Cyber Scam Canva
गोवा

Goa Cyber Scams: सायबर गुन्हेगारी वाढतेय, सावधान!

Goa Cyber Crime: सायबर गुन्हे वाढत आहेत. स्मार्टफोन हातात असतो. अकस्मात भामट्यांचा कॉल येतो. तो काहीच्या काही बोलतो. आपला मुलगा वा मुलगी अपघातात सापडली आहे इथून सुरुवात करतो. नंतर पैशांची मागणी वा पिन नंबर मागण्यास सुरुवात होते.

गोमन्तक डिजिटल टीम

मुकेश थळी

गोव्यात एके काळी अकस्मात संचयिनी व इतर कथित बँका पावसातील अळंब्यासारख्या उगवल्या. त्या फोफावल्या. त्या सहकारी बँका नव्हत्या की इतर प्रकारच्या. अवघ्या अल्प काळात आपली रक्कम दुप्पट होते या आमिषाला भुलून लोकांनी आपली रक्कम ठेव म्हणून तिथे ठेवली. इतर बँकेत असलेले पैसे काढून या बँकेत ठेवले.

गावागावांत असे स्थानिक एजंट होते. गावात त्यांना मान होता. पण या बोगस बँका पैसे बुडवतील याची कल्पना या एजंटना नव्हती वा ठेवीदारांना. एकदा भरमसाठ व्याज दिल्यावर तो वा ती गिर्‍हाईक आपण होऊन या झटपट दुप्पट रक्कम बँकेचा प्रचार करू लागे. एक दिवस सकाळी हे लोक त्या ऑफिसात गेले तर त्याला भले मोठे कुलूप. व्यवस्थापक गायब, पोबारा. त्या काळी मोबाइल फोन नव्हते. संगणक नव्हते. इंटरनेट नव्हते. असून काही फायदा नव्हता. तक्रारी झाल्या, पण लुटारू सापडले नाहीत.

माझे काही मित्र, काही नातेवाईक या बनेल बँकवाल्यांना बळी पडले होते. मध्यस्थ एजंटला दूषण देऊ लागले. त्याच्याकडून वसुली करण्याचा धोशा त्यांनी लावला. या धमक्यांमुळे काही लोकांना मध्यस्थाकडून मुद्दल वसूल करणे कालांतराने शक्य झाले. काही गरिबांनी, कष्टकऱ्यांनी आपल्या आयुष्याची कमाई मोठ्या आशेने त्यात ओतली होती. सुशिक्षित लोकही पैशांच्या लालसेने त्यात फसले होते.

गोवा विधानसभेत या फसवणूक करणाऱ्या आस्थापनांसंदर्भात चर्चाही झाली. लोकजागृती झाली खरी पण मोठ्या प्रमाणात लोकांना फसवले गेले. संगीतात भूप, केदार, मालकंस असे राग असतात त्याचप्रमाणे या फ्रॉड बँकांची नावेही विविधांगी होती. इतक्या लवकर आपल्याला इतके भरमसाठ व्याज मिळते कसे हा प्रश्न व संदेह गुंतवणुकदारांना कधीच आला नाही. कारण पैशांची भकभक व भौतिक वखवख.

अधूनमधून अशा प्रकारच्या बँका येत राहिल्या. दोन तीन वर्षांआधीही आल्याचे लुटल्याचे व कोर्टात खटला झाल्याची बातमी आली होती.

आज सायबर गुन्हे वाढत आहेत. स्मार्टफोन हातात असतो. अकस्मात भामट्यांचा कॉल येतो. तो काहीच्या काही बोलतो. आपला मुलगा वा मुलगी अपघातात सापडली आहे इथून सुरुवात करतो. नंतर पैशांची मागणी वा पिन नंबर मागण्यास सुरुवात होते. इथे काही जण फसतात. ज्येष्ठ नागरिकांना तर सरळ हे भामटे आपण बँक अधिकारीच असल्याचे सांगून केवायसीसाठी पिन पाहिजे वा पेन्शन सुरळीत ठेवण्यासाठी आणखीन काही डेटा अद्ययावत करणे सुरू आहे, अशी बतावणी करतात. बिचारे साधेभोळे ७५ वरील वयाचे लोक या धमक्यांना बळी पडतात. हे कट व युक्त्या अनेक प्रकारच्या असतात.

गोव्यात मागील साडेपाच वर्षांत सायबर गुन्हेगारांनी लोकांचे २३ कोटी रुपये फसवणूक करून लुटले, अशा आकडेवारीचे एक वृत्त हल्लीच एका वृत्तपत्रात वाचले. फार भयानक चित्र आहे हे. आपल्या नावाचा वापर करून कुणी तरी बँक लोन काढतो व धमक्या देऊन ती रक्कम तुमच्या खात्यात आल्यानंतर नागवणूक करून आपणाकडे वळवतो. या क्लृप्त्या आकलनाबाहेरील. कारण अशा बँकांचे ‘कौतुक’ करायला हवे.

सायबर भामटा तुम्हांला मोबाइल फोन करताना आपला एक अंक लपवतो. मोबाइल नंबरातील दहापैकी फक्त ९ अंक दिसतात. अशा वेळी तो फोन घेऊच नये. ट्रू कॉलर आयडी असूनदेखील भामट्यांचा नाव गाव काहीही दिसत नाही. शक्यतो अज्ञात आणि ओळख नसलेला फोन घेऊ नये.

मोबाइल अथवा ईमेलवरूनसुद्धा हे फसवणूक-हल्ले होतात. काही भामटे चक्क आयकर विभागातून अथवा सायबर गुन्हे विभागातून ईमेल वा फोन करत आहोत, असा बनाव करतात. आपले कार्ड वापरून कुणी तरी फार मोठा गुन्हा केला आहे, असे सांगून हे लोक भीती घालतात, आभासी पंचनामा आणि चौकशी सुरू करतात व इथून पैशांना लुटण्याचा डाव, कट सुरू होतो.

ठकवायच्या क्लृप्त्या अनेक असतात. अनेक पर्यटक नकली वेबसाइटवर हॉटेल बुक करतात. गोव्यात येणारे पर्यटक अमुक अमुक हॉटेलात येतात आणि ऑनलाइन पैसे भरून रूम बुक केले त्याची रिसिट दाखवतात, जी नकली असते. त्याच हॉटेलच्या नावाचा वेबसाइट उघडून भामटे लोकांना लुटतात. म्हणून गोव्याच्या लोकांनीही इतर राज्यात ऑनलाइन हॉटेल बुकिंग करून टूअरला जाताना नितांत काळजी घ्यायला हवी.

मी फेसबुकवर नाही. मला माझी शांती व सुरक्षा महत्त्वाची वाटते म्हणून त्या मंचावर जाणे नकोसे वाटते. फेसबूक खाते हॅक झाल्याच्या अनेक घटना सभोवती घडताना व मित्रांना तापत्रयात पोळून चाललेले पाहताना मी बघतो. या हॅकर लोकांनी अनेक सरकारी खात्यांच्या वेबसाइट, फेसबूक अकाउंट हॅक केलेले आहेत. अनेकांचा डेटा चोरला आहे. डिजिटल चोर व त्यांची कृत्ये दिसत नाहीत. त्यांना पकडणे सोपे नसते. सायबर गुन्हेगारांच्या गंडवण्याच्या इतर काही युक्त्या समजून घ्या, सावध राहा.

हे लोक फोन करून आपण ट्राय अधिकारिणीचे अधिकारी असल्याचा दावा करतात. आपला मोबाइल बेकायदेशीर कृत्यांसाठी वापरला जातो असा आरोप तुमच्यावर असल्याचा सांगतात. ट्राय आपली सेवा बंद करणार असा दम भरतात. ट्राय सेवा बंद करू शकत नाही. दूरसंचार कंपन्या बंद करू शकतात. पोलीस कधीही फोनवर डिजिटल पंचनामा वा चौकश्या करत नाहीत हे लक्षात असू द्या. फोन कट करा. कुटुंबातील सदस्याला अटक केली आहे किंवा अपघातामुळे तो हॉस्पिटलात आहे अशी बतावणी करणारा फोन येऊ शकतो.

एक तर अज्ञात फोन घेऊ नका किंवा कट करा. आयकर खात्याचे अधिकारी असल्याचे भासवूनही काही भामटे आपली वैयक्तिक माहिती मागतात. काही लोक फसतात. म्हणून मोबाइल फोन, सामाजिक माध्यमे आणि वॉट्सअ‍ॅप कॉल यापासून सावध राहायला हवे. सज्जनहो, सायबर गुन्ह्यांना बळी पडण्यापासून दक्ष राहायला घट्ट सुरक्षा कवच अजून तरी आलेले नाही. म्हणून आपला जीव आपणच निगुतीने सांभाळलेला बरा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या 'श्रुती'ला दिलासा; फोंडा कोर्टाकडून जामीन!

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांनी दिला दणका, सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

SCROLL FOR NEXT