‘अति शहाणा त्याचा बैल रिकामा’ अशी एक जुनी म्हण आहे. राज्य सरकारने धारबांदोडा, काणकोण , सांगे व केपे तालुक्यांना एकत्रित करून कुशावती हा तिसरा जिल्हा जन्माला घातला आहे. काही काणकोणकर कुशावती जिल्ह्यात जाण्यास विरोध करतात. त्यांना दक्षिण गोवा जिल्हाच हवा आहे. मात्र विरोध करणाऱ्यांचे चेहरे पाहिले तर विरोध कोण करतो हे समजत असल्याचा दावा तिसरा जिल्हा समर्थक करीत आहेत. तिसऱ्या जिल्ह्यास विरोध करणारे जरी मूळ काणकोणकर असले तरी त्यांनी कर्मभूमी मडगाव झाली आहे, आपल्या कुटुंब कबिल्यासह गाव सोडून जे मडगाव शहरात स्थायिक झाले, तेच आता तिसऱ्या जिल्ह्यास विरोध करायला लागले आहेत. तिसऱ्या जिल्ह्यास विरोध करणाऱ्यांनी केवळ आपली सोय व ‘इगो’ न पाहता जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाठी तिसऱ्या जिल्ह्यास समर्थन द्यावे, अशी सूचना आता मूळ काणकोणकर करू लागलेत. ∙∙∙
गाेव्यात तिसऱ्या जिल्ह्याची स्थापना झाल्यानंतर सांगे, केपे व धारबांदोडा या तिन्ही तालुक्यामध्ये खुशीचे वातावरण असले तरी काणकोणात मात्र नाराजीचे वातावरण आहे. कारण काणकोणकरांसाठी मडगाव हे दुसरे आश्रयस्थान असून अर्ध्यापेक्षा अधिक काणकोणकार मडगावात स्थायिक झाल्यामुळे जिल्ह्याचे मुख्यालय मडगावात असणे अधिक सोयीचे, असे त्यांना वाटते. काँग्रेस-गोवा फॉरवर्ड या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी या तिसऱ्या जिल्ह्याला विरोध केला आहे. मात्र या पार्श्वभूमीवर मंत्री रमेश तवडकर यांची काय भूमिका असेल, हे पहावे लागणार आहे. ∙∙∙
कुंकळ्ळी ते बाळ्ळी दरम्यानचा रस्ता अरुंद तर आहेच व त्यामुळे कोणत्याही वेळे चला तेथे वाहनांच्या रांगा लागलेल्या आढळतात. तो रस्ता रुंद करण्याचे वा बगलरस्ता उभारण्याचे सोडून संबंधित खात्याने तो आणखीन अरुंद करण्याचा उद्योग सुरू केलेला आहे व त्याची खमंग चर्चा तेथे सध्या सुरू आहे. सदररस्त्याच्या एका बाजूला ‘वॅाकिंग ट्रेक’ उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यावरून ‘वॅाकींग’ करणे कोणालाच शक्य नाही कारण तो रस्त्यापासून भलताच उंच आहे, शिवाय मधे-मधे त्यावर जागा सोडल्याने त्यावरून चालणाऱ्याला परत परत खाली उतरावे लागणार आहे. गटारावर तो उभारला आहे खरा, पण रस्त्यावरील पाणी गटारांत सोडण्यासाठी केलेली व्यवस्था सदोष असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे या कामाने कोट्यवधींचा निधी पाण्यात जाणार नाही, तर संबंधित अधिकारी व ठेकेदाराची व्यवस्था करण्यासाठी हे काम केले जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ∙∙∙
