डिचोली: पहाटेच्या प्रहरी खनिज वाहतूक नकोच, अशी मागणी करीत बागवाडा-पिळगाव येथील ग्रामस्थांनी काल ‘वेदांता’ची खनिज वाहतूक रोखून धरली. पहाटे ६ वाजता अडवलेली खनिज वाहतूक तब्बल सव्वा दोन तासांनंतर पूर्ववत सुरू झाली. पहाटेच्या वेळी खनिज वाहतूक पुन्हा सुरू केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही रास्ता रोको आंदोलन मागे घेताना पिळगावमधील ग्रामस्थांनी दिला.
बागवाडा आणि सारमानस भागातील जनता आधीच धूळ व ध्वनीप्रदूषणामुळे त्रस्त आहे. त्यातच गेल्या तीन दिवसांपासून ‘वेदांता’च्या खाणीतून पहाटे ६ वाजल्यापासून खनिज वाहतूक करण्यात येत होती. मात्र, ही वाहतूक मार्गदर्शक तत्त्वांनुसार होत नसल्याचा दावा करीत संतप्त झालेल्या बागवाडा येथील ग्रामस्थांनी काल (शुक्रवारी) पहाटेच रस्त्यावर उतरून खनिज वाहतूक करणारे ट्रक अडवले. पंच मोहिनी जल्मी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिकांनी हे आंदोलन केले.
खनिज वाहतूक रोखताच कंपनीचे अधिकारी आणि पोलिस आंदोलनस्थळी दाखल झाले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, सकाळी ८ वाजेपर्यंत खनिज वाहतूक नकोच, अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी लावून धरली. अखेर पहाटे अडवलेली खनिज वाहतूक सव्वा आठ वाजता पुन्हा सुरू झाली. पहाटे होणाऱ्या खनिज वाहतुकीमुळे विशेषतः विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. अपघातांचाही धोका निर्माण होत आहे. त्यामुळेच पहाटेच्या प्रहरी खनिज वाहतुकीला आमचा विरोध आहे, असे मोहिनी जल्मी आणि हनुमंत सालेलकर यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.