखिल देसाई आणि सार्वजनिक बांधकाम खात्‍याचे मुख्‍य अभियंता (पीडब्‍ल्‍यूडी) उत्तम पार्सेकर यांना मात्र १७.६८ कोटी रुपये दिल्‍याचे म्‍हटले आहे. त्‍यामुळे सरकारच्‍या मंजुरीने या दोन अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल करून त्‍यांची चौकशी करण्‍यात येणार असल्‍याचे क्राईम ब्रांचचे अधीक्षक राहुल गुप्‍ता यांनी याआधीच स्‍पष्‍ट केले आहे. परंतु, पूजाने थेट विद्यमान मंत्रिमंडळात सहभागी असलेल्‍या सुदिन ढवळीकरांचे नाव घेतल्‍याने आणि या प्रकरणामुळे सरकारबाबतही प्रश्‍‍नचिन्‍ह उभे राहिल्‍याने पोलिस ढवळीकरांची चौकशी करणार की नाही? त्‍याबाबतचे निर्देश गृहमंत्री या नात्‍याने मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पोलिसांना देणार की नाही? की सुदिन यातून सहीसलामत सुटणार? असे प्रश्‍‍न जनतेकडून विचारले जात आहेत. ∙∙∙

आणखी नावे बाहेर येतील?

‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणातील प्रमुख आरोपी पूजा नाईक हिने केलेल्‍या काही दाव्‍यांमध्‍ये तथ्‍य नाही. त्‍यामुळे भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार (बीएनएनएस) १४ दिवसांत चौकशी पूर्ण करण्‍यात येणार असल्‍याचे क्राईम ब्रांचचे अधीक्षक राहुल गुप्‍ता यांनी याआधीच स्‍पष्‍ट केले आहे. आता गरज पडल्‍यास पूजाची नार्को चाचणी करण्‍याची तयारीही असल्‍याचे त्‍यांनी म्‍हटले आहे. जर पूजाची नार्को चाचणी झाली तर या प्रकरणात गुंतलेल्‍या आणखी काही जणांची नावे बाहेर पडतील का? याकडे जनतेचे लक्ष असेल. ∙∙∙

जय- वीरू जोडी सक्रिय?

फोंड्याचे माजी नगराध्यक्ष विश्वनाथ दळवी व नवनिर्वाचित नगराध्यक्ष वीरेंद्र ढवळीकर यांना फोंड्यात जय-वीरू म्हणून संबोधले जाते. शोलेतील जय-विरू प्रमाणेच यांची दोस्तीही अभेद्य. गेल्या वर्षी जेव्हा वीरेंद्र यांना नगराध्यक्ष पदाने हुलकावणी दिली होती, तेव्हा सगळ्यात जास्त दुःख झाले ते दळवींनाच. आता सुद्धा वीरेंद्रना नगराध्यक्षपद केव्हा मिळेल? याची त्यांना धाकधुक होतीच. माध्यमातून वेगवेगळ्या बातम्या पसरविल्या जात होत्या. पण शेवटी गंगेत घोडे न्हाले आणि वीरू एकदाचे नगराध्यक्षाच्या खुर्चीवर जाऊन बसले. काल जेव्हा ही निवड जाहीर झाली, तेव्हा दळवींची '' बॉडी लँग्वेज '' बघण्यासारखी होती. म्हणजे आता पुढचे सहा महिने तरी ही जोडी सक्रिय होणार तर... हे आम्ही नाही बोलत दळवींचा तो ‘अति उत्साह’ पाहून तिथे उपस्थित असलेले लोकच बोलताना दिसत होते. आता बोला! ∙∙∙

जीत यांचा रोख नेमका कोणावर?

