Khari Kujbuj Political Satire DainikGomanta
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; दिगंबरना वाईट अनुभव येतातच कसे?

Khari Kujbuj Political Satire: डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या झेडपी निवडणुकांचे निनाद आता फोंड्यात मोठ्या प्रमाणात घुमू लागले आहेत.

Sameer Amunekar

दिगंबरना वाईट अनुभव येतातच कसे?

मंत्री दिगंबर कामत यांना प्रत्येक ठिकाणी वाईट अनुभव येतात. हे दुसरा तिसरा कोणी सांगत नसून ते स्वतःच त्याबद्दल बोलतात. आधी भाजपात नंबर दोनचे मंत्री असूनही त्यांना ‘फुगासांव’चा अनुभव आला होता. त्यामुळे त्यांनी पक्ष सोडला, माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे सरकार पाडले व काँग्रेसवासी झाले. कॉंग्रेस मध्ये त्यांनी मुख्यमंत्री पदाचा आस्वाद घेतला. तरी नंतर पक्षातर्फे अपमान व मानहानी झाली. त्यामुळे त्यांनी कॉंग्रेस सोडला व ते स्वगृही म्हणजे भाजपमघ्ये परतले. भाजपमध्ये प्रवेश करूनही त्यांना मंत्रिपद मिळण्यास अडीच वर्षे लागली. या अडीच वर्षांतही त्यांची घुसमट झालीच असावी, असे लोक बोलू लागलेत. मंत्रिपद मिळाल्यावर खात्यांसाठी प्रतीक्षा. खाते मिळाल्यावर त्यांना आता आणखी कुठला वाईट अनुभव येतो, पाहू. अशी चर्चा रंगतेय! ∙∙∙

सावियोचा ससेमिरा...

कॉंग्रेसचे सावियो कुतिन्हो हे मडगाव पालिकेतील अनेक विषयांवर नेहमीच आवाज उठवित असतात, आता त्यांनी या पालिकेतील नोकर भरती प्रकरणाचा विषय पुढे काढला आहे. या नोकरीसाठी अनेकांना कॉल लेटर पोहोचले नसल्याने, ते परीक्षेपासून वंचित राहिले. या पार्श्वभूमीवर या परीक्षा पुन्हा घाव्यात अशी कुतिन्हो यांची मागणी आहे. जर त्यांचा दावा खरा आहे तर त्यांची मागणीही रास्त आहे. मात्र नगराध्यक्ष दामू शिरोडकर यांना ते मान्य नसावे. आम्ही उत्तर देऊ, असे ती मीडियावाल्याकडे बोलले. पालिकेची सत्ता आता या पालिकेतील सत्तारूढ गटाच्या डोक्यात चढली आहे, असे लोक म्हणतात. पुढच्या वर्षी पालिका निवडणुका आहेत. येणाऱ्या काळात सावियो अँड कंपनी अधिक सक्रिय होणार असल्याचे चित्र आतापासूनच दिसू लागले आहे. ∙

फोंड्यात झेडपी निवडणुकांचे निनाद

डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या झेडपी निवडणुकांचे निनाद आता फोंड्यात मोठ्या प्रमाणात घुमू लागले आहेत. गणेश चतुर्थीचा मुहूर्त साधून अनेकजण प्रचार करण्याच्या तयारीला लागले आहेत. तर काही जणांनी उमेदवारी मिळवण्याकरिता आपापल्या ‘गॉड फादर’चे उंबरठे झिजवायला सुरुवात केली आहे. तर काहींनी आपण निवडणूक जिंकलो तर पुढील वर्षी गणपती बाप्पांना दीड दिवसाच्या ऐवजी पाच वा सात दिवस ठेवू, असेही ते बाप्पांना गाऱ्हाणे घालणार आहेत, म्हणे. आता बघूया बाप्पा कोणाला कसा पावतो तो!

कामिलचा हुरूप

मडगाव पालिकेचे नगरसेवक कामिल बार्रेटो हे एक वेगळेच रसायन आहे. राजकारण अनेक वर्षे घालविल्यानंतर मागच्या खेपेला ते अखेर ते नगरसेवक बनले. फातोर्ड्याचे दामू नाईक यांची ती कृपा होती. दामूचा हात पकडून नंतर ते एसटी महामंडळाचे संचालकही बनले. त्यांना मडगावचे नगराध्यक्षपदाची खुर्ची खुणावत होती. मात्र, तेथे त्यांची डाळ शिजली नाही. आता त्यांना फातोर्ड्यातून आमदार बनण्याची स्वप्ने पडू लागली आहे. एसटीसाठी राजकीय आरक्षण होऊन फातोर्डा मतदारसंघ आरक्षित झाला तर भाजपाच्या उमेदवारीवर दावा ठोकू, असे ते सर्वांना सांगत सुटले आहे. दामू नाईक यांच्या कानावरही गोष्ट आली आहे. आता दामूसर कामिल बाबाला काय समज देतात ते बघावे लागेल. तूर्त ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’.

