गोव्याचा ऐतिहासिक वारसा असणारा आग्वाद किल्ला Dainik Gomantak
गोवा

Goa: आग्वाद किल्ल्याला खासगीकरणाचे ग्रहण?

स्वातंत्र्यसैनिकांच्या पुनीत स्पर्शाने न्हावून गेलेला हा आग्वाद किल्ला (Aguada Fort) खासगीकरण (Privatization) करीत तेथे ‘खा प्या मजा करा’ संस्कृती आणून विटाळू नये अशी सार्वत्रिक भावना तयार झाली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोमंतकीय अस्‍मितेचा मानबिंदू म्हणजे ‘आग्वाद’. इतिसहासाची (History) साक्ष देणाऱ्या या किल्ल्याला खासगीकरणाचे (Privatization) ग्रहण लागले आहे. ‘दृष्टी’ या खासगी कंपनीच्या घशात दीर्घ भाडेपट्टीवर हा किल्ला देण्याचा सरकारी प्रस्ताव असल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. (Government of Goa is likely to privatize the Aguada fort)

स्वातंत्र्यसैनिकांच्या पुनीत स्पर्शाने न्हावून गेलेला हा परिसर खासगीकरण करीत तेथे ‘खा प्या मजा करा’ संस्कृती आणून विटाळू नये अशी सार्वत्रिक भावना तयार झाली आहे. या किल्ल्याला पंचतारांकित बनविण्याचा सोस असल्याने तसे झाल्यास वारसा स्थापत्याचा बळी जाण्याची शक्यता आहे. विशेष बाब, म्हणजे या किल्ल्याविषयी जिव्हाळ्याचे नाते असल्याने स्थानिक स्वातंत्र्यसैनिकांनी त्याचा विकास करून त्यात व्यावसायिकरण आणण्यासाठी विरोध केला आहे. पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीचा इतिहास सांगणारा हा किल्ला आहे, त्यामुळे त्याचे संरक्षण करणे गरजेचे असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, वारसास्थळ अभ्यासक हेता पंडित म्हणाल्या, की जतन करण्याच्या नावाखाली सरकारने असलेले सारे उध्वस्त केले आहे. आग्वाद किल्ल्यात आता लाऊंज व रेस्टॉरंट सुरू केले जाईल. वातानुकूलित यंत्रणा व परिसर चकाचक केल्याने तेथील पूर्वीचे मंतरलेले वातावरणच नष्ट झाले आहे.

विरोध कशामुळे

आग्वाद येथील पूर्वीच्या कारागृहाचे आता गोवा मुक्तिपर्व स्मृतिस्थळ म्हणून रुपांतर करण्यात आले आहे. ते विकसित करण्यासाठी पायाभूत सुविधा, दुरुस्ती, नूतनीकरण करण्यात आले आहे. सर्वांनाच गोवा मुक्तीची माहिती देणारे, गोवा मुक्त होण्यासाठी कुणी देह वेचला, कोणी पोर्तुगीजांची जुलुमशाही अनुभवली याची माहिती देणारे ऊर्जा केंद्र असेल असे सरकारने सांगितले होते. आग्वाद किल्ल्याच्या वास्तूत वस्तू संग्रहालय असेल, टी. बी. कुन्हा, राम मनोहर लोहिया यांच्या जतन केलेल्या कोठड्या असतील असे सरकारने सांगितले होते.

स्मारक शिल्परूपाने

गोवा मुक्‍तिसंग्रामाच्या अनेक आठवणींचा साक्षीदार असणारा हा आग्वाद किल्ल्याचा एक भाग. पोर्तुगीजांनी गोवा मुक्‍तीसाठी धडपडणाऱ्या अनेक देशप्रेमी लोकांना पकडून येथे त्यांचा अमानुष छळ केला. या देशप्रेमी स्वातंत्र्यसैनिकांचे स्मारक दारात शिल्परूपात उभे केले आहे.

दीपस्तंभही प्रसिद्ध

आग्वादचा दीपस्‍तंभही प्रसिद्ध आहे. चाळीस फूट उंच असणारा दीपस्तंभ गेल्या शतकात समुद्रातील जहाजांना दिशांचे मार्गदर्शन करत होता. सध्या नवीन दीपस्तंभ किल्ल्याच्या बाहेर बांधलेला आहे. आग्वादचा आणखी महत्त्वाचा भाग म्हणजे सध्या तुरूंग म्हणून उपयोग केला जाणारा किल्ल्याचा एक भाग. तो मुख्य डोंगरावरील किल्ल्याला सलग तटबंदीने बांधला आहे.

आग्वाद ‘दृष्टी’च्या घशात

समुद्रकिनाऱ्यावरील कचरा गोळा करण्यासाठी आलेल्या आणि नंतर जीवरक्षक सेवा पुरवण्याचे कंत्राट मिळवलेल्या ‘दृष्टी’ कंपनीकडे हा किल्ला सोपवला जाणार असल्याची चर्चा आहे. या कंपनीला निविदा न मागवता मुदतवाढ देण्याचे मध्यंतरी आरोप झाले होते. आता हे कंत्राट मिळवल्यानंतर आग्वाद किल्ल्यात पर्यटकांचे मनोरंजन करण्यासाठी ‘रात्रीचा गोवा’ची सारी व्यवस्था केली जाणार असल्याचे कळते.

आग्वाद होणार सशुल्क?

आग्वाद किल्ला परिसरातील प्रवेश सशुल्क होण्याची चर्चा आता सुरू झाली असली तरी हा प्रस्ताव नवीन खचितच नव्हे. आग्वाद किल्ल्यात प्रवेशासाठी शुल्क आकारण्याचा भारतीय पुरातत्त्व विभागाचा प्रस्ताव होता. गोवा मुक्‍तिसंग्रामाचा साक्षीदार असलेल्या आग्वाद किल्ल्याच्या पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी शुल्क आकारावे असा प्रस्ताव भारतीय पुरातत्त्व विभागाने आपल्या नवी दिल्लीस्थित मुख्यालयाला 2011 मध्ये पाठवला होता. त्यालाही मोठा विरोध त्यावेळी झाला होता. मांडवी नदीच्या मुखावर वसलेल्या या किल्ल्यात अनेक स्वातंत्र्यसेनानींना ठेवले होते. आता किल्ल्याचा काही भाग तुरुंगात रूपांतरितही करण्यात आला होता. तेथे असलेल्या दीपगृहाकडे जाण्यासाठी हे शुल्क असेल, असे त्यावेळी सांगण्यात आले होते.

स्थानबद्घ केंद्राचा प्रयत्न

विविध गुन्ह्यांत अडकलेल्या विदेशी नागरिकांना स्थानबद्ध करण्यासाठी आग्वाद किल्ल्याच्या काही भागाचे स्थानबद्धता केंद्रात रूपांतर करण्याचाही विचार 2016 मध्ये राज्य सरकारने केला होता. त्याला विरोध झाल्यानंतर म्हापसा येथील पोलिस ठाण्याच्या परिसरात हे केंद्र उभारण्यात आले आहे. गृह खात्याने हे केंद्र आग्वाद येथे करण्याचा प्रस्ताव तयार केला होता आणि त्याला पर्यटन खात्याने आक्षेप घेतला होता.

बॉलिवूडचे आवडते केंद्र

फरहान अख्तर याने बनविलेल्या ‘दिल चाहता है’ या चित्रपटाचे चित्रिकरण येथे झाल्यानंतर किल्ला प्रकाशझोतात आला त्यानंतर या ठिकाणाचे पर्यटन केंद्रात रूपांतर करण्याचा डाव शिजणे सुरू झाले. सुरवातीला भावी पिढीला गौरवशाली इतिहास सांगण्यासाठी या ऐतिहासिक स्थळाचे जतन केले जाईल असे सरकार सांगत होते आणि आता तेथे मौजमस्तीचे केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसते.

होत्या दोनशे तोफा

एके काळी या किल्ल्यावर दोनशे तोफा होत्या. त्यातील काही 70 पौंडाच्या लोखंडी गोळ्यांचा मारा करू शकणाऱ्या होत्या. या तोफा या किल्ल्यांची ताकद होती. 19 डिसेंबर, 1961 रोजी भारतीय सैन्याने गोवा पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्‍त केला. पोर्तुगीज सैन्य शरण आले. या शरण आलेल्या सैन्याला ताब्यात घेण्यासाठी आग्वादला गेलेल्या भारतीय सैनिकांच्या तुकडीवर एका पोर्तुगीज सैनिकाने विश्‍वासघाताने हल्ला केला. त्यात काही भारतीय सैनिक व अधिकारी शहीद झाले होते.

कोणत्याही ऐतिहासिक वास्तूचे सौंदर्यीकरण करताना ती वास्तू ज्या वस्तूंपासून बनवली आहे आणि तिची रचना कशी आहे तशीच ठेवावी लागते. त्यासाठीची नियमावली आहे. तिचे पालन आग्वादच्या सौंदर्यीकरणावेळी झालेले दिसत नाही. याप्रकरणात आम्ही दाद मागणार आहोत. ते काम करण्यापूर्वी सांगितलेल्या गोष्टी व प्रत्यक्षात केलेल्या गोष्टी यात तफावत आहे,असे इतिहास अभ्यासक प्रा. प्रजल साखरदांडे यांनी सांगितले आहे.

तर, किल्ला भाडेपट्टीवर देण्याचा निर्णय झालेला नाही. गोवा पर्यटन विकास महामंडळाचा तसा प्रस्ताव आहे. अद्याप त्यासाठी जागेची पाहणीही झालेली नाही. सरकार प्रत्येक प्रस्तावाची कार्यवाही करतेच असे नाही. त्यासाठीची शक्याशक्यता तपासून पाहिली जाते, असे स्पष्टीकरण पर्यटनमंत्री मनोहर आजगावकरयांनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT