पणजी: आक्रमक कार्यशैलीसाठी ओळखले जाणारे संकल्प आमोणकर यांच्याकडे नागरीपुरवठा खात्याची जबाबदारी येताच खात्याच्या कामकाजाला गती मिळाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ‘गोवा उज्ज्वला’ योजनेच्या अर्जांची छाननी सुरू असल्याचे सांगणाऱ्या खात्याने आता तिसवाडी, मुरगाव, बार्देश आणि डिचोली तालुक्यांतील अर्जांची छाननी पूर्ण केली आहे.
त्यामुळे या चारही तालुक्यांतील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यांत बुधवारी (ता. ११) प्रत्येकी तीन हजार रुपये जमा केले जाणार आहेत.विशेष म्हणजे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी या योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली होती.
त्यावेळी सुमारे एक लाख लाभार्थ्यांना प्रत्येकी तीन हजार रुपयांचा लाभ दिल्याची माहिती देण्यात आली होती. उर्वरित दीड लाख अर्जांची छाननी बाकी असल्याचे मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात आले होते. योगायोगाने त्यावेळी आमदार असलेले संकल्प आमोणकर हेही मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी या बैठकीदरम्यान तेथे उपस्थित होते.
आमोणकर यांनी शनिवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. रविवारी त्यांच्याकडे कृषी, नागरीपुरवठा तसेच हस्तकला व वस्त्रोद्योग खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर त्यांनी आधी जाहीर केल्याप्रमाणे जुन्ता हाऊसमध्ये जाऊन नागरीपुरवठा खात्याच्या कामकाजाचा आढावा घेतला. या बैठकीला खात्याचे संचालक जयंत तारी आणि इतर अधिकारी उपस्थित होते. संचालक तारी यांनी पुष्पगुच्छ देऊन मंत्री आमोणकर यांचे स्वागत केले.
आढावा बैठकीनंतर आमोणकर यांनी येत्या पंधरा दिवसांत ‘गोवा उज्ज्वला’ योजनेच्या सर्व पात्र अर्जदारांना लाभ दिला जाईल, असे जाहीर केले. एकाच कुटुंबातून दोन ते तीन अर्ज दाखल झाले आहेत. मात्र, प्रत्येक कुटुंबातील केवळ एका गॅस जोडणीसाठीच अनुदान मिळणार असल्याने अर्जांची पडताळणी करावी लागत आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रसंगी कठोर भूमिका घेणार
पूर्वी रेशन धान्य चोरीचे प्रकार घडत होते. मात्र, बायोमेट्रिक प्रणाली लागू झाल्यापासून असे प्रकार बंद झाल्याचे मंत्री आमोणकर यांनी सांगितले. सर्वसामान्यांना वितरित करण्यात येणाऱ्या धान्याची गुणवत्ता तपासूनच त्याचे वितरण केले जाते. जनतेच्या हितासाठी आवश्यक तेथे सौम्य भूमिका घेऊन कामे करून घेईन; मात्र कठोर भूमिका घेण्याची वेळ आल्यास मागे हटणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
रेशनकार्ड रद्द करण्याचा निर्णय तूर्त स्थगित: राज्यातील रेशन धान्य दुकानदारांचे कोविड काळातील प्रलंबित अनुदान देण्यात आले असून, आता कोणतीही रक्कम थकीत नसल्याचे नागरीपुरवठा खात्याचे संचालक जयंत तारी यांनी सांगितले. तसेच, सलग सहा महिने रेशन धान्य न नेणाऱ्या कार्डधारकांची रेशनकार्डे तात्पुरती रद्द करण्याचा निर्णय खात्याने घेतला होता. मात्र, या निर्णयानंतर बहुतांश कार्डधारक नियमितपणे धान्य घेऊ लागल्याने हा निर्णय तूर्त स्थगित करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
खात्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार
नागरीपुरवठा खाते हे थेट जनतेशी संबंधित असून प्रत्येक कुटुंबाचा या खात्याशी संबंध येतो. यापूर्वी ज्येष्ठ नेते रवी नाईक यांच्याकडे या खात्याची जबाबदारी होती. त्यांच्या निधनानंतर ही जबाबदारी माझ्याकडे आली आहे. या खात्याच्या माध्यमातून जनतेला चांगली सेवा देऊन खात्याला न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मंत्री आमोणकर यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.