पार्सेकर-खलप एकत्र?

माजी मुख्यमंत्री प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर आणि माजी केंद्रीय मंत्री ॲड. रमाकांत खलप या दोन्ही दिग्गज राजकीय नेत्यांची भेट झाल्यामुळे मांद्रे मतदारसंघात चलबिचल सुरू झाली आहे. प्राचार्य पार्सेकर हे मुख्यमंत्री असताना माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांच्या शिक्षण संस्थेला अर्थात मांद्रे कॉलेजला अनुदान रोखण्यात आले होते. त्यानंतर खलप यांनी न्यायालयात धाव घेतल्याने तिथे त्यांना न्याय दिला. सध्या या दोन्ही नेत्यांची भेट झाल्यामुळे नक्की कोणत्या विषयावर चर्चा झाली, हे कळले नाही. मात्र त्यांच्या मध्यस्थीसाठी मांद्रेचे माजी सरपंच ॲड. अमित सावंतही उपस्थित होते. अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाला उभारी देण्यासाठी की, राजकीय दृष्टिकोनातून एकत्र आले, हे मात्र उद्याचा काळच दाखवेल. मांद्रेवासीयांना चर्चेला खाद्य मात्र नक्कीच मिळालेय !

पाणी मुरते ते असे!

जलसंपदा खात्यातल्या एकंदर भ्रष्टाचारी तसेच खोटे शैक्षणिक आणि जातीचे दाखले सादर केलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी मेहेरनजर ठेवण्यात सरकारने धन्यता मानलेली आहे. त्याचाच गैरफायदा घेत सदर खात्यात जातीचा खोटा दाखला सादर केल्याप्रकरणी गोवा राज्य अनुसूचित जाती आणि आयोगाने ज्या कार्यकारी अभियंत्याला दोषी ठरवले. त्यालाच विद्यमान मुख्य अभियंत्याने कारवाई करण्याऐवजी अधीक्षक अभियंता म्हणून बढती दिल्याने सध्या हा विषय संपूर्ण खात्यात चर्चेचा ठरलेला आहे. सदर खात्याच्या गलथान कारभारावर नियंत्रण ठेवण्याऐवजी मंत्री बेदखल करत असल्याचा गैरफायदा घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार वर्तनात वाढ होत चालली आहे. सध्या खोटा दाखला सादर केलेला अधिकारी अधीक्षक अभियंता म्हणून नियुक्त झाल्याने खात्याचा गलथानपणा पुन्हा चर्चेत आलेला आहे. पाणी मुरते ते असे!

फळदेसाईंचे वासरू प्रेम

समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई पुंगनुर गाईची वासरे पाळली आहेत. आंध्र प्रदेशात या जातीच्या गाई मोठ्या प्रमाणात पाळल्या जातात. तीन ते पाच फूट उंच वाढणारी आणि दिवसाला दोन ते तीन लीटर दूध देणारी गाय म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. फळदेसाईंच्या घरात सहजपणे या गाईची वासरं सध्या वावरत असल्याचे दिसत आहे. नेटकऱ्यांकडून त्यांचा गाईसमवेतचा व्हिडिओ व्हायरल केला आहे. एका बाजूला अधिक दूध देणाऱ्या गीर गाई पाळल्या पाहिजेत, असे सरकारकडून सूचित केले जाते. परंतु कमी उंचीच्या गाई पाळण्यामागचे गमक मंत्री फळदेसाई यांनाच माहीत असेल. तसे पाहिले तर फळदेसाई हे शेतीही गंभीरपणे करतात, त्यामुळे त्यांचे प्राण्यांवर प्रेम असणार हे काही लपत नाही.

‘वचपा’ कसा काढणार?

गत विधानसभा निवडणुकीच्‍या निकालानंतर अवघ्‍या सहा महिन्‍यांत काँग्रेसच्‍या ज्‍या आठ आमदारांनी भाजपात प्रवेश केला, त्‍याचे नेतृत्‍व कळंगुटचे आमदार आणि तत्‍कालीन विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी केले होते. मायकल आणि त्‍यांच्‍या पत्‍नी दिलायला यांच्‍याकडे सद्यस्‍थितीत कळंगुट आणि शिवोली मतदारसंघ आहेत. शेजारील साळगाव आणि मांद्रे या मतदारसंघांवरही मायकल यांचा प्रभाव आहे. हे सर्व राजकारण माहिती असतानाही आपल्‍याला वगळून दिगंबर कामतांना मंत्रिपद दिल्‍याने मायकल कमालीचे निराश झालेले आहेत. आता भाजपने केलेल्‍या या दगाबाजीचा वचपा ते ‘मुखा’ने काढणार की ‘कृती’ने? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

इच्‍छा की ‘दबाव’?

गेल्‍या गुरुवारी मंत्रिपदाची शपथ घेतलेले दिगंबर कामत आणि रमेश तवडकर हे दोघेही राजकारणातील ज्‍येष्‍ठ नेते. कामत यांनी तर २००७ ते २०१२ या काळात काँग्रेस सरकार असताना मुख्‍यमंत्रिपद भूषवले. तवडकर यांनीही आधीही मंत्री म्‍हणून काम केलेच. शिवाय २०२२ मध्‍ये भाजपने त्‍यांना विधानसभेचे सर्वोच्च असे सभापतिपद दिले. त्‍यामुळे आता मंत्री म्‍हणून वर्णी लागल्‍यानंतर मुख्‍यमंत्र्यांनी आपल्‍याला वजनदार खाती द्यावीत, असा त्‍यांचा ‘अट्टाहास’ असणे स्‍वाभाविकच आहे. कामत यांनी तर आपण मुख्‍यमंत्री असताना अर्थ आणि गृह ही दोन महत्त्‍वाची खाती स्‍वत:कडे ठेवलीच नव्‍हती, असे म्‍हणत या खात्‍यांवर दावा केला. मग, तवडकर तर मागे राहतील कसे? कामतांनंतर आता तवडकरांनीही आपल्‍याला शिक्षण खात्‍यात रस असल्‍याची इच्‍छा व्‍यक्त केली. मुळात काँग्रेस आणि भाजपचे राजकारण यात जमीन–अस्‍मानाचा फरक आहे. भाजपात स्‍वत:च्‍या नाही, तर पक्षश्रेष्‍ठींच्‍या मतालाच किंमत असते, हे माहीत असतानाही या दोन्‍ही नवनियुक्त मंत्र्यांनी अशी वक्तव्‍ये नेमकी का केली, त्‍यांच्‍याकडून ‘दबावतंत्रा’चा तर वापर होत नसेल ना?

स्वस्तातले नारळ

तीन दिवसांवर चतुर्थीचा सण आलाय. त्यातच नारळाने दराचा उच्चांक गाठला आहे. त्यामुळे हवालदिल झालेल्या गृहिणींना म्हापशातील रहिवाशी योगेश केळकर यांनी मात्र दिलासा दिला आहे. तेही अगदी दोन रुपये नग या दरात नारळांची विक्री करून. फलोत्पादन महामंडळानेही ३८ रुपयांनी नारळ विकण्याचा प्रयोग केला. त्यालाही लोकांचा उदंड प्रतिसाद लाभला, अगदी रांगा लावून स्वस्ताईतले नारळ खरेदी केले. मागे कांदे महागल्याने रडकुंडीच्या घाईला आलेल्या जनतेला स्वस्तात कांदे विकून दिलासा देणाऱ्या प्रतिमा कुतिन्हो बाईंचीही काहींना या निमित्ताने आठवण झाली. नारळ विकायलाही त्या बसतील, अशी अपेक्षा करायला हरकत काय? ∙∙∙

विश्वनाथ दळवींचे ‘धाव मरे धाव’

‘धाव मरे धाव’ हे कोकणी रंगभूमीवरचे एक गाजलेले नाटक. राजकारणावर आधारित या नाटकात राजकारणी सत्तेकरता कसे धावतात याचे चित्रण केले आहे. हे आठवायचे कारण म्हणजे फोंड्याचे नगरसेवक तथा भाजपचे एक इच्छुक उमेदवार विश्वनाथ दळवी यांची चाललेली धावपळ. ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत या ना त्या कारणांकरिता धावताना दिसतात. कोणी फोन मारला की, हे तिथे हजर.. कधी पडद्यापुढून तर कधी पडद्यामागून यांचे कार्य सुरू असलेले दिसून येते. आता गणेश चतुर्थी जवळ आल्यामुळे यांची धावपळ अधिकच वाढली आहे. हेतू एकच भाजपची उमेदवारी. अर्थात याचा फायदा फोंड्याच्या जनतेला होत असला तरी दळव्यांना याचा फायदा होतो की, नाही हे मात्र पुढेच कळेल. पण त्यांचे हे ‘धाव मरे धाव’ सध्या फोंड्यात चर्चेचा विषय बनलेय, एवढे मात्र निश्चित.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Helicopter Crash: फ्रान्समध्ये थरार! आग विझवणाऱ्या हेलिकॉप्टरचे तलावात क्रॅश लँडिंग; सुदैवाने जीवितहानी टळली Watch Video

Money Laundering Case: धर्मांतरण रॅकेटचा मास्टरमाइंड छंगूर बाबाच्या साम्राज्यावर ईडीचा घाला! मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी 13 कोटींची मालमत्ता जप्त

Viral Video: चांगलीच खोड मोडली! जिवंत कोळंबी खाण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोरीचा व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांनी उठवली टीकेची झोड

Ro-Ro Car Train Service: गणेशोत्सवापूर्वी कोकण रेल्वेची पहिली रो-रो कार ट्रेन गोव्यात दाखल, जाणून घ्या भाडे?

Porvorim: ओ कोकेरो ते मॉल दी गोवा रस्ता 5 दिवसांच्या गणेश चतुर्थीनंतरच होणार बंद; CM सावंतांनी केले स्पष्ट

SCROLL FOR NEXT