Environmental Degradation: पर्यटनाच्या हव्यासामुळे राज्याचे समृद्ध सागरी पर्यावरण धोक्यात आले आहे. शॅक घालण्यासाठी वाळूच्या टेकड्या कापण्यात आल्या आहेत. आगोंद, मोरजी व आश्वे येथे कासवांनी अंडी घालण्याच्या ठिकाणी शॅक उभारण्यात आल्याकडे महालेखापाल व महानियंत्रकांनी आपल्या अहवालात ताशेरे ओढले आहेत.
संसदेत सादर झालेल्या या अहवालाची प्रत राज्य सरकारच्या अवलोकनार्थ पाठवण्यात आली आहे. या अहवालापाठोपाठ पाहणीसाठी संसदीय समिती राज्याचा दौरा करणार आहे.
या अहवालात नोंद असलेल्या ठिकाणांची ती समिती पाहणी करणार असल्याने प्रशासनाच्या पातळीवर घबराट आहे. पर्यावरणाच्या या ऱ्हासाचा ठपका कोणावर ठेवला जातो याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी किनाऱ्यांवर वाहने नेण्यास बंदी घातली असली, तरी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने कोणतीही यंत्रणा उभारलेली नाही. यामुळे कासवांनी अंडी घालण्याच्या जागांवर उतोर्डा व मोरजी येथे वाहनांची ये जा सुरू असल्याचे दिसून आल्याचे अहवालात म्हटले आहे.
खारफुटी ही उष्णकटिबंधीय भागात आढळणारी वनस्पती असून ती जलचरांना प्रजनन प्रदान करणारी अद्वितीय इको-सिस्टम आहे. बऱ्याच जलचर प्रजातींसाठी खाद्य मैदान म्हणून खारफुटीची जंगलेही सक्षम असल्याचे सिद्ध झाले आहे.
त्सुनामी लाटांविरुद्ध संरक्षणात्मक पट्टा म्हणून खारफुटी काम करते. सागरी अधिनियमांत संवेदनशील क्षेत्रे म्हणून यांची नोंद आहे. तीही गोव्यात सुरक्षित नसल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.
किनारी क्षेत्र व्यवस्थापनात अपुरे कर्मचारी
राज्य किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणासाठी पुरेसे कर्मचारी नाहीत. मंजूर ७३ पदांपैकी ५८ पदे रिक्त आहेत. यामुळे प्राधिकरणाची कामे मुख्यत्वे करून पर्यावरण खात्याचे आणि गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कर्मचारी करतात. या प्राधिकरणावर मत्स्योद्योग खात्याचा कोणीही प्रतिनिधी नाही.
हॉटेल, घरबांधकामाला परवाने
हॉटेल्स रिसॉर्टची, गेस्ट हाउसची बांधकामे, किनाऱ्यावर जाण्यासाठी भराव घालण्यातून वाळूच्या टेकड्या नष्ट करण्यात आल्या आहेत. बेतुल ते कासावली, सिकेरी ते बागा आणि हरमल, मध्य मोरजी भागातील वाळूच्या टेकड्या नष्ट करण्यात आल्या आहेत.
गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाला वाळूच्या टेकड्या ही संरक्षित जागा आहे हे माहीत असूनही त्यांनी पायाभूत सुविधांच्या विकास, हॉटेल्स आणि घरांच्या बांधकामाला त्या भागात परवानगी दिली आहे.
मोरजी येथे दुमजली बंगले बांधण्यासाठी तेथे वाळूच्या टेकड्या असतानाही परवानगी देण्याचा निर्णय किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने घेतला. त्या जागी तीन चार मीटर उंचीची, वनस्पतीने आच्छादीत वाळूची टेकडी होती.
विकासासाठी खारफुटींची कत्तल
सरकारने २०११ मध्ये खारफुटीच्या १४ प्रजातींना संरक्षित प्रजाती म्हणून अधिसूचित केले आणि त्याच्या तोडणीवर बंदी घातली. तथापि, खारफुटी कापण्याच्या अनेक घटना घडल्याचे दिसून आल्याचे अहवालात म्हटले आहे.
अटल सेतूसाठी २४७ खारफुटी कापण्याला प्राधिकरणाने परवानगी दिली होती. झुआरी पुलासाठी ६९ खारफुटी कापण्यास परवानगी दिली.
कासवांच्या जागेवर शॅक
ऑलिव्ह रिडले ही कासवांची दुर्मिळ प्रजाती अंडी घालण्यासाठी गोव्याच्या किनाऱ्यावर येते. असे असतानाही आगोंद, मोरजी व आश्वे किनाऱ्यावर कासवांच्या अंडी घालण्याच्या जागेवर शॅक घालण्यासाठी परवानगी दिली गेली आहे आणि तसे शॅक उभे राहिल्याचे दिसून आले आहे.
महामार्गासाठी खुदाई
वरुणापुरी ते सडा या चौपदरी महामार्गाच्या बांधकामासाठी किनाऱ्यावर खोदाई करण्यास गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने परवानगी दिली. तेथेही वाळूच्या टेकड्या सागरी वनस्पतींसह होत्या. या महामार्गाच्या पायाच्या खुदाईचा फटका बायणा परिसरातील सागरी पर्यावरणाला बसला आहे
मार्गदर्शक तत्त्वांचा अभाव
वास्कोजवळील ग्रॅंड बेट परिसरातील प्रवाळ जतन करण्याच्या उद्देशाने वन विभागाने या क्षेत्रांचे मॅपिंग केले नव्हते. प्रवाळांची वस्ती आणि परिणामी त्यांच्या संरक्षणासाठी व्यवस्थापन कृती योजना देखील तयार केली नाही.
वन खाते किंवा गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाकडून त्या परिसरातील जलक्रीडांवर नियंत्रण आणण्यासाठी कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे पर्यटन खात्याला जारी केली नाहीत. जागतिक निसर्ग निधीने आपल्या सर्वेक्षणात या खडकांमध्ये दुर्मिळ सागरी प्रजाती शोधल्या होत्या.
मात्र, त्यांच्या संरक्षणासाठी सरकारने मासेमारी करणाऱ्यांसाठी कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली नाहीत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.