आपली पत्नी सिद्धी या जिल्हा पंचायत निवडणुकीत उतरणार नाहीत, असे मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी जाहीर केले आहे. ते एवढ्यावरच थांबलेले नाहीत. त्यांनी आपल्याला राजकारणात घराणेशाही आणायची नाही, असे कारण त्यांनी पुढे केले आहे. आपण यासाठी कार्यकर्त्यांची समजूत काढल्याचे ते सांगतात. याआधी काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप केला जात असे. आता घराणेशाही भाजपमध्ये दिसते. त्यामुळे जीत यांचा नेमका रोख मांद्रेत चंचुप्रवेश करण्यासाठी धडपडणारे मायकल लोबो यांच्यावर असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे, असे असले तरी फोंडा पोटनिवडणुकीत स्व. रवी नाईक यांचे पुत्र रितेश यांना उमेदवारी देत बिनविरोध निवडण्याची मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांची सूचना घराणेशाहीला खतपाणी घालणारी नाही का? अशी विचारणा यानिमित्ताने होऊ लागली आहे. ∙∙∙

विरोधकांकडून प्रशस्तिपत्र

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे राजकारण व समाजकारण करताना कुठेही त्याचा लवलेश चेहऱ्यावर जाणवू देत नाहीत. सर्व ताण ते पचवतात. राजकारणात ते नवखे असल्याने त्यांना सहज गुंडाळता येईल, असा विरोधकांचा अंदाज होता. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनीच तशी कबुली आता दिली आहे. चोडणकर यांच्या म्हणण्यानुसार मुख्यमंत्र्यांची पुढील राजकीय चाल काय असेल याचा अंदाज कोणालाच येत नाही. त्यांनी विरोधकांना या पद्धतीने गुंडाळले आणि आपल्याच पक्षातील विरोधकांनाही त्यांची जागा दाखवली. सध्या तरी राज्य पातळीवर मुख्यमंत्र्यांना आव्हान नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या हसऱ्या चेहऱ्यामागे तगडे राजकारण करणारा कुशाग्र मेंदू कसा दडला आहे, याचे दर्शन निदान चोडणकर यांना झाले हेही नसे थोडके! ∙∙∙

सावंतप्रेमी पाटकर!

गोवा फॉरवर्डचे नेते अॅड. अमित सावंत यांना काल सकाळी गोवा फॉरवर्डने पक्षातून बडतर्फ केल्‍याचा निर्णय जाहीर केल्‍यानंतर लगेच सायंकाळी काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष अमित पाटकर यांनी सावंत यांना काँग्रेस पक्षात प्रवेश दिला. यावर गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी आपली प्रतिक्रिया व्‍यक्‍त करताना, आमची काँग्रेसबरोबर युती असतानाही आम्‍ही बडतर्फ केलेल्‍या सदस्‍याला काँग्रेस आपल्‍या पक्षात घेतो, हे समजण्यापलीकडचे आहे, असे म्‍हटले. कदाचित अमित पाटकर हे सावंतांच्‍या प्रेमात पडले असावेत, अशी छद्‌मी प्रतिक्रियाही विजयने व्‍यक्‍त केली. विजयही आता केजरीवालांची भाषा बोलू लागले आहेत, असा निष्‍कर्ष यातून काढता येणे शक्‍य आहे का?∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fishing Women India: ‘जाय गे'? डोक्यावर ‘पाटलो’ आणि मासळी घेऊन दारोदारी सकाळी येणारी ‘नुस्तेकान्नी’; सागरकन्येचा संघर्ष

Pooja Naik: नोकरी घोटाळ्यात नवा ट्विस्ट, पूजा नाईकच्या वाढल्या अडचणी; IAS निखिल देसाईंनी पाठवली 'मानहानीची कायदेशीर नोटीस'

‘सुपरस्पेशलिटी’ हॉस्पिटलमध्ये नेत्यांचे सर्व विशेष उपचार केल्याने, जनतेच्या हॉस्पिटलांमध्ये खाटा मोकळ्या राहतील, ही काय कमी समाजसेवा आहे?

Chimbel Toyyar Wetland: पोर्तुगीज काळापासून पणजीला पाणी देणारा ‘व्हडाचे मांड’, चिंबलातील ‘तोय्यार’चे महत्त्व

Pooja Naik: 'कॅश फॉर जॉब'चा डोंगर पोखरून उंदीरही हाती लागणार नाही, उलट 'पूजा नाईक'चा बळी दिला जाईल..

SCROLL FOR NEXT