पणजी : आपल्या सरकारने इतर राज्यांपेक्षा चांगल्या शैक्षणिक सुविधा (Education Schemes) गोव्यात (Goa) उपलब्ध केल्या आहेत. महाविद्यालयांनी फक्त कला (Arts) व वाणिज्य (Commerce) या विषयाचे वर्ग वाढवण्यापेक्षा कौशल्यपूर्ण (Skill) मनुष्यबळ तयार व्हावे, यासाठी खास अभ्यासक्रम सुरू करावेत. जेणेकरून स्वयंपूर्ण युवक - युवती तयार होतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सांवत यांनी आज केले.
विद्याप्रबोधिनी महाविद्यालय पर्वरीतर्फे उच्च शिक्षण संचालनालय व पुण्याच्या ‘केडा’ संस्थेच्या सहकार्याने पणजी येथे आयोजित महाविद्यालयातून कौशल्यपूर्ण मनुष्यबळ तयार करण्याच्या प्रक्रियेतील कमतरता व ‘नॅक’ या विषयावर पणजीत आयोजित दोन दिवशीय परिसंवादाचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी प्रबोधन शिक्षण संस्था पर्वरीचे अध्यक्ष संजय वालावलकर, ‘केडा’चे सचिव प्रा. धनंजय कुलकर्णी, उच्च शिक्षण संचालक प्रसाद लोलयेकर, विद्या प्रबोधिनी महाविद्यालयाचे प्राचार्य भूषण भावे व परिसंवादाचे समन्वयक अरुण मराठे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
राज्यातील बहुतांश विद्यार्थी कला व वाणिज्य शाखेतून पदव्या घेतात. मात्र, त्यांची संख्या जास्त असल्याने नोकरी मिळवताना त्यांना अडचणी येतात. याउलट काही वेगळ्या विभागासाठी योग्य ते पदवीधर मिळत नाहीत. ही तफावत दूर करण्यासाठी महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा. विविध विषयांचे पदवी अभ्यासक्रम आपल्या संस्थेत सुरू करावेत. जेणेकरून युवक व युवती स्वयंपूर्ण होतील व कौशल्यपूर्ण मनुष्यबळ राज्यात तयार होईल. उच्च शिक्षण संचालनालयाने सुरू केलल्या या उपक्रमांचा लाभ शेकडो विद्यार्थ्यांना होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. प्रा. भूषण भावे यांनी प्रास्ताविक केले.
गोव्यातील ५ महाविद्यालये ‘नॅक’च्या चौथ्या विभागात आहेत. तर ११ महाविद्यालये ‘ए’ श्रेणीत आहेत. देशाच्या इतर राज्यांपेक्षा ही स्थिती चांगली आहे. मात्र, राज्यातील एकही महाविद्यालय ‘ए प्लस’ किंवा ‘ए प्लस प्लस’ नाही. त्यामुळे महाविद्यालयांनी सिंहावलोकन करून उपलब्ध सुविधांचा योग्य लाभ घेऊन उच्च श्रेणी प्राप्त करावी. येता काळ हा ऑॅनलाईन शिक्षणाचा आहे, याची जाणीव ठेऊन सज्ज राहावे.
- प्रसाद लोलयेकर (संचालक, उच्च शिक्षण संचालक)
गोवा मुक्तीपूर्वी परराज्यांतून जीवनावश्यक वस्तू अपवादाने आयात व्हायच्या. त्यावेळी गोव्यातच भाजी, दूध, तांदूळ, कडधान्ये उत्पादन होत होते. मात्र, गोवा मुक्तीनंतर जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन घटले व परराज्यांतून आयात कराव्या लागत आहेत. स्वयंपूर्ण गोवा उपक्रमाद्वारे पुन्हा गोव्यात जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन वाढवण्यासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांना यश येत आहे.
-डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.