पणजी: सरकारी खात्यांचे काही प्रमुख आपल्या कार्यालयांतील शिपायांकडे कानाडोळा करतात. त्यामुळे शिपाईच खात्यांचे ‘बॉस’ झाले असून, कामांसाठी येणाऱ्या नागरिकांसोबतही ते अरेरावी करतात. त्याचा दोष संबंधित खात्यासह सरकारवरही येतो. त्यामुळे अशा शिपायांना वेळीच आवरा, अशा सूचना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी खाते प्रमुखांना केल्या.
दक्षता जागृती सप्ताहानिमित्त पर्वरी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदवेलू यांच्यासह सर्वच खात्यांचे सचिव आणि खाते प्रमुख यावेळी उपस्थित होते. सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपली कामे चोखपणे केली पाहिजे. लोकांसमोर कोणतेही अडथळे येऊ नये, याचे भान त्यांनी राखले पाहिजे. एखाद्या कार्यालयातील शंभरपैकी ९० कर्मचारी प्रामाणिकपणे काम करतात. पण, जे दहा जण कामाला न्याय देत नाहीत, त्याचा परिणाम खाते आणि सरकारवरही होत असतो.
सर्वसामान्य लोक दक्षता खात्याकडे कधीही तक्रारी दाखल करीत नाहीत. खात्यांचा कारभार माहीत असलेले खात्यातीलच किंवा निवृत्त झालेले अधिकारी, कर्मचारीच दक्षता खात्याकडे तक्रारी दाखल करीत असतात. त्यामुळे अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनीही सदैव दक्ष रहावे’’, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. शिवाय ‘‘जमीन घोटाळ्यात काही कर्मचारी विनाकारण अडकले, असेही ते म्हणाले.
गोव्याचा ‘हॅपीनेस इंडेक्स’ वाढवायचा असेल, तर सर्वप्रथम सरकारी खात्यांत तो वाढणे आवश्यक आहे. त्यावर काम करण्याच्या सूचना आपण मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदवेलू यांना दिलेल्या आहेत, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.