सासष्टी: गोमंतकीयांच्या आरोग्याशी संबंधित कालवे व शिंपल्यांच्या दूषिततेबाबत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीने (एनआयओ) केलेल्या अभ्यासाचा अहवाल सरकारने तातडीने मागवून सार्वजनिक करावा, अशी मागणी वेळ्ळीचे आमदार क्रुझ सिल्वा यांनी केली आहे. मच्छीमार आणि ग्राहकांना संभ्रमात ठेवणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पावसाळ्यातील मासेमारी बंदीनंतर हंगाम नुकताच सुरू झाला असून हा काळ मच्छीमारांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, असे सिल्वा यांनी नमूद केले. वेळ्ळी मतदारसंघातील कुटबण जेटी परिसरातील अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह सागरी मासेमारीबरोबरच कालवे, शिंपले आणि इतर शेलफिश गोळा करण्यावर अवलंबून आहे.
अशा परिस्थितीत दूषिततेबाबतचा निष्कर्ष जाहीर होण्यास विलंब झाल्यास सागरी अन्नाच्या सुरक्षिततेसंदर्भात ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. त्याचा थेट परिणाम ग्राहकांचा विश्वास आणि मासेमारांच्या उत्पन्नावर होईल, असा इशारा त्यांनी दिला.
सिल्वा यांनी सांगितले की, शेलफिशचा व्यवसाय हा किनारपट्टीवरील गरीब मच्छीमार, महिला आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या अनेक कुटुंबांच्या उपजीविकेचा आधार आहे. योग्य वेळी स्पष्ट भूमिका न घेतल्यास या क्षेत्राला मोठा आर्थिक फटका बसू शकतो आणि अनेक कुटुंबे संकटात सापडू शकतात, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
या प्रकरणात मुख्यमंत्री आणि मत्स्योद्योगमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करून एनआयओचा अहवाल सार्वजनिक करावा. त्यामुळे गोमंतकीयांच्या मनातील संभ्रम दूर होईल.
- क्रुझ सिल्वा, आमदार (वेळ्ळी)
मच्छीमारांच्या उपजीविकेचा प्रश्न
वेळ्ळी मतदारसंघातील कुटबण जेटीसह किनारपट्टीवरील अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह मासेमारीबरोबरच कालवे, शिंपले आणि अन्य शेलफिश गोळा करण्यावर अवलंबून आहे. दूषिततेबाबतचा अहवाल रखडल्यास या व्यवसायावर परिणाम होऊन मासेमारांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता क्रुझ सिल्वा यांनी व्यक्त केली.
ग्राहकांचा विश्वास टिकविणे महत्त्वाचे
कालवे व शिंपल्यांच्या सुरक्षिततेबाबत अधिकृत माहिती वेळेवर उपलब्ध न झाल्यास ग्राहकांमध्ये भीती आणि संभ्रम निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सागरी मासळी व शेलफिशच्या विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता असून सरकारने एनआयओचा निष्कर्ष तातडीने जाहीर करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी आमदार क्रुझ सिल्वा यांनी केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.