Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज; विरोधकांची युती की युतीचा ढोल?

Khari Kujbuj Political Satire: फातोर्ड्यातील दामू नाईक आणि विजय सरदेसाई यांच्यातील राजकीय जुगलबंदी काही नवी नाही. एकाने टीका करायची आणि दुसऱ्याने त्याला प्रत्युत्तर द्यायचे, हा सिलसिला सुरूच असतो.

गोमंतक ऑनलाईन टीम

विरोधकांची युती की युतीचा ढोल?

‘आज परतलो, फाल्या पावतलो, पावन पावोना’ या कोकणी लोकगीताप्रमाणे भाजपविरोधी पक्षांच्या संभाव्य युतीची अवस्था झाली आहे. भाजपला सत्तेतून हटवायचे असेल तर विरोधकांनी एकत्र येणे आवश्यक आहे, हे सर्वांनाच पटते; पण वळत मात्र नाही. ‘आप’चा ‘एकला चलो’चा नारा, काँग्रेस-गोवा फॉरवर्डमधील अबोला आणि ‘आरजी’च्या बारा जागांच्या मागणीमुळे युतीचे गणित बिघडले आहे. अशा परिस्थितीत १६ नोव्हेंबरला सूर्यास्तानंतर कुंकळ्ळीत ‘ग्रँड ऑपोझिशन अलायन्स’ची घोषणा होणार, अशी भाबडी आशा काँग्रेसजन बाळगून आहेत. आता युतीचे बिगुल वाजणार की एकमेकांच्या मतभेदांनी युतीचा ढोल फुटणार, हे लवकरच कळेल. ∙∙∙

‘तो’ इच्छुक नेता कोण?

फातोर्ड्यातील दामू नाईक आणि विजय सरदेसाई यांच्यातील राजकीय जुगलबंदी काही नवी नाही. एकाने टीका करायची आणि दुसऱ्याने त्याला प्रत्युत्तर द्यायचे, हा सिलसिला सुरूच असतो. कालही दामूंनी विजय यांच्यावर टीकेची झोड उठवली. ३२ वर्षांपासून आपण लोकांसाठी उपलब्ध असून आपल्याला सुरक्षा रक्षकाचीही गरज भासत नाही, असे सांगत त्यांनी विजयना लक्ष्य केले. सरकारी कामांचे श्रेय लाटण्यापासून ते साकव पाडून नव्याने बांधण्यापर्यंत अनेक मुद्यांवर त्यांनी टोले लगावले. मात्र, अखेर त्यांनी एक गौप्यस्फोट केला. ‘एक’ नेता भाजप प्रवेशासाठी केंद्रीय आणि पणजीतील नेत्यांशी बोलणी करीत असल्याचे त्यांनी सांगितले. नाव मात्र गुलदस्त्यातच ठेवले. उपस्थितांना ‘तो’ कोण? याचा अंदाज आला असावा; पण राजकीय वर्तुळात उत्सुकता कायम आहे.

कुडचडे मतदारसंघात इच्छुकांची भाऊगर्दी!

कुडचडे मतदारसंघात आमदारकीसाठी इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भाजपमध्ये नीलेश काब्राल, रोहन गावस देसाई, सिद्धार्थ गावस देसाई आणि आरक्षण लागू झाल्यास सुभाष फळदेसाई यांची नावे चर्चेत आहेत. काँग्रेसमध्ये अमित पाटकर, पीटी होडारकर, पुष्कल सावंत देसाई आणि जोहान ऊर्फ बबलू यांनी दावेदारी केली आहे. त्यामुळे उमेदवारीचा पेच वाढणार हे निश्चित. आता उमेदवारी न मिळाल्यास कोण मत्स्यन्यायाचा नियम वापरून कोणाला गिळणार, हे पाहणेच औत्सुक्याचे ठरेल!

लक्षात कोण घेतो?

नरकासुराचे पुतळे जाळण्याच्या काळात ‘एअर क्वालिटी इंडेक्स’ प्रामुख्याने काही घटकांवर अवलंबून असते हे तज्ज्ञांनी दाखवून दिले. पुतळे जाळल्यामुळे हरितगृह वायूंचे उत्सर्जन होते. या प्रक्रियेत सूक्ष्म कण हवेत सोडले जातात, जे प्रदूषणाचे मुख्य स्रोत ठरतात. अपूर्ण ज्वलनामुळे कार्बन मोनोऑक्साइड वायू बाहेर पडतो. लोक वाहनांचा वापर करत असल्याने, त्या वाहनांच्या इंजिनमधून होणारे उत्सर्जन प्रदूषणात भर घालते. फटाके फोडल्यामुळे प्रदूषणाची पातळी अधिकच वाढते. ज्यामुळे हवा गुणवत्ता निर्देशांक सर्वोच्च बिंदूवर पोहोचतो. कालांतराने हे प्रदूषक घटक विखुरले गेल्यावर परिसरातील हवेची गुणवत्ता सुधारते. विशेषतः शहरी भागांत झाडांचे प्रमाण कमी असल्याने, उत्सर्जित झालेला कार्बन डायऑक्साइड शोषला जात नाही, ज्यामुळे प्रदूषण अधिक गंभीर बनते. जर या सर्व घटना एकाच वेळी घडल्या, तर त्या वेळी हवेची गुणवत्ता सर्वात वाईट असते. जी पणजीत सर्वात खराब हवा गुणवत्ता ठरली. वेळीच शहाणे व्हावे.

इशारा की फुसका बार?

निवडणुका जवळ आल्या की राजकारण्यांना जनतेच्या समस्या दिसू लागतात, याचा प्रत्यय सध्या कुडचडेत येत आहे. काँग्रेसचे दोन गट आपापल्या परीने सक्रिय झाले आहेत. एका बाजूला माजी नगराध्यक्ष पीटी ऊर्फ बाळकृष्ण होडारकर काँग्रेसचा हात मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत, तर दुसरीकडे संजय देसाई, पुष्कल सावंत आणि जोहान ऊर्फ बबलू यांची तिकडी स्वतंत्रपणे मैदानात उतरली आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत दुर्लक्षित असलेले रस्त्यांचे प्रश्न आता बबलूंना दिसू लागले आहेत. येत्या दहा दिवसांत रस्त्यांच्या दुरुस्तीला सुरवात न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. आता या तिकडीचा इशारा सरकारला घाम फोडणार की केवळ हवेत विरणार, हे पाहावे लागेल.

सावर्डेत बदलासाठी प्रयत्न

सावर्डे मतदारसंघात सध्या स्थानिक आमदार गणेश गावकर यांच्याविरोधात भाजप पक्षातीलच काही स्थानिक नेत्यांनी आघाडी उघडली असून भाजपचा उमेदवार बदला, अशी मागणी भाजपवालेच करू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर काल भाजपचे काही माजी आमदार आणि सावर्डे मतदारसंघातील काही माजी सरपंचांची दाभाळ येथे बैठक होऊन त्यांनी कुठल्याही परिस्थितीत मतदारसंघ ‘गणेशमुक्त’ करण्याचा ठराव घेतला असून आपल्या ठरावाचा पाठपुरावा करण्यासाठी ते मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचीही भेट घेणार आहेत. आता त्यांच्या या प्रयत्नांना यश येईल की नाही हे येणारा काळच सांगेल हेच खरे!

हा आम्ही पाहिलेला गोवा नव्हे!

गोव्याला पर्यटनाची राजधानी म्हणायचे की सुरक्षिततेच्या प्रश्नांनी ग्रासलेले राज्य, असा प्रश्न आता पडू लागला आहे. अवघ्या तीन दिवसांत दोन अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना आणि नोकरीचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे गोव्याच्या प्रतिमेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकीकडे सुरक्षित गोव्याच्या गप्पा, तर दुसरीकडे मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर! आता प्रशासनाच्या कारवाईची वाट पाहायची की गोमंतकीयांनीच आपल्या घरापासून समाजापर्यंत जागरूकतेची घंटा वाजवायची? कारण गोवा असा नक्कीच नव्हता, ज्याचे स्वप्न गोमंतकीयांनी पाहिले होते. पर्यटनासाठी येणाऱ्यांना स्वर्ग दाखवताना आपल्या मुलींच्या सुरक्षिततेसाठी मात्र नरकयातना का सहन कराव्या लागाव्यात, अशी चर्चा आता चौकाचौकांत सुरू झाली आहे.

‘एसपी’चे छायाछत्र?

खाकी वर्दीच्या आडोशाखाली गोव्यातील पोलिस काय, काय करतात ते हल्लीच्या काही घटनांतून उघडकीस आलेले असतानाच दक्षिण गोवा ‘एसपी’ कार्यालयाशी यापूर्वी संलग्न असलेल्या एका पोलिस शिपायाकडून कुळे भागात बेकायदेशीररीत्या चिरेखणी चालवीत असल्याची बाब पुढे आल्याने पुन्हा एकदा पोलिस खाते बदनामीच्या चर्चेत आले आहे. हा जो कोण ही चिरेखाण चालवतो तो नेहमीच ‘एसपी’ कार्यालयाशी जवळीक साधून असायचा. मात्र, दक्षिण गोव्यातील ‘एसपी’ बदलल्यावर त्याचीही दुसरीकडे बदली झाली; पण आपली बदली पुन्हा ‘एसपी’ कार्यालयात व्हावी यासाठी त्याची धडपड सुरू होती. असे काय म्हणून या ‘एसपी’ कार्यालयाला लागले आहे की तो पोलिस गुळाला जसा मुंगळा चिकटावा तसा ‘एसपी’ कार्यालयाशी चिकटून राहू पाहात आहे बरे!

एकतरी दिवा लावावा!

गोवा पोलिस मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोलिसांचा ‘लोगो’ दिमाखात विराजमान आहे. मात्र, रात्रीच्या अंधारात त्याकडे पाहिल्यावर पोलिस ‘लोगो’ कमी आणि ध्यानधारणेला बसलेली एखादी व्यक्तीच अधिक भासते, अशी चर्चा रंगू लागली आहे; कारण ‘लोगो’ला पुरेसा प्रकाशच नाही आणि त्याच्या देखभालीकडेही जणू दुर्लक्ष झाले आहे. राज्यातील प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवणाऱ्या पोलिसांची स्वतःच्या मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर नजर पडत नाही की काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. इतरांना प्रकाश दाखवणाऱ्या पोलिसांनी निदान आपल्या ‘लोगो’वर तरी एक दिवा लावावा, एवढीच माफक अपेक्षा!

म्हापशातील बोलका फलक

राज्याचे दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांनी म्हापशात दिवाळीच्या शुभेच्छा देणारे फलक लावले आहेत. त्या फलकांवर त्यानी भाजपची कमळ निशाणी ठळकपणे वापरली आहे. यामुळे या दिवाळीच्या शुभेच्छा सामाजिक कार्यकर्ता म्हणून नव्हे तर राजकीय नेता म्हणून आहेत, हे स्पष्ट झाले आहे. म्हापसा मतदारसंघात भाजपने नव्या चेहऱ्याला संधी द्यावी, अशी चर्चा गेले काही महिने सुरू आहे. काहींनी आपल्या फलकांवर मुख्यमंत्री व पंतप्रधानांची छायाचित्रे वापरणे सुरू केले असतानाच पावसकर यांनी थेट भाजपचे निवडणूक चिन्ह फलकावर वापरून, होय मी म्हापशातून लढण्यास इच्छुक आहे. तेही म्हापशात सध्या भाजपचे जोशुआ डिसोझा आमदार असतानाही, असे संकेत दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Smart Electricity Meters: 'स्‍मार्ट मीटर' रद्द करा, अन्यथा आंदोलन; अमित पाटकरांचा सरकारला इशारा, 15 दिवसांची दिली मुदत

Goa Congress Alliance: 'आरजी'सह गोवा फॉरवर्डला सोबत घेण्‍यास काँग्रेस तयार! जागावाटपाच्‍या बैठकांना गुरूवारपासून सुरवात

Goa Politics: भाजपमध्ये येण्यास विरोधक उत्सुक! दामू नाईक यांचा गौप्यस्फोट; म्हणाले, 'योग्य वेळी नावे जाहीर करू'

VIDEO: पॅट कमिन्सच्या सुखी संसारात मिठाचा खडा? उस्मान ख्वाजाच्या खुलाशानंतर पत्नीशी वाद? सिडनीच्या रस्त्यावरील भांडणाचा व्हिडीओ समोर

बंगळूरू ते मडगाव प्रवास होणार अधिक वेगवान! शुक्रवारपासून 'वंदे भारत एक्स्प्रेस'ची सेवा सुरू; पंतप्रधान आणि रेल्वेमंत्री दाखवणार हिरवा झेंडा

SCROLL FOR NEXT