जनगणनेच्या वेळी, निवडणूक काळात शिक्षकांना कामे दिली जातात, हे सर्वांना माहीत होते. पण रस्त्यावरील भटक्या श्वानांना मोजण्याचे काम देणे म्हणजे अतिच झाले ना. नवी दिल्ली सरकारने शिक्षकांना रस्त्यावरील भटकी कुत्री मोजण्याचे काम दिल्याचा आरोप ‘आप’ने केला आहे. दिल्लीच्या शिक्षण मंत्र्यांने हा आरोप फेटाळला व असे कोणतेही काम शिक्षकांना दिले नसल्याचे स्पष्ट केले. पण ज्यांच्या मेंदुतून ही कल्पना बाहेर पडली, ती भन्नाटच म्हणावी लागेल. गोव्यातही अनेक भटकी कुत्री आहेत. किनारपट्टीवर तर पर्यटकांना चावा घेण्याचे प्रकार नियमित घडत असतात. सरकार या भटक्या कुत्र्यांसंदर्भात काहीही कारवाई होताना दिसत नाही. जर कुत्र्यांची गणना शिक्षकांमार्फत हाती घेतले तर चांगलेच होईल ना?, असे लोक बोलू लागलेत. ∙∙∙
पूजा नाईकने एका मंत्र्यावर लाच घेऊन नोकरी दिल्याचा आरोप केला, तेव्हा राज्यात बरीच खळबळ झाली. विशेष म्हणजे हा आरोप तिच्यावर ‘कॅश फॉर जॉब’चा ठपका लागल्यानंतर तब्बल वर्षभराने पुढे आला... लोक म्हणाले, वेळ साधून बाण सोडला की काय? त्यामुळे पूजाचं प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आणि राज्यभर खळबळ उडाली. हे प्रकरण कुठेच नसताना अचानक ३१ डिसेंबरच्या रात्री पूजाला इस्पितळात नेऊन आरोग्य तपासणी, आणि थेट तुरुंगात न्यायालयीन कोठडी! त्यामुळे ‘हे नेमकं कधी ठरलं, कसं घडलं, आणि एवढ्या शांततेत कसं पार पडलं?’ असे प्रश्न चर्चेतून फिरू लागले. लोक म्हणतात, प्रकरण तर काही दिवसांपासून शांत होतं मग अचानक ही घाई का? अचानक ताब्यात घेण्यामागचं नेमकं कारण काय? पोलिस मात्र सध्या मौन बाळगून आहेत. ∙∙∙
जिल्हा पंचायत निवडणुकीत खरी बाजी मारली, ती सुदिन बाब आणि सुभाष बाब शिरोडकर यांनी. मडकई आणि शिरोडा मतदारसंघात स्थानिक आमदारांचेच उमेदवार निवडून आल्याने पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही नेत्यांना सोयीस्कर ठरणार हे निश्चित. मात्र प्रियोळ आणि फोंडा मतदारसंघात नेमके काय वाढून ठेवले आहे देव जाणे. विधानसभेपूर्वी फोंडा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे तेथील निवडणूक कशी काय निभावली जाते हे लवकरच कळेल. कारण त्यावरच तर २०२७ च्या निवडणुकीचे भाकीत आहे. ∙∙∙
विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव झेडपी निवडणुकीत सत्ताधारी भाजपाचा यशवंत ठरलेला फॉर्म्युला स्वीकारणार असल्याचे कळते. हे विधान ऐकून गोंधळून जाण्याची गरज नाही. युरी आलेमाव म्हणे येणाऱ्या कुंकळळी नगरपालिकेच्या निवडणुकीत स्वतःचे पॅनल उभे करणार आहे. युरी म्हणे पालिकेच्या चौदाही प्रभागातून नवे उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. याचा अर्थ युरी समर्थक विद्यमान नऊ नगरसेवकांचा पत्ता कट होणार हे निश्चित. युरीने यासाठी कामाला सुरावात केली आहे. युरीच्या समर्थनावर निवडणुकीत उतरण्यास सज्ज असलेल्या भावी नगरसेवकांचे बॅनर झळकायला लागले आहेत.आता पाहूया पुढे काय होते! ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.