Baga Beach Harassment: गोव्यातील पर्यटनाला गालबोट लावणारे आणि महिलांच्या सुरक्षिततेला आव्हान देणारे एक प्रकरण समोर आले असतानाच, गोवा पोलिसांच्या 'पर्यटक पोलीस युनिट'ने दाखवलेल्या तत्परतेमुळे या प्रकरणातील एका आरोपीला तातडीने अटक करण्यात आली. 'शॅक'वर काम करणाऱ्या या आरोपीने एका तरुणीसोबत अश्लील टिप्पणी केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
दरम्यान, ही घटना 24 ऑक्टोबर 2025 रोजी पहाटे 02.04 ते 02.40 वाजण्याच्या दरम्यान बागा बीचवर घडली. तक्रारदार तरुणी सौम्या खन्नाने दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात तरुणाने तिच्याजवळ येऊन आक्षेपार्ह शेरेबाजी केली. एवढेच नाही तर, "रात्रीचा दर काय आहे?" अशा अत्यंत अपमानकारक आणि अश्लील टिप्पण्या केल्या. पुढे आरोपीने तक्रारदार तरुणीचा पाठलाग देखील केला, ज्यामुळे तिला असुरक्षित आणि भयभीत वाटले. या घटनेमुळे तरुणीने 'टुरिस्ट पोलीस युनिट'कडे तक्रार दाखल केली. या संदर्भात कळंगुट पोलिस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 75, 78, आणि 79 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.
सोशल मीडियावर (Social Media) या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पर्यटक पोलीस युनिट आणि कळंगुट पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरु केला. 'टीपीयू'च्या पथकाने व्हिडिओच्या आधारावर आरोपीचा शोध घेतला आणि 'जॉन बीच शॅक'वर काम करणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अतेंद्र सिंह (वय 23, मूळ रा. भरतपूर, राजस्थान) असे आहे. तो सध्या कळंगुट येथील जॉन बीच शॅक येथे राहत होता.
या कारवाईतून गोवा पोलिसांनी (Goa Police) स्पष्ट संदेश दिला की, गोव्यात अशा प्रकारच्या घटना अजिबात खपवून घेतल्या जाणार नाहीत. महिलांच्या सुरक्षिततेच्या आणि सन्मानाच्या प्रत्येक तक्रारीवर कठोर आणि तातडीची कारवाई केली जाईल. गोवा पोलीस विभागाच्या या तत्पर कारवाईमुळे राज्यातील पर्यटक, विशेषत: महिला पर्यटकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढण्यास मदत होणार आहे. गोव्यातील पर्यटन उद्योग